वनस्पतींचे त्रुटिजन्य रोग : वनस्पतींना आवश्यक असणाऱ्यापोषक द्रव्यांची उणीव असल्यास किंवा त्यांचे प्रमाण कमी असल्यास वनस्पतींना होणाऱ्या रोगांना त्रुटिजन्य रोग म्हणतात. वनस्पतीच्यावाढीसाठी दहा मूलद्रव्यांची जरूरी असते. ती म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, मॅग्नेशियम व लोह. ह्यांपैकी दोन मूलद्रव्ये म्हणजे कार्बन व ऑक्सिजन ही हवेतील कार्बन डाय-ऑक्साईडामधून मिळू शकतात. हायड्रोजन हे मूलद्रव्य पाण्यातून मिळू शकते. बाकीची सात मूलद्रव्येमूलद्रव्यांच्या लवणांच्या रूपात (म्हणजे नायट्रेट, नायट्राइट, फॉस्फेट, कार्बोनेट, बोरेट, क्लोराइड, क्लोरेट, सल्फाइड व ऑक्साइड) वनस्पती मृदेतील पाण्यातून शोषून घेतात. कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ह्यांच्या संयोगापासून वनस्पती कार्बोहायड्रेटे तयार करतात तर नायट्रोजन, फॉस्फरस व गंधक यांच्या संयोगाने प्रथिने तयार होतात. लोहामुळे पानांतील हरितद्रव्य तयार होते. कॅल्शियमाची नवीन पानांच्या वाढीकरिता जरूरी असते व त्याच्यामुळे कोशिकामित्ती (पेशीमित्ती) तयार होतात. ह्याशिवाय वनस्पतींना बोरॉन, मॅंगनीज, जस्त व मॉलिब्डेनम ह्यांची अगदी अल्प प्रमाणात जरूरी असते म्हणून ह्यामूलद्रव्यांना लेश मूलद्रव्ये म्हणतात.  

हवेत नायट्रोजनाचे प्रमाण पुष्कळ असते पण तो नायट्रोजन सर्व वनस्पतींना शोषून घेता येत नाही. ⇨फक्त लेग्युमिनोजीकुलातील वनस्पती त्यांच्या मुळांवर असलेल्या गाठींतील सूक्ष्मजंतुद्वारे हवेतील नायट्रोजन शोषून घेऊ शकतात आणि अशा नायट्रोजनाचा उपयोग वनस्पतींना होतो, हे प्रयोगान्ती सिद्ध झाले आहे. [⟶नायट्रोजन].  

पिके जमिनीतील मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात व दिवसेंदिवस पिकांची लागवड केल्याने जमिनीतील या मूलद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन ती जमीन निकृष्ट बनते व त्यामुळे पुढील पिकांना ही मूलद्रव्ये योग्य प्रमाणात मिळू शकत नाही. काही वेळा मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असून सुद्धा जमिनीच्या कमीअधिक अम्लतेमुळे ती वनस्पतींना मिळू शकत नाहीत, तर काही मूलद्रव्ये जमिनीत जास्त प्रमाणात असल्याने वनस्पतींना इजा होते. बहुतेक जमिनींत वनस्पतींना लागणारी सर्व मूलद्रव्ये असतात परंतु काही वेळेस एक किंवा एकाहून जास्त मूलद्रव्ये योग्य प्रमाणात जमिनीत उपलब्ध नसतात. त्यामुळे वनस्पतींना त्रुटिजन्य विकृती किंवा रोग होतात. त्रुटिजन्य रोगाची लक्षणे म्हणजे वनस्पतीची वाढ खुंटणे, पानांचा रंग पिवळसर होऊन ती भुरकट होणे, फळांचे आकारमान लहान होऊन ती गळणे, पानावर पिवळसर चट्टे पडणे, पाने सुरकुतणे, पाणे तपकिरी रंगची होणे वगैरे.

त्रुटिजन्य रोगावर उपाय म्हणून प्रथम जमिनीची तपासणी करूनतीत कोणती मूलद्रव्ये कमी व कोणती जास्त आहेत, हे पहावे लागते. महाराष्ट्रातील जमिनींत मुख्यत्वेकरून नायट्रोजन व फॉस्फरस यांची उणीव भासते. ही उणीव नायट्रोजनयुक्त व फॉस्फरसयुक्त खते जमिनीसरोगाच्या प्रथमावस्थेत देऊन भरून काढता येते. त्यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते व रोग नाहीसा होतो. नायट्रोजनाची उणीव हिरवळीची खते देऊनही भरून काढता येते. पुष्कळ वेळा रासायनिक खते एकेरी किंवा पूर्ण खते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशयुक्त अशी खते पिकांना देतात [⟶खते]. नायट्रोजनयुक्त खत पाण्यात मिसळून त्याचा फवारा पिकाच्या पानांवर दिला असता त्याचाही चांगला फायदा होतो, असे दिसून आले आहे. महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या उणिवेमुळे उद्‌भवणारे त्रुटिजन्य रोग व त्यांवरील उपाय यांचे विवरण खाली केले आहे.  

नायट्रोजन : महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जमिनीत नायट्रोजनाचे प्रमाण कमी आहे. नायट्रोजन हे मुलद्रव्य जीवनसत्त्वाचा एक घटक भाग आहे. त्याच्या अभावी पानाचा हिरवा रंग फिकट हिरवा किंवा पिवळसर हिरवा होतो. पानांच्या शिरा हिरव्या दिसतात. झाडांची देठही पिवळसर होतात. जुनी पाने भुरकट दिसतात. झाडांची वाढ खुंटते व मुळांची वाढ फार होते. फुले व फळे लवकर धरत नाहीत. फळाचे आकारमान लहान होते व फळे गळून पडतात. रोगाचे निवारणकरण्याकरिता पिकाला नायट्रोजनयुक्त खते उदा., अमोनियम सल्फेट अथवा यूरिया देतात. मुख्य पिकामध्ये कडधान्य (डाळीच्या) वर्गातील पिके म्हणजे तूर, चवळी, उडीद अथवा हरभरा ह्यांच्या काही ओळी पेरतात. त्यामुळे हवेतील नायट्रोजन मुख्य विकास उपलब्ध होतो.

फॉस्फरस : नायट्रोजनापम्राणे फॉस्फरसाचे जमिनीतील प्रमाण कमी असते. वनस्पतींच्या कोशिकांत व जीवनसत्त्वांत फॉस्फरस असतो. त्याच्या अभावी झाडांची कोवळी पाने गर्द हिरवी दिसतात.पानांच्या लांबीच्या मानाने रूंदी कमी असते. पानावर व खोडावर तांबूस ठिपके पडतात. पक्व पाने जांभळ्या रंगाची होतात व लवकर गळतात. झाडे खुजी होतात व त्यांना फळे कमी लागतात. फळे पक्व होण्यास वेळ लागतो. सुपरफॉस्फेट खत पेरणीपूर्वी जमिनीस दिल्याने फॉस्फरसाची उणीव भरून निघते.  

पोटॅशियम : पोटॅशियमाची उणीव बटाटे, तंबाखू, कापूस, कोबी व द्राक्षे ह्या पिकांमध्ये दिसून येते. सर्वसाधारणपणे पोटॅशियमाच्या उणिवेने झाडांची पाने केवड्याच्या रंगाची होतात. त्यामुळे ⇨प्रकाशसंश्लेषण कमी प्रमाणात होते. जुनी पाने फिकट तपकिरी रंगाची होऊन करपून जातात. झाडांचे शेंडे वाळू लागतात. कोवळी पाने आकसून ती तांबूस रंगाची होतात व शेवटी पाने काळसर हिरवी पडतात. ह्या रोगामुळे कोबीच्या झाडाची वाढ खुंटते व गड्डे घट्ट होत नाहीत. कोबीची जुनी पाने पिवळी पडून ती तपकिरी रंगाची होतात. बटाट्याच्या झाडाची वाढ चांगली होत नाही. पोटॅशयुक्तखते जमिनीतून किंवा झाडावर फवारून दिल्याने पोटॅशियमाची उणीव भरून निघते. 

कॅल्शियम : कॅल्शियमचे प्रमाण जून पानांत अधिक आढळते. याच्या उणिवेने पानाच्या कोशिकांची वाढ थांबते. कोवळ्या पानांचा रंग फिकट हिरवा होतो व त्यांची टोके खाली वळतात. पानांवर कळे चट्टे दिसतात. झाडाचा वा रोपाचा शेंड्यापासून खाली खोडापर्यंत अशा क्रमाने नाश होतो. सुपरफॉस्फेट खतामधील कॅल्शियमामुळे अथवा जिप्सम खत दिल्याने कॅल्शियमाची उणीव भरून काढता येते.   

 

गंधक : पानांतील हरितद्रव्यनिर्मितीस गंधकाची जरूरी आहे. गंधकाच्या अभावामुळे कोवळ्या पानांच्या शिरा फिकट हिरव्या दिसतात. कोशिकाविभाजन, फळे धरणे वगैरे प्रक्रिया मंदावतात व कालांतराने पूर्णपणे थांबतात, अमोनियम सल्फेट खतामधून जमिनीस दिल्याने गंधक उपलब्ध होतो.  


 मॅग्नेशियम : मॅग्नेशियमाच्या उणिवेची लक्षणे प्रथम खालच्या पानांवर दिसतात. हरितद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने घेवड्याच्या व टोमॅटोच्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळसर दिसतो व शिरांचा रंगफिकट हिरवा होतो. झाडांवर मॅग्नेशियम सल्फेटाचा फवारा दिल्याने चांगला परिणाम दिसून येतो.  

लोह : पानांतील हरितद्रव्यनिर्मितीकरिता लोहाची जरूरी असते.त्याच्या अभावी झाडांची कोवळी पाने पिवळी पडतात व पानाच्या शिरांचा रंग गर्द हिरवा होतो. थोड्याच दिवसांत सर्व पान पांढरे पडते.रोग निवारण्याकरिता जमिनीस फेरस सल्फेट (हिराकस) व गंधक यांचे (५०:५०) मिश्रण देतात किंवा पानांवार फेरस सल्फेट फवारतात.  

बोरॉन : चुनखडीच्या जमिनीत बोरॉनाची उणीव जास्त भासते. बोरॉनाच्या अभावी रताळ्याच्या वेलाच्या शेंड्याची वाढ थांबते, पानांचे देठ वाकडे होतात व पाने पिवळी पडून गळतात. लेग्युमिनोजी कुलातील वनस्पतींच्या मुळांवरील गाठींची निर्मिती थांबते, वनस्पतींची वाढ खुंटते व त्या खुरट्या बनतात, गाभ्यातील ऊतके (कोशिकासमूह)तपकिरी होतात. शर्करा बीटमधील कुजण्याची क्रिया, बटाट्याच्यापानांची सुरळी होणे, फुलकोबी तपकिरी होणे वगैरे विकृतीही बोरॉनच्या अभावी होतात. हेक्टरी २२किग्रॅ. बोरॅक्स जमिनीस पेरणीपूर्वी दिले असता रोगाचे निवारण होते.  

मॅगनीज : चुनखडीयुक्त जमिनीत मॅंगनीजाची उणीव भासते. रोगामुळे वरच्या पानाच्या शिरांमधील भाग पिवळा होतो पण शिरांचा रंग हिरवा राहाते व पाने वाळून जातात पालक, घेवडा व बटाटे या पिकांवर हा रोग विशेषत्वाने आढळतो. टोमॅटोची कोवळी पाने पिवळी पडून त्यांवर डाग पडतात व झाडे खुजी होतात. ओटमध्ये पानांवर करडे डाग, तर शर्करा बीटमध्ये पिवळसर डाग दिसतात. हेक्टरी १००कि ग्रॅ. मॅग्नीज सल्फेट देणे इष्ट ठरते.  

जस्त : जस्ताची उणीव चुनखडीयुक्त जमिनीत जास्त प्रमाणात आढळून येते. मोसंबीवरील केवडा रोग, द्राक्षाची लहान पाने व सफरचंदाचा पर्णगुच्छ हे रोग जस्ताच्या उणिवेमुळे होतात. मोसंबीच्या केवडा रोगात पाने बारीक होऊन त्यांचा रंग केवळ्यासारखा दिसतो. पानांचा टवटवीतपणा जाऊन ती गळतात. रोगाचे निवारण करण्याकरिता ११किग्रॅ. झिंक सल्फेट ४५०लिटर पाण्यात मिसळून ते मिश्रण झाडांवर फवारतात.  

मॉलिब्डेनम : मॉलिब्डेनमाची उणीव काही थोड्या जमिनींतच दिसून येते. ह्या रोगात टोमॅटोच्या पानांच्या शिरांमधील भाग पिवळसर दिसतो. नवीन पाने पिवळी पडून त्यांवर डाग पडतात. पानांच्या कडावळतात व ती वरपासून गळू लागतात. हेक्टरी एक किग्रॅ. सोडियम अथवा अमोनियम मॉलिब्डेट जमिनीस दिले असता त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

पहा : खते मृदा वनस्पतींचे खनिज पोषण.

संदर्भ : 1. Barker, S. A. and others, Hunger Signs in Crops, New York, 1964.  

           2. Heald, F. D. Manual of Plant Diseases, New Delhi, 1963.  

           3. Walker, J. C. Plant Pathology, New York, 1969.

वांगीकर, प. द.