ऐन : (मोदत हिं. असन, साज, साइज गु. हंद्री, साद्री, साडरो क. कारेमट्टी, माटली इं. लॉरेल लॅ. टर्मिनॅलिया टोमेंटोजा कुल-काँब्रेटेसी). हा मोठा

२४ — ३० मी. उंच, २ – ३ मी. घेराचा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र (राजस्थानाखेरीज) ओलसर प्रदेशात, महाराष्ट्रातील बहुतेक मिश्र जंगलांत, पंजाब ते आसाम विभागात व श्रीलंकेत आढळतो. कोकणात घाटाच्या पायथ्याशी व प. घाटातही विपुल आहे. साल जाड, करडी किंवा कमी अधिक काळसर असून त्यावर लांबट आडव्या उभ्या रेषा असतात. पाने(७·५ – २ X ५ – ७·५ सेंमी.) साधी, साधारणत: समोरासमोर किंवा एकांतरित (एका आड एक), अंडाकृती किंवा लांबट, आखूड देठाची, गुळगुळीत अगर थोडीफार लवदार व चिवट कोवळ्या भागांवर सर्वत्र तांबूस लव असते. पानाच्या मध्य शिरेच्या तळास दोन प्रपिंड (ग्रंथी) असतात. फुले द्विलिंगी, फिकट पिवळी व लहान असून एप्रिल-मेमध्ये परिमंजरीत येतात. पाकळ्या नसतात इतर सामान्य लक्षणे काँब्रेटेसी  कुलातील वर्णनाप्रमाणे. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ लंबगोल, पिवळट पिंगट, कडक व पंखयुक्त असल्याने वाऱ्याने जानेवारी – एप्रिलमध्ये पसरविले जाते. पंख पाच असून प्रत्येकावर आडव्या रेषा असतात. जानेवारी मार्चमध्ये पाने गळतात व जूनमध्ये नवीन येतात.

रसकाष्ठाचा (मऊसर, कोवळ्या जिवंत किंवा शरीरक्रियेच्या दृष्टीने क्रियाशील असलेल्या काष्ठाच्या बाह्य भागाचा) रंग तांबूस पांढरा व मध्यकाष्ठाचा काळसर तपकिरी असतो त्यात गडद रंगाच्या रेषा असल्याने लाकूड शोभिवंत दिसते ते कठीण, बळकट व टिकाऊ असल्याने सागाच्या खालोखाल त्याचे महत्त्व आहे. घरबांधणी, जहाजबांधणी, शेतीची अवजारे, पायाडे इत्यादींकरिता उत्तम असते. जळण व कोळसा बनविण्यास चांगले. सालीपासून १५% टॅनीन व काळा रंग मिळवितात. साल व फळे कातडी कमाविण्यास व कोळ्यांची जाळी रंगविण्यास वापरतात ही हिरड्यापेक्षा कमी प्रतीची असतात. इतर काही सालींबरोबर वापरून लालसर रंग बनवितात व त्यात पोती रंगवितात. लहान फांद्यांवर साठलेली लाख गोळा करतात. या झाडांपासून पिंगट रंगाचा डिंक मिळतो त्याचा सुगंधी धुपासारखा व सौंदर्यप्रसाधनात घालण्यास उपयोग करतात. सालीच्या राखेपासून मिळणारा चुना तांबूल-भक्षणास द. भारतात वापरतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी) व हृदयास बल देणारी आहे. साल पाण्यात उगाळून जखमांवर लावतात. सालीचे चूर्ण अतिसार, संग्रहणी इ. विकारांवर देतात. याच्या पानावर टसर जातीच्या रेशमी किड्यांचे संवर्धन करतात. गुरांना याचा पाला चारा म्हणून घालतात.

पहा : अर्जुनसादडा बेहडा हिरडा.

कुलकर्णी, उ. के.