कांकरा : (कांकर लॅ. ब्रुगैरा कॉंजुगेटा कुल – ऱ्हायझोफोरेसी). हा सदापर्णी, ९–१२ मी. उंचीचा लहान वृक्ष समुद्रकाठच्या खाऱ्या दलदलीत वाढतो  [→ वनश्री (कच्छ वनश्री)]. याचा प्रसार महाराष्ट्रात मुंबई, रत्नागिरी व इतरत्र पश्चिम किनाऱ्यावर, शिवाय उष्ण कटिबंधातील आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक प्रदेश इ. ठिकाणी आहे. फांद्यांवर गळलेल्या पानांचे व उपपर्णांचे वण पाने वरून गडद हिरवी व खालून फिकी, दीर्घवृत्ताकृती व संमुख (समोरासमोर) मध्य शीर उठावदार फुले एकाकी, कक्षास्थ (बगलेत), पिवळट शेंदरी असून डिसेंबर–फेब्रुवारीत येतात. संवर्त पाकळ्यांपेक्षा मोठा किंजपुट अधस्थ. फळ शेंदरी असून त्यावरचा संवर्त पुढे गळून पडतो [→ फूल] . फळातील बीजातून बाहेर वाढलेला मुळाचा भाग (अपत्यजनन) सु.३० सेंमी. लांब व साधारणतः कोनीय असतो. या झाडाच्या सालीतील टॅनिनामुळे आणि त्याच्या लाकडामुळे याचा महत्त्व आहे. साधारणतः ६२–७२% टॅनीन असलेल्या अर्काने कातड‌्यांना टणकपणा व लालसर अथवा शेंदरी रंग चढतो पानेही तशीच, अर्क न काढता, वापरल्यास कातडे मऊ व बालमृगाच्या रंगासारखे बनते. या झाडाचे लाकूड फिकट पिंगट, टिकाऊ आणि कठीण असून घरबांधणीत व जळणास उपयोगी पडते. इंडोनेशियात एका मत्स्ययुक्त खाद्यपदार्थात स्वादाकरिता सालीचा वापर करतात.

पहा : ऱ्हायझोफोरेसी.

नवलकर, भो. सुं.