वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील : वनस्पतीच्या बहुतेक सर्व शरीरक्रियांवर रासायनिक पदार्थांच्या एका गटाचे नियंत्रण असते. त्या रासायनिक पदार्थांना हॉर्मोने म्हणतात. बी रुजण्यापासून ते फलधारणा होऊन पुन्हा बीजधारणा होईपर्यंत सर्व क्रिया या हॉर्मोनांद्वारे नियंत्रित केल्या जातात. अशा पदार्थांची शक्यता सर्वप्रथम ⇨यूलिउस फोन झाक्स यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वर्तविली. त्यांच्या मते अवयवांच्या निर्मितीस चालना देणारे काही पदार्थ पानांमध्ये तयार होऊन वनस्पतीच्या खालच्या भागांकडे वाहून नेले जातात.

चार्ल्स डार्विन यांनी अशा पदार्थांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक प्रयोग केले. प्रकाश आणि गुरुत्वाकर्षणामुळे वनस्पतीच्या मूळ आणि प्ररोह (वनस्पतीचा वायवी  भाग म्हणजे खोड, फांद्या व पाने यांनी बनलेला भाग) यांमध्ये येणाऱ्या वक्रतेचा उगम त्यांच्या अग्रांमध्ये असून तेथून त्याचा प्रभाव इतर भागांत पोहोचतो, असे दर्शवून रोपांना एकाच बाजूने प्रकाश दिल्यास त्याचा प्रभाव वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे आणि प्रकाशाच्या विरुद्ध बाजूस जातो व त्याचे पर्यावसान खालचा भाग वाकण्यात येतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. आपल्या प्रयोगांसाठी डार्विन यांनी फ्लॅरिस कॅनॅरिएन्सिस (कॅनरी गवत) या वनस्पतीचा उपयोग केला.

पी. बॉयसेन-येन्सेन (१९१०-१९१३) यांनी सातू (ॲव्हेना सटायव्हा) या वनस्पतीवर प्रयोग करुन प्रत्यक्ष पुरावा सासर केला तर ए. पाल यांनी दर्शविले की, अग्रातून एक पदार्थ खालच्या भागाकडे जातो व त्यामुळे अग्राच्या खालच्या भागातील कोशिकांच्या (पेशींच्या) वाढीस चालना मिळते (१९१९). त्यानंतर एफ्. ए. एफ्. सी. वेंट यांनी हे हॉर्मोन वेगळे करण्यात यश मिळविले (१९२६). त्यांनी ⇨आगराचे  छोटे छोटे तुकडे वापरुन त्या पदार्थाच्या जैव आमापनाची [→ आमापन, जैव] पद्धती विकसित केली. या पद्धतीस ‘ओट वक्रता चाचणी’ असेही म्हणतात.

  इ. स. १९३१ मध्ये एफ्. कोगेल आणि ए. हाजेन-श्मिट यांनी तशाच प्रकारचा वृद्धिकारक पदार्थ मानवी मूत्रामधून वेगळा करुन त्याला ऑक्सिन असे नाव दिले. त्यांनीच १९३४ मध्ये त्याचे इंडॉल-३-ॲसिटिक अम्ल असे नामकरण केले. अशा तऱ्हेने हे माहीत झालेले पहिले वृद्धिहॉर्मोन होय.

अमेरिकन सोसायटी ऑफ प्लँट फिजिऑलॉजिस्ट्स या संघटनेने वनस्पतीतील हॉर्मोने (म्हणजे फायटोहॉर्मोने) यांची पुढीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे. ‘वनस्पतीतील हॉर्मोने ही वनस्पतीत तयार झालेली वृद्धिनियंत्रके असून अल्प प्रमाणात सुद्धा ती वनस्पतीच्या विविध शारीरिक क्रियांवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्या उगमस्थानापासून कार्यस्थलापर्यंत ती वाहून नेली जातात’.

ऑक्सिनाच्या शोधानंतर नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या इतर हॉर्मोनांचा शोध लागला, वनस्पतीमध्ये नैसर्गिक रीत्या निर्माण होणाऱ्या हॉर्मोनांचे सामान्यतः पुढील पाच गट कल्पिले आहेत. ऑक्सिने, जिबरेलिने, सायटोकायनिने, एथिलीन व ॲबसिसिक अम्ल.

ऑक्सिने : कायसिल्स्की (१८७२) आणि डार्विन (१८८०) हे अनुक्रमे मूळ आणि खोड यांच्यासंबंधी प्रयोग करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, मूळ आणि खोड या दोन्हींचीही वाढ त्यांच्या अग्राकडून नियंत्रित होते. त्यांच्या मते काही प्रभावी तत्त्वांचे अग्राकडून प्रत्यक्ष वृद्धीच्या ठिकाणी संक्रमण होणे आवश्यक असते. हा प्रभावी पदार्थ आगराच्या तुकड्यांमध्ये गोळा करता येतो असे वेंट यांनी दाखवून दिले (१९२८).

ऑक्सिन हे हॉर्मोन प्रकाशाच्या विरुद्ध बाजूला एकवटल्याने त्या बाजूची जास्त वाढ होऊन खोड प्रकाशाच्या बाजूस वळते.या गटातील सर्वप्रथम शोधला गेलेला घटक म्हणजे इंडॉल ३- ॲसिटिक अम्ल हा होय. याशिवाय अलीकडेच फिनिल ॲसिटिक अम्ल व ४-क्लोरो ३-इंडॉल ॲसिटिक अम्ल, हेही वनस्पतीत निर्माण होतात असे आढळून आले आहे. त्यांपैकी पहिले ऑक्सिन टोमॅटो, तंबाखू, वाटाणा, बार्ली व मका यांसारख्या अनेक वनस्पतींत आढळून आले, तर दुसरे वाटाणा व लाख (लॅथिरस) यांच्या अपरिपक्व बियांमध्ये असल्याचे निदर्शनास आले.

ऑक्सिनाचा संचार खालच्या दिशेने एका कोशिकेकडून दुसऱ्या कोशिकेकडून अशा प्रकारे होऊन ते खोडाच्या तळाशी आणि तेथून मुळाकडे जाते. या संचारास ध्रुवीय संचार असे संबोधले, तरी त्यांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नसतो. ऑक्सिन प्रकाशाच्या विरुद्ध बाजूस एकवटते. त्यामुळे त्या बाजूची जास्त वाढ होऊन खोड प्रकाशाच्या बाजूस वळते. क्षितिजसमांतर ठेवलेल्या खोडातही असाच प्रकार पाहवयास मिळतो. ऑक्सिने खालच्या बाजूस एकवटल्याने त्या बाजूची जास्त वाढ होऊन खोड वरच्या बाजूस वळते.

वनस्पतींमध्ये निसर्गतः तयार होणाऱ्या ऑक्सिनांखेरीज इंडोएथॅनॉल, बीटा नॅप्थॉक्सी ॲसिटिक अम्ल यांसारखी संश्लेषित (कृत्रिम) ऑक्सिनेही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. २, ४-डी म्हणजे २, ४-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्लाचा उपयोग निवडक तणांकरिता ताणनाशक म्हणून होतो परंतु सूक्ष्मप्रमाणात त्याचा उपयोग इतर ऑक्सिनांप्रमाणेच होतो.

जिबरेलिने : भाताच्या पिकावरील एका रोगाला कारणीभूत असलेल्या जिबरेल्ला फ्युजिकुरोई या बुरशीने संसर्ग झालेल्या वनस्पतीत तयार केलेल्या एका रसायनामुळे त्या रोपाची उंची अपवादात्मक रीत्या वाढते, असे जपानमध्ये १९२८ साली निदर्शनास आले.

याबुता आणि वाय्. सुमिकी यांनी १९३० मध्ये प्रथम जिबरेलिनांचे स्फटिक वेगळे करण्यात यश मिळविले. या गटात ज्ञात असलेली आयसोप्रिनॉइड कुलातील 62 प्रकारची संयुगे आहेत. प्रत्येक वनस्पतीत ६ ते १० प्रकारची जिबरेलिने आढळतात. त्यांतील काहीच जीवशास्त्रीय दृष्ट्या कार्यक्षम असतात. वनस्पतींच्या जातीनुसार जिबरेलिनाचे कार्य बदलते. जि. फ्युजिकुरोई ही बुरशी कृत्रिम माध्यमात ज्ञात संयुगांपैकी जिबरेलिक अम्ल या प्रकारची जास्तीत जास्त निर्मिती करते आणि प्रयोगाकरिता तेच जास्त प्रमाणात वापरतात.

जिबरेलिनाचे ऊतकसंवर्धनातील अगदी सूक्ष्म असे प्रमाणही निश्चित करण्याइतक्या संवेदनाक्षम जैव आमापन पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. वाटाणे, ओट, मका, वाल, सालीट इत्यादींचा उपयोग अशा प्रयोगांसाठी प्रामुख्याने करतात. या वनस्पतींचे बुटके वाण त्याकरिता जास्त सोयीचे असतात. जैव आमापनाबरोबरच जिबरेलिनांच्या विश्लेषणाचे तंत्र वापरल्यास त्यांची ओळख पटवून त्यांचे वर्गीकरण करणेही सुलभ होते.

  उच्चतर वनस्पतींमध्ये प्ररोहाग्र, मूलाग्र आणि फुलांमध्ये जिबरेलिनांची निर्मिती होते. वनस्पतीच्या अनेक जातींमध्ये जिबरेलिनांच्या निर्मितीचा संबंध हरितलवकांशीही जोडतात.

वनस्पतीची वाढ व विकास यांच्यात एकात्मता साधण्याचे महत्त्वाचे काम जिबरेलिने करतात. मात्र हॉर्मोन म्हणून त्यांचा सहभागाचा पुरावा मात्र फक्त सपुष्प वनस्पतींच्या संदर्भातच निःसंदिग्धपणे दिलेला आढळतो. वाहक वृंद ऊतक तंत्र असलेल्या इतर वनस्पतींमध्ये तसेच शेवाळ व शैवाल यांच्यामध्येही जिबरेलिनांच्या वापराने वाढ व विकास यांना चालना मिळते.

सपुष्प वनस्पतींच्या खोडाच्या लांबीमध्ये विशेषतः वाटाणा, मका, वाल यांच्या खुज्या वाणांमध्ये आणि गुच्छाकृती ठेवण (रोझेट) असलेल्या वनस्पतींत जिबरेलिनांच्या वापराचा नाट्यमय परिणाम दिसून येतो. जिबरेलिनांमुळे कोशिकावरणाची प्रसरणक्षमता वाढते आणि कोशिकांच्या प्रसरणाने खोडाची लांबी वाढते. पानाच्या वाढीमध्येही हीच प्रक्रिया दिसून येते. मुळांच्या वाढीत मात्र त्यांच्यामुळे अडथळा येतो आणि वाढ खुंटते.

पुष्पधारणेसाठी जास्त प्रकाशावधी लागणाऱ्या आणि जास्त वासंतीकरण आवश्यक असलेल्या वनस्पतींच्या पुष्पधारणेवर जिबरेलिनांचा लक्षणीय प्रभाव दिसून येतो. अशा वनस्पती पुष्पधारणेसाठी प्रतिकूल परिस्थितीत वाढत असताना जिबरेलिने दिल्यास पुष्पधारणा होते. बहुधा या वनस्पतींत पुष्पधारणेसाठी आवश्यक असलेल्या हॉमोनांच्या निर्मितीस जिबरेलिनांमुळे चालना मिळत असावी.

फुलातील लिंगप्रकटीकरणावरही या हॉर्मोनाचा प्रभाव दिसून येतो. बहुतेक एकत्रलिंगी आणि विभक्तलिंगी वनस्पतींत हे हॉर्मोन नरपुष्पांच्या निर्मितीस चालना देते. वनस्पतीच्या काही जातींत मात्र स्त्रीपुष्पांच्या निर्मितीस या हॉर्मोनामुळे चालना मिळते.

अनेक वनस्पतींच्या बिया, कंद, ग्रंथिक्षोड [अन्न साचविलेले मूलक्षोडाचे फुगीर टोक→खोड], कोरके यांमधील प्रसुप्तावस्था संपुष्टात आणण्याचे महत्त्वाचे कार्य जिबरेलिने करतात.    

फळ आणि बीज यांच्या विकासावर या हॉर्मोनाचा प्रभाव दिसून आला आहे. द्राक्षे, लिंबू, सफरचंद यांसारख्या व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या फळांच्या बीजरहित जातींची निर्मिती या हॉर्मोनाच्या साहाय्याने करता येते. [→फळबाग].    

मद्यार्कनिर्मिती क्षेत्रातही जिबरेलिनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

सायटोकायनिने : वनस्पतींमधील कोशिका-विभाजन प्रेरकांसाठी ही संज्ञा वापरतात. कोशिका-विभाजनावर नियंत्रण ठेवणारे काही विशिष्ट पदार्थ सजीवांमध्ये नैसर्गिक रीत्या असण्याची शक्यता डब्ल्यू. वीझनर यांनी दर्शविली होती (१८९२) परंतु त्याचे आकलन एफ्. स्कूग आणि त्यांचे सहकारी यांना १९४८ मध्ये ऊतकसंवर्धनाचे प्रयोग करताना झाले. तंबाखूवरील प्रयोगात ऑक्सिनांच्या संपर्कात भेंडाच्या कोशिकांचे विभाजन न होता फक्त त्यांचे आकारमान वाढले, परंतु वाहककोशिकांच्या संपर्कात मात्र त्यांचे विभाजन होऊ शकले, असे त्यांच्या निदर्शनास आले. १९५६ मध्ये सी. ओ. मिलर यांनी कोशिका-विभाजनाला प्रेरक असा एक अत्यंत कार्यक्षम घटक शुद्ध स्वरुपात वेगळा करण्यात यश मिळविले व त्याचे ६-(फुरफुराल अमायनो) प्यूरीन असे नामकरणही त्यांनी केले. कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेल्या कायनेटिनामध्ये कोशिका-विभाजनास चालना देण्याची क्षमता फार उच्च दर्जाची असल्याचे प्रयोगान्ती लक्षात आले आहे.    

सायटोकायनिनासारखी प्रेरणाक्षमता असलेले पदार्थ विविध वनस्पतींत मोठ्या प्रमाणावर आढळतात. १९६३ मध्ये डी. एस्. लेथॅम यांनी मक्याच्या अपक्व दाण्यांमधून झिॲटीन हे द्रव्य वेगळे करण्यात यश मिळविले. तसेच १९७३ मध्ये झिॲटीन रायबोसाइड, झिॲटीन रायबोटाइड आणि इतर सायटोकायनिनेही विभक्त केली.

आतापर्यंत ज्ञात झालेली सर्व नैसर्गिक सायटोकायनिने ⇨प्यूरीन  या रासायनिक गटाशी संबंधित आहेत. अनेक जीवाणू व बुरशीच्या संपर्कात संवर्धक गालितातही मुक्त सायटोकायनिने आढळली आहेत. कोशिका-विभाजनाबरोबरच शरीराच्या इतर प्रक्रियांवरही या हॉर्मोनाचा प्रभाव जाणवतो. तो सारांशरुपाने पुढीलप्रमाणे सांगता येईल : (१) अवयवांमध्ये कोशिकासमूहाच्या विकासात सायटोकायनिनांच्या प्रमाणातील सूक्ष्म भेदाचाही प्रभाव पडतो. सायटोकायनिन व ऑक्सिन गुणोत्तराच्या निम्न स्तरामुळे मुळांच्या वाढीस चालना मिळते. हे गुणोत्तर वाढेल तसा त्याचा प्रभेदनावर परिणाम होऊन कोशिकासमूहाची भेदरहित वाढ दिसून आली. कायनेटिनाचे प्रमाण ०.२-१.० मिग्रॅ./लि.पर्यंत वाढविल्याने त्यात कोरके तयार झाली. (२) सायटोकायनिनांमुळे कोशिकांचे आकारमान वाढून त्यामुळे पानांचे आकारमान वाढते. (३) बाह्यतः सायटोकायनिने दिली असता हरितद्रव्य नाहीसे होण्याच्या आणि प्रथिनांचे अपघटन होण्याच्या क्रिया लांबतात आणि पानांचा हिरवेपणा टिकून राहतो. अशा प्रकारे हे हॉर्मोन पानांच्या जीर्णतारोधाचे काम करते. (४) प्रकाशाच्या प्रभावाखाली असलेल्या बीजांकुरण, रंगद्रव्यसंश्लेषण, हरितलवकांची निर्मिती यांसारख्या अनेक क्रिया सायटोकायनिनांमुळे होतात, असे आढळून आले आहे.

एथिलीन : H2C = CH2 सूत्र असलेला हा एक रंगहीन, असंपृक्त, हायड्रोकार्बनी वायू आहे. पॉलिएथिलीन, एथिलीन डायक्लोराइड, एथिलीन ऑक्साइड, व्हिनिल क्लोराइड इ. अनेक रसायनांच्या निर्मितीकरिता हा वायू तयार केला जातो. एथेनॉल, व्हिनिल ॲसिटेट आणि ॲसिटाल्डिहाइड हे त्याचे इतर परंतु महत्त्वाचे अनुजात पदार्थ आहेत.

एथिलीन हा वायू वनस्पतींमध्ये नैसर्गिक रीत्या तयार होतो, हे १९३४ मध्ये सप्रमाण सिद्ध करण्याचे श्रेय आर्. गेन या शास्त्रज्ञांकडे जाते. त्यानंतर थोड्याच काळात डब्ल्यू. क्रॉकर, ए. ई. हिचकॉक व पी. डब्ल्यू. झिमरमान (१९३५) या शास्त्रज्ञांनी असे सुचविले की, फळांच्या पक्वतेस कारणीभूत असणारे एथिलीन हे हॉर्मोन असून वनस्पतीच्या शाकीय अवयवांमध्येही त्याचे नियंत्रक म्हणून कार्य चालते. एस्. पी. बर्ज (१९६२), एफ्. बी. ॲबेलिस (१९७३) यांच्या मते वनस्पतीच्या प्रत्येक भागांत एथिलीनाची निर्मिती होते. त्याचे प्रमाण मात्र कोशिकासमूह आणि वाढीची स्थिती यांनुसार बदलते. उदा., रुजणाऱ्या बियांमध्ये बिजावरण छेदण्यास आदिमूळाने सुरुवात करताना तसेच आदिकोरक जमिनीतून वर येत असताना हे प्रमाण जास्तीत जास्त असते. सामान्यतः वर्धिष्णू ऊतक आणि पेरांमध्ये एथिलीन जास्त वेगाने निर्माण होते.

सपुष्प वनस्पतींप्रमाणेच पेनिसिलियम, ॲस्परजिलस, फ्युझेरियम, म्युकर यांसारख्या बुरशींच्या काही प्रजातींमध्येही एथिलीन निर्मितीची क्षमता आहे. अवायुजीवी स्थितीमध्ये मात्र वनस्पती ऊतक एथिलीन निर्माण करु शकत नाहीत.


कृत्रिमपणे तयार केलेल्या एथेफॉन या द्रवरुप पदार्थापासून एथिलीन हा वायू मुक्त होतो. टोमॅटोच्या झाडाची फळे तोडण्यापूर्वी त्यावर एथेफॉनाची फवारणी केल्यास फळे चौदा दिवस आधी आणि समप्रमाणात पिकतात. अननसाच्या पिकावर एथेफॉनाची फवारणी केल्यास फळांचे आकारमान व वजन वाढते आणि ती लवकर व एकाच वेळी काढणीस तयार होतात. एथेफॉनाचा कॉफी, ऊस या पिकांवरही अनुकूल परिणाम दिसून येतो. उसाची तोडणी करण्यापूर्वी एथेफॉनची फवारणी केल्यास कांड्यांची लांबी वाढते व उत्पादन १५ ते २५ टक्क्यांनी वाढते, साखरेचा उताराही वाढतो. लागवड केलेल्या उसाला एथेफॉनाच्या फवारणीने जास्त फुटवे येतात. त्यामुळे उत्पन्न वाढते उसाला फुलोरा येण्यास प्रतिबंध झाल्याने साखरेचे प्रमाण घटत नाही. त्याच्या वापराने काकडी वर्गीय वेलींवर नर फुलांची संख्या कमी होऊन मादी फुलांची संख्या वाढते. त्यामुळे उत्पादन वाढते. तृणधान्य पिकाचे खोड काटक होते आणि पीक जमिनीवर लोळत नाही. बटाट्याचे सुप्तावस्थेतील डोळे लवकर फुटतात. 

झड (गळ) किंवा आपाच्छेदन म्हणजे, पान फूल, फळ यांसारखे अवयव वनस्पतीपासून गळून पडणे. या क्रियेचा एथिलिनाशी निकटचा संबंध आहे. झडीच्या बाबतीत ऑक्सिन आणि एथिलिनाच्या क्रिया परस्परविरोधी आहेत. ऑक्सिनामुळे झड रोखली जाते, तर एथिलिनामिळे झडिस चालना मिळते. एथिलिनामुळे (१) ऑक्सिनाची निर्मिती थांबते (२) असलेल्या ऑक्सिनांचा नाश होतो व (३) ऑक्सिनांचे वहन थांबते, असे दिसून आले आहे. याबरोबरच कोशिकावरणाच्या विघटनास कारणीभूत असणाऱ्या सेल्युलेज या एंझाइमाची निर्मिती आणि त्यायोगे कोशिकांचा नाश यांसारख्या क्रियांना चालना मिळते परिणामतः तो अवयव गळून पडतो.

ॲबसिसिक अम्ल : वनस्पतींची वृद्धी नियंत्रित करणाऱ्या पाच प्रमुख वृद्धिनियंत्रकांपैकी हे एक आहे. उच्च वर्गीय वनस्पतींमध्ये ॲबसिसिक अम्ल सरसहा आढळते. कोवळ्या पानांत आणि वर्धिष्णू फळे व बिया यांच्यात या नियंत्रकाचे प्रमाण सर्वाधिक असते. काही शैवलांमध्ये तसेच कित्येक वनस्पतिरोगकारक बुरशीच्या प्रजातींमध्येही ॲबसिसिक अम्ल तयार होते.

टर्पिनॉइड जातीचे हे वृद्धिनियंत्रक बाष्पनशील तेले, जिबरेलिने, कॅरोटिनॉइडे, स्टेरॉइडे यांसारख्या टर्पिनॉइडाप्रमाणेच मॅव्हलोनिक अम्ल या पूर्वद्रव्यापासून तयार होते.

टोमॅटोच्या ‘फ्लॅक्का’ आणि बटाट्याच्या ‘ड्रूपी’ या उत्परिवर्तित प्रकारांच्या [वारसारुपाने संततीत उतरु शकणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये बदल केलेल्या प्रकारांच्या→उत्परिवर्तन] अभ्यासातून ॲबसिसिक अम्लाच्या कार्यावर प्रकाश पडतो. या दोन्ही प्रकारांत हे नियंत्रक अल्प प्रमाणात तयार होते. त्यामुळे त्याची पर्णरंध्रे बंद होत नाहीत. परिणामी बाष्पोच्छ्‌वास जास्त होऊन त्या वनस्पती कोमेजतात. हे वृद्धिनियंत्रक दिल्यास वनस्पतींतील त्याची कमतरता भरुन निघते.

ॲबसिसिक अम्लाला ताण निवारक हॉर्मोन असे म्हणता येईल. कारण या हॉर्मोनामुळे वनस्पतींना जाणवणाऱ्या थंडी, क्षारता यांसारख्या ताणांची तीव्रता कमी होते.

ॲबसिसिक अम्लामुळे प्ररोहाची आणि पानांची आकारमानातील वाढ थांबते. याउलट काही परिस्थितीत मुळांच्या वाढीस चालना मिळते. अवर्षण परिस्थितीत तग धरण्यासाठी या गुणधर्माचा वनस्पतींना उपयोग होतो.

पुष्पफलनानंतर बीजकाचे बीजामध्ये रूपांतर होते. या बदलाच्या उत्तरावस्थेत आत असलेला गर्भ सुप्तावस्थेत प्रवेश करतो व बीज शुष्क होते. गर्भविकास होत असताना बीजामध्येच तयार झालेले ॲबसिसिक अम्ल बदलाच्या या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.ॲबसिसिक अम्लाच्या प्रभावामुळे बियांच्या सुप्तावस्थेचा कालावधी वाढतो, परंतु असा उपचार केलेले बीं पाण्याने धुतल्यास ही सुप्तावस्था संपते.

यांशिवाय एमएच (मॅलेइक हायड्राझाइड), ॲमो-१६१८ फॉस्फॉन डी, सीसीसी (२ क्लोरोएथिल ट्रायमिथिल अमोनियम क्लोराइड), एसएडीएच (सक्सिनिक अम्ल) ही या गटातील कृत्रिम हॉर्मोने आहेत. एमएच हॉर्मोनाचा उपयोग साठवणीतील बटाटे व कांदे यांचे कोंब फुटणे रोखण्यासाठी, तंबाखूचे फुटवे फुटू नयेत म्हणून आणि गवताची वाढ नियंत्रित करण्यासाठी होतो. कपाशीच्या पिकावर सीसीसी फवारल्याने पानांची वाढ कमी होऊन बोंडे अधिक धरतात.

अलीकडे शेतीमध्ये हॉर्मोनांचा अधिकाधिक उपयोग केला जात आहे. नवनवीन कृत्रिम हॉर्मोने बाजारात उपलब्ध होत आहेत. उदा., मिक्स्टॅलॉल हे लांब साखळीच्या अल्कोहॉलाचे मिश्रण असून त्याने ⇨प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, पानातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते. लोहाचे अधिक शोषण होते आणि सी३ वर्गातील पिकामध्ये प्रकाश श्वासोच्छ्‌वासाचा वेग कमी होतो. भात पिकात फुटव्याची संख्या वाढते. वाटाण्याच्या झाडाला अधिक शेंगा लागतात आणि त्या शेंगात अधिक दाणे असतात. मका, ज्वारी, बार्ली, गहू, वांगी, टोमॅटो, मिरची, कापूस, भुईमूग, भेंडी, टॅपिओका इ. पिकांचे उत्पादन या हॉर्मोनाच्या वापराने वाढल्याचे आढळून आले आहे.                   

पहा : वनस्पतींची अभिवृध्दि    वनस्पतींचे खनिज पोषण वृध्दि, वनस्पतींची.             

संदर्भ: Weaver, R. J. Plant Growth Substances in Agriculture, San Francisco, 1972.                                       

बागूल, रवींद्र गं. राहुडकर, वा. ब.