रोहिश : (रोज गवत हिं. रौसा घास गु. रोश सं. रोहिष, भुतिका, सुगंधिका इं. कॅमल हे लॅ. सिबोपोगॉन शोनॅन्थस कुल-ग्रॅमिनी). एक उपयुक्त व तैलयुक्त गवत. वाळा, गुच्छ, रोशा गवत, गवती चहा इ. गवतांच्या सिंबोपोगॉन प्रजातीतील ही वनस्पती असून तिचा प्रसार मोठा आहे. या प्रजातीत सु. ६० जाती रोहिश : (१) वनस्पतीचा भाग, (२) फुलोरा, (३) कणिशके धारण करणारी शाखा.असून त्यांपैकी भारतात २० आढळतात. रोहिशचे मूळ उत्पत्तिस्थान आशिया व आफ्रिका खंडांत मोरोक्कोपासून सिंधपर्यंत असून भारतातील उष्ण भागांत रानटी स्थितीत किंवा लागवडीत ते आढळते. पंजाब ते ब्रह्मदेशपर्यंत व प. आणि द. भारतात त्रावणकोरपर्यंतही त्याचा प्रसार झालेला आढळतो. या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) व झुबक्यासारखी उगवणाऱ्या ⇨ षधीची उंची सु. एक मीटर असते. पाने अरुंद, सु. २३ सेंमी. X १ मिमी. व सुगंधी असतात. त्यांवर तळाशी लहान केसाळ, ताठर व पापुद्र्यासारखे उपांग (जिव्हिका) असते. फुलोरा लांब, झुबकेदार आणि जमिनीतील खोडापासून [मूलक्षोडापासून ⟶ खोड] वर आलेल्या सरळ उभ्या फांदीवर असतो. तो शाखामुक्त [परिमंजरी प्रकारचा ⟶ पुष्पबंध] असून त्यावर लहान फुलोरे (कणिशके) जोडीने येतात. आकार व लिंग या दृष्टीने ती सारखी नसतात. काही बिनदेठांची कणिशके स्त्रीलिंगी किंवा उभय लिंगी असतात. पुं. व स्त्री. पुष्प एकाच झाडावर व फुलोऱ्यात असतात. एका कणिशकात एकच फूल असते व ते नर, मादी किंवा द्विलिंगी असते. फुले ऑक्टोबर ते नोव्हेंबरात येतात. त्यात दोन लघुतुषे (सूक्ष्म, मांसल तुसे) व नर फुलात ३ केसरदले असतात. किंजले दोन असतात [⟶ फूल]. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी अथवा तृणकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. खानदेश व पंचमहाल येथे रोहिशची विशेष लागवड हलक्या जमिनीत करतात. पानांत प्रतिशत ०.४-०.८ सुगंधी तेल असते. पानांचे तेल काढतात. त्याला ‘रोशेल तेल’ म्हणतात. कोवळ्या पानांतून अधिक व चांगले तेल मिळते. ते ऊर्ध्वपातनाने काढतात. ते पिवळट व सुगंधी (गुलाबासारखे) असल्याने साबण व सुवासिक द्रव्ये बनविण्यास उपयुक्त असते. तंत्रिकाशूल व संधिवात यांवर लावण्यास ते वापरतात. गवताचा काढा सर्दी, पडसे व तापावर देतात. ही वनस्पती कडवट, जहाल व तिखट असते. ही खोकला, वेदना, हृदयविकार, घशाचे विकार व लहान मुलांचा अपस्मार इत्यादींवर उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात नमूद आहे. वायूने सांधे अगर अंग दुखत असल्यास रोशेल तेल चोळतात.

संदर्भ : 1. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV, New Delhi, 1975.

           २. देसाई, वा. ग. धीसंग्रह, मुंबई, १९७५. 

           ३. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

ठोंबरे, म. वा.