पॅसिफ्लोरेसी : (कृष्णकमळ कुल इं. पॅशनफ्लॉवर फॅमिली). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील एक लहान कुल. याचा अंतर्भाव जे. हचिन्सन आणि जी. बेंथॅम व जे. डी. हुकर यांनी पॅसिफ्लोरेलीझ या गणात केला असून ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी परायटेलीझ या गणात केला आहे. बेंथॅम आणि हुकर यांच्या पद्धतीत पॅसिफ्लोरेसीशिवाय ॲकॅरिएसी, ⇨ कॅरिकेसी (पपई कुल) आणि मॅलेशेर्बिएसी या कुलांचाही त्यात समावेश केला आहे. कृष्णकमळ ज्या वंशात (पॅसिफ्लोरा) घातले आहे त्यातील जातींची संख्या सर्वांत जास्त (सु. ५००) असल्याने येथे कुलाला ‘कृष्णकमळ कुल’ असे मराठी नाव दिले आहे. ह्या कुलात एकूण १२ वंश व ६०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते ११ वंश व ६०० जाती ए. बी. रेंडल यांच्या मते ५०० जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधात व समशीतोष्ण कटिबंधातील उबदार प्रदेशांत आहे अमेरिकेत विशेष प्रसार आहे. बहुतेक जाती ओषधीय [⟶ ओषधि] व झुडपे [⟶ क्षुप] आणि कित्येक कक्षास्थ(पानांच्या बगलेतील) तणाव्यांच्या साहाय्याने आधारांवर चढणाऱ्या वेली आहेत. पाने साधी किंवा खंडयुक्त (काहीशी विभागलेली), एकाआड एक उपपर्णयुक्त असून देठावर प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुले (कक्षास्थ) एकेकटी किंवा कुंठित (मर्यादित) [वल्लरी ⟶पुष्पबंध] फुलोऱ्यावर येतात ती नियमित, त्रिभागी, द्विलिंगी किंवा एकलिंगी व बहुधा विभक्त वनस्पतीवर असतात, पुष्पस्थली (देठावरच्या फुलाचा तळभाग) विविध आकारांची, कधीकधी पोकळ व पेल्यासारखी किंवा उथळ बशीप्रमाणे किंवा फुलांमध्ये केसरदलांखाली किंवा किंजमंडलाखाली दांड्यासारखी (किंजधर किंवा केसधर) असते त्यापासून शेंड्यावर पाकळ्यांसारख्या किंवा केसरदलांसारख्या उपगांचे मंडल (तोरण) असते. संदले ३–५ व सुट्टी प्रदले ३–५ सुटी किंवा कधी नसतात केसरदले ३–५ किंवा १० परागकोश सहज हालणारे (विलोल) किंजदले तीन, जुळलेली आणि उर्ध्वस्थ असून किंजपुटात एक कप्पा व तटलग्न बीजकविन्यास(कप्प्याच्या पोकळीत भिंतीवर अनेक बीजके चिकटलेली) असतो बीजके अधोमुखी किंजल एक किंवा शाखायुक्त अथवा ३-५ स्वतंत्र किंजले [⟶ फुल]. मृदुफळ किंवा बोंड बियांवर मांसल अध्यावरण (बीजावरणावर एक अधिक अपूर्ण आवरण किंवा वाढलेला भाग) व आत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) असतो. पॅसिफ्लोरा, ॲडेनिया, ट्रिफोस्टेमा, डिडॅमिया इ. वंश प्रमुख आहेत. भारतात पहिल्या दोन वंशांतील जाती आढळतात पॅसिफ्लोराच्या २४ वॲडेनियाच्या ५ जाती असून त्यांपैकी पॅसिफ्लोरा वंशातील ⇨ कृष्णकमळ आणि ⇨ पॅशनफ्रुट, पर्पल ग्रॅनॅडिला (पॅ. इड्यूलिस), जायंट ग्रॅनॅडिला (पॅ. क्वाड्रँग्युलॅरिस) इ. सुगंधी फुलांकरिता अथवा खाद्य फळांकरिता लागवडीत आहेत. ⇨ पपईचा अंतर्भाव पूर्वी या कुलात करीत परंतु आता कॅरिकेसी या स्वतंत्र कुलात केला जातो. या दोन्ही कुलांचे आप्तभाव आहेत कॅरिकेसी कुलातील वनस्पतींत चिकाळ ऊतक (पेशींचा समूह) असते. ॲडेनिया पामेटा (मोडेका पामेटा) ही लहान वेल कारवारात व श्रीलंकेत आढळते त्वचेच्या रोगांवर पानांचा व मुळांचा रस श्रीलंकेत वापरतात मुळे व फळे मात्र विषारी असतात.

पहा : कॅरिकेसी कृष्णकमळ.

परांडेकर, शं. आ.