मेंदी : (हिं. मेहंदी गु. मेंदी, मेंदी क. मदरंगा, गोरंटे सं. मेंदिका, मेंधी, नखरंजका, रक्तगर्भा इं. हेन्ना प्लॅन्ट, ईजिप्शियन प्रिव्हेट, कॅम्फायर लॅ. लॉसोनिया इनरमिस, लॉ. आल्बा कुल-लिथ्रेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एक सामान्य झुडूप अथवा लहान वृक्ष. ह्यांच्या लॉसोनिया प्रजातील ही एकच जाती असून हिचा प्रसार हल्ली सर्वत्र, विशेषतः बागेत शोभेकरिता झालेला आढळतो. तथापि ती मूळची उ. आफ्रिका व आग्नेय आशियातील आहे. भारतात (प. द्वीपकल्पात) व श्रीलंकेत कोरड्या भागांत आढळते. भारतात व इतर काही देशांत ही सुपरिचित वनस्पती लागवडीत आहे. तिच्या पानांतील रंगद्रव्यामुळे, तसेच फुलांपासून मिळणाऱ्या हिना अत्तरामुळे तिला व्यापारी महत्त्व प्राप्त झाले आहे.

मेंदीच्या झुडपाला अनेक शाखा व काहीशा चौकोनी उपशाखा असून लहान फांद्यांच्या टोकांस खोडाचे रूपांतर तीक्ष्ण काट्यांत झालेले असते. पाने साधी, लहान (१·३ – ३·२ X ०·६ – १·६सेंमी.), समोरासमोर, दीर्घवर्तुळाकृती, काहीशी अवृंत (देठ नसलेली) व टोकदार असतात. एप्रिल ते जुलैमध्ये, त्रिकोणी फुलोऱ्यावर [परिमंजरीय वल्लरीवर → पुष्पबंध] लहान (१·३ सेंमी. व्यास), पांढरट किंवा काहीशी गुलाबी रंगाची, असंख्य, द्विलिंगी, सुगंधी व नियमित फुले येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लिथ्रेसी अथवा मेंदी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळे (बोंडे) शुष्क, लहान, गोलसर व वाटाण्याएवढी (६ मिमी. व्यास) असून सतत राहणाऱ्या संवर्ताने वेढलेली असतात. फळांच्या घोसाला इसबंध म्हणतात [→ फूल]. बिया असंख्य, लहान (२·५ मिमी.), त्रिकोणी (शंकूसारख्या किंवा स्तूपासारख्या) असतात.

मेंदी : (१) फुलांफळांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) बीजउपयोग : मेंदीच्या पानांपासून नारिंगी रंग मिळतो तो तळहात, तळपाय व नखे, केस, दाढी, भुवया, मिशा इ. आणि कमाविलेली कातडी रंगविण्यासही वापरतात. निळीबरोबर हा रंग काळा होतो व काताबरोबर वापरल्यास गडद लाल होतो. साधे सुती कापड पानांच्या रसाने फिकट पिंगट होते लोकर व रेशीम लालसर किंवा पिवळट होते. फार पूर्वीपासून निरनिराळे रंग देण्यास मेंदीचा उपयोग होत आला आहे. आता कृत्रिम रंग वापरात आल्याने मेंदीचा वापर कमी झाला आहे. मेंदीच्या मूळातही लाल रंग आढळतो. इ.स.पू. २१६०–१७८८ या काळातील ईजिप्तमधील राजवंशातील एका ममीच्या (परिरक्षित शवाच्या) हाताची बोटे मेंदीने रंगविलेली असून थोरले प्लिनी (इ.स. २३–७९) यांच्या माहितीप्रमाणे ईजिप्शियन व रोमन लोक केस रंगविण्यास मेंदी वापरीत असत. भारतात इ.स. ११०० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या नित्यनाथ सिद्धाच्या रसरत्नाकर या ग्रंथात ‘महिंदी’ हा मेंदीवाचक शब्द आढळतो. तत्पूर्वीच्या कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात मेंदीचा उल्लेख आढळत नाही. यावरून मेंदी मूळची भारतातील नसून तिची आयात इ.स. ११०० पूर्वी झाली असावी.

मेंदीच्या खोडाची साल कावीळ, प्लीहावृद्धी, मुतखडा, त्वचा रोग व पांढरे कोड इत्यादींवर उपयुक्त असते. पानांचा रस दुधातून किंवा साखर व पाणी यांतून स्वप्नावस्थेवर (वीर्यनाशावर) देतात. पानांचा काढा स्तंभक (आकुंचन करणारा) असून घसा दुखत असल्यास गुळण्यांकरिता वापरतात पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे व कातडीचा दाह इत्यादींवर बाहेरून लावतात. पाने वांतिकारक (ओकारी आणणारी) व कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी) असून आग कमी करतात. डोकेदुखीवर बाहेरून लावतात. तळपायाची आग कमी करण्यास ताजी पाने चोळतात. फुले प्रशीतक (थंडावा देणारी), आस्वापक (निद्रावश करणारी) असल्याने उशीत ठेवतात.

मेंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असून वाफेच्या साहाय्याने केलेल्या ऊर्ध्वपातनामुळे त्यांतून ०·०१–०·०२% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते. त्याचा रंग पिंगट असून त्याला टी रोझ [→ गुलाब] किंवा ⇨ मिग्नोनेटसारखा सुगंध येतो. त्याला हिना (हेन्ना) किंवा मेंदी तेल म्हणतात. सुगंधी द्रव्यांत (अत्तरे, तेले इ.) त्याचा वापर फार प्राचीन काळापासून केला जात असून हल्ली सौंदर्यप्रसाधनांत वापरतात. लखनौव बनारस येथे व्यापारी प्रमाणावर त्याचे उत्पादन होते.


मेंदीचे लाकूड करडे व कठीण असून त्याचा वापर हत्यारांचे दांडे व तंबूच्या खुंट्यांकरिता करतात.

लागवड व उत्पादन : उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील उबदार प्रदेशांत कुंपणाकरिता मेंदीची लागवड करतात. रंगद्रव्याच्या उत्पादनाकरिता पानांच्या मागणीमुळे ईजिप्त, सूदान व भारत येथे अधिक व इराण, पाकिस्तान, मादागास्कर इ. देशांत कमी प्रमाणात लागवड केली जाते. भारतात पंजाब व गुजरात या राज्यांत मोठ्या व मध्य प्रदेशात व राजस्थानात कमी प्रमाणावर लागवड करतात. सु. ८७ टक्के उत्पादन पंजाब व गुजरात येथून मिळते.

ओलावा धरून ठेवणाऱ्या जमिनीत मेंदीची वाढ चांगली होते. बिया व छाट कलमे लावून नवीन लागवड होते. प्रथम २०–२५ दिवस बी चांगले भिजू देतात त्या वेळी अनेकदा पाणी बदलावे लागते. दर हेक्टरी सु. ७·५–१२·५ किग्रॅ. बियांची रोपे पुरेशी होतात. बी पेरण्यापूर्वी पन्हेरीतील वाफ्यात भरपूर पाणी ठेवून नंतर मार्च ते एप्रिलमध्ये भिजलेले बी त्यात पेरतात. साधारणपणे २–३ महिन्यांत बी रुजून रोपे सु. ४५–६० सेंमी. उंच होतात. ती जुलै ते ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष शेतात सु. ३० सेंमी. अंतरावर लावतात लावण्यापूर्वी त्यांची मुळे व शेंडे खुडून टाकतात. एक, दोन किंवा तीन तुकडे एकत्र लावतात. जमिनीस पाटाचे पाणी नसल्यास १५ सेंमी. अंतरावर लागण करतात. लागणीनंतर काही दिवस दररोज पाणी द्यावे लागते तसेच तण काढणे व कोळपणी हे करावे लागते. एकदा झाडे स्थिरावली म्हणजे दुसऱ्या वर्षापासून पुढे अनेक वर्षे ती वाढत राहून भरपूर पीक देतात. काही मळ्यांतून शंभर वर्षापर्यंत पीक काढल्याचे सांगतात. एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर असे वर्षातून दोन वेळा पीक काढतात. तेव्हा जमिनीपासून काही उंचीवर झाडे छाटतात व कापलेल्या फांद्या सावलीत वाळवितात. नंतर त्या बडवून पाने अलग करतात. पहिली २–३ वर्षे पानांचे उत्पन्न कमी म्हणजे दर हेक्टरी सु १७५ ते ८५० किग्रॅ. असते. पुढे मात्र हेक्टरी १,००० ते १,७०० किग्रॅ. पर्यंत जाते. पाणभरल्या शेतातील पीक दरवर्षी दर हेक्टरी २,००० किग्रॅ. पर्यंत मिळते.

हवेत सुकविलेल्या पानाच्या भुकटीत प्रतिशत ८·९७ ओलावा १८·४५ राख व १०·२१ टॅनीन असते. पानात लॉसोन नावाचे रंगद्रव्य असते ते संश्लिष्ट स्वरूपात उपलब्ध आहे.

व्यापार : भारतात मेंदीच्या शुष्क पानांचे उत्पादन २० ते २५ लाख किग्रॅ. असून त्यांपैकी १० लाख किग्रॅ. पंजाबात, ९ लाख किग्रॅ. पर्यंत गुजरातेत, १·७५ लाख किग्रॅ. मध्य प्रदेशात व १·२५ लाख किग्रॅ. पर्यंत राजस्थानात होते. यांपैकी सु.१५% भारतात भुकटीच्या स्वरूपात उपयोगात येते व उरलेले पानांच्या किंवा भुकटीच्या रूपात निर्यात होते. फ्रान्स, सिरिया, अल्जीरिया, ट्युनिशिया, बहारीन व जॉर्डन हे आयात करणारे प्रमुख देश असून फ्रान्सच्या खालोखाल ग्रेट ब्रिटन पानांची आयात करतो. मध्यपूर्वेकडील देश, उ. आफ्रिका व अमेरिका या प्रदेशांत भुकटीची निर्यात होते. दिल्ली, गुजरात व माळवा ह्या तीन व्यापारी नावांनी मेंदीची निर्यात होते. दिल्ली मेंदी (भुकटी) फरीदाबादहून विकली जाते. ती रंगद्रव्याच्या दृष्टीने सर्वोत्तम समजतात. गुजरात मेंदी (पाने) खेड्यांतून जमा केली जाऊन मुंबईस पाठविली जाते व तेथून निर्यात होते. माळवा मेंदीचे (भुकटी) राजस्थानात उत्पादन होते व कोटा येथे खरेदी-विक्री होते. गुणानुक्रमे दिल्ली प्रकारानंतर माळवा व गुजरात मेंदींचा क्रम लागतो. भुकटीची गुणवत्ता रंग, स्वच्छता व सूक्ष्मता विचारात घेऊन निश्चित केली जाते. दिल्लीच्या बाजारात प्रतवारीप्रमाणे केलेले सु. १५ प्रकार उपलब्ध आहेत. सर्वोत्तम प्रकारात ९५% मेंदी (हेन्ना) असते.

रोगराई : कॉर्टिसियम कोळेरोगा या नावाच्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) मेंदीवर घाण्यारोग (ब्लॅक रॉट) पडतो तसेच झँथोमोनस लॉसोनी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे पानावर काळे ठिपके येतात यावर योग्य ती ⇨ कवकनाशके वापरतात मात्र अद्याप निश्चित उपाययोजना उपलब्ध झालेली नाही.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

             2. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol. II, New Delhi, 1975.

             3. Uphof, J. C. The Dictionary of Economic Plants, Lehre (Germany), 1968.

             ४. काशीकर,चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

कुलकर्णी,उ.के. परांडेकर, शं.आ.