व्हॅव्हिलॉव्ह, न्यिकली इव्हानव्ह्यिच : (२५ नोव्हेंबर १८८७-२६ जानेवारी १९४३). रशियन वनस्पती-आनुवंशिकीविज्ञ.व्हॅव्हिलॉव्ह यांचा जन्म मॉस्को येथे झाला. त्यांचे शिक्षण आनुवंशिकीविज्ञानाचे प्रवर्तक विल्यम बेटसन यांच्या मार्गदर्शनाखाली केंब्रिज विद्यापीठात, तसेच लंडन येथील जॉन इनस हॉर्टिकल्चरल इन्स्टिट्यूशनमध्ये झाले (१९१३-१४). रशियाला परतल्यावर सराटव्ह विद्यापीठात ते वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक व पेट्रग्राड (आता लेनिनग्राड) येथील ब्युरो ऑफ ॲप्लाइड बॉटनी या संस्थेचे संचालक होते (१९१७-२१). ऑल युनियन व्ही.आय. लेनिन ॲकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस या संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांनी रशियात ४०० संशोधन संस्था स्थापन केल्या. १९१६-३३ या काळात त्यांनी इराण, अफगाणिस्तान, इथिओपिया, चीन आणि मध्य व दक्षिण अमेरिका या प्रदेशांत शोधमोहिमा काढल्या. त्यांनी रानटी वनस्पतींच्या विविध प्रकारांचे ५०,००० नमुने व गव्हाचे ३१,००० नमुने रशियात आणून त्यांची पैदास केली.

व्हॅव्हिलॉव्ह यांनी आपल्या जगभराच्या निरीक्षणांवरून पुढील गृहीतक मांडले : लागवडीतील वनस्पतीचे उगमस्थान अशा प्रदेशात आढळते की, जेथे वनस्पतीचे जंगली नातेवाईक सर्वाधिक अनुकूलनक्षमता दाखवितात. त्यांची अनुमाने सारांशरूपाने द ओरिजीन, व्हेरिएशन, इम्युनिटी अँड ब्रीडिंग ऑफ कल्टिव्हेटेड प्लँट्स (इंग्रजी अनु.– के.एस.चेस्टर, १९५१) या ग्रंथात देण्यात आली आहेत. वनस्पतिजातीचा जास्तीत जास्त विविधतेचा प्रदेश तिच्या उगमस्थानांचे प्रतिनिधित्व करतो, असे विधान त्यांनी केले व १९२० मध्ये त्यांनी आपल्या सिद्धांताचा विस्तार केला. त्यांनी वनस्पतींच्या उगमाची बारा जागतिक केंद्रे सुचविली आहेत.

तत्कालीन सोव्हिएट रशियातील जीवविज्ञानाचे अधिकृत प्रवक्ते ⇨ ट्रोफीम देनीसोव्ह्यिच लायसेंको यांचा, खरे तर, अनवधानाने ओढवून घेतलेला रोष ही व्हॅव्हिलॉव्ह या थोर शास्त्रज्ञाच्या जीवनातील एक दुर्दैवी घटना होय. लायसेंको यांनी १९३४-३९ या काळात पश्चिमी जगातील मेंडेल-मॉर्गन प्रणित आनुवंशिकीला खतपाणी घालणारे म्हणून व्हॅव्हिलॉव्ह यांची निर्भर्त्सना करणारी मोहीमच उघडली होती. परिणामत: १९४० मध्ये त्यांना अटक करण्यात येऊन सराटव्ह येथील छळछावणीत डांबण्यात आले. तेथेच ते मरण पावले.

जमदाडे, ज. वि.