स्टायलो : ( लॅ. स्टायलोसँथस गिॲनेन्सिस कुल-पॅपिलिऑनेसी ). कोरडवाहू शेतीस योग्य असे द्विदलिकित वर्षायू व बहुवर्षायू चारापीक. स्टायलोसँथस या प्रजातीत एकूण ५० जाती असून भारतात स्टा. गिॲनेन्सिसस्टा. फ्रुटीकोसा या दोन जाती आढळतात. तसेच स्टा. ह्युमिलीस ( वर्षायू ), स्टा. हेमाटा ( बहुवर्षायू ), स्टा. स्कॅबरा इ. जातींचा स्टायलोसँथस या प्रजातीमध्ये समावेश होतो.

स्टायलो हे पीक मूळचे ब्राझीलचे असून ऑस्ट्रेलियातील कुरणात मोठ्या प्रमाणात आढळते. हे पीक साधारणत: ⇨ लसूणघास व ⇨ लाख या पिकांसारखे दिसते. शाक उभे ६०—९० सेंमी. उंच, द्विदली शेंड्यास पुष्कळ तंतुमय फांद्या व खोडावर लव असते. फुले लहान, पिवळी, ०.५ सेंमी. असून फांद्यांच्या टोकाशी गुच्छाने येतात. शेंग पिवळसर असून त्यात एक बी असते. स्टायलो पिकासाठी कमी पावसाचा प्रदेश, डोंगर उतारावरील तसेच हलक्या उथळ जमिनीही चालतात. हे पीक ३८—२५० सेंमी. पर्जन्यमान असणार्‍या भागात चांगल्या प्रकारे वाढू शकते. हलक्या, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत हे पीक उत्तम येत असले तरी देखील साधारण अम्लयुक्त जमिनीत ते चांगले वाढीस लागते. पावसाळ्यापूर्वी मशागत न केलेल्या जमिनीत याचे बी टाकले असता ते उगवते. तथापि, शक्य झाल्यास एक खोलवर नांगरट व एक कुळवाची पाळी देऊन जमीन भुसभुशीत करून पेरणी केल्यास उपयुक्त ठरते.

स्टायलो या चारापिकासाठी बी निवडताना ते भेसळयुक्त नसावे. हेक्टरी १२—१५ किग्रॅ. बियाणे ओळीतील अंतर ५० सेंमी. ठेवून फोकतात अथवा ८—१० किग्रॅ. बियाणे पाभरीने पेरतात. बी साधारणत: एक सेंमी. खोलीवर पेरतात, त्यापेक्षा जास्त खोल बी पेरले तर उगवण चांगली होत नाही. बी फोकून व हलकी कुळवाची पाळी दिल्यावरही चांगली वाढ होते. पीक वाढीला लागल्यावर बी पडून त्याच जमिनीत ते दरवर्षी आपोआप उगवत राहते.

पेरणीपूर्वी ३२—४८ किग्रॅ. फॉस्फरस प्रतिहेक्टरी देतात. प्रत्येक वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात ४८ किग्रॅ. फॉस्फरस प्रतिहेक्टरी देतात, त्याच-प्रमाणे १० किग्रॅ. नायट्रोजन, ३० किग्रॅ. फॉस्फरस आणि २० किग्रॅ. पोटॅशियम ह्या खतांच्या मात्रा प्रतिहेक्टरी देतात. या चारापिकासाठी साधारणत: २०—२५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले तरी चालते. पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यास पीक झपाट्याने वाढते.

स्टायलो या चारापिकाच्या सर्वसाधारणपणे दोन कापण्या केल्या जातात. स्टायलोपासून प्रतिहेक्टरी २५०—३५० क्विं. हिरवा चारा उपलब्ध होतो, तसेच १०-११ टन वाळलेला चारा मिळतो. स्टायलोच्या हिरव्या चार्‍यात १२% प्रथिने, ३८% तंतुमय पदार्थ, ८.५% खनिजे, १% वसा व ४०.५% शर्करा आढळते. स्टायलोच्या बियासुद्धा पौष्टिकतेच्या दृष्टीने समृद्ध असतात. या बियांत प्रथिनांचे प्रमाण ४०—४५% असते तसेच फॉस्फरस ०.४% व गंधक ( सल्फर ) ०.३% असते. प्रसंगी स्टायलोचे बियाणे जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते.

स्टायलो बहुगुणी व उपयुक्त चारापीक आहे. स्टायलोमुळे उत्तरोत्तर जमिनीची सुधारणा होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते तसेच जमिनीची धूप थांबते व जमिनीचे रक्षण होते.

घोडराज, रवीन्द्र