बार्लेरिया : (सं. कुरंट). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] ⇨ ॲकॅँथेसी कुलातील (वासक कुलातील) हा एक प्रमुख वंश असून त्यात एकूण सु. २५० जातींचा अंतर्भाव होतो व त्यांचा प्रसार सामान्यपणे उष्ण कटिबंधात आफ्रिका, आशिया व क्वचित मध्य व द. अमेरिका या प्रदेशांत झालेला आहे. जे. बॅरेलियर ह्या फ्रेंच वनस्पतिवैज्ञानिकांच्या नावावरून या वंशाचे नाव आले आहे. याच्या भारतात सु. २६ व महाराष्ट्रात १६ जाती आढळत असून त्या कोकणात व सह्याद्रीच्या परिसरात वाढतात कित्येक शोभेकरिता उद्यानांतून लावलेल्या आढळतात. याचे कुरंट, कुरंटक, कुरबक इ. संस्कृत नावांनी महाभारत, बृहत्संहिता, सुश्रुतसंहिता, वात्सायनाचे कामसूत्र तसेच मेघदूत, ऋतुसंहार इ. संस्कृत ग्रंथांत उल्लेख आलेले आहेत. कोरांटी हे मराठी नाव कुरंटकापासून आले असावे. कोऱ्हांटी असाही निर्देश मराठीत आढळतो. ह्यावरून बार्लेरिया वंशाला कुरंट म्हटले आहे. फुलांच्या रंगावरून मराठीत भिन्न जाती ओळखल्या जातात.

ही झाडे ⇨कोरांटीप्रमाणे सदापर्णी, काटेरी किंवा बिनकाटेरी झुडपे असून पाने समोरासमोर, साधी व मध्यम आकाराची असतात. फुले मोठी, साधारणपणे घंटाकृती, शोभिवंत, विविधरंगी असून खोडाच्या किंवा फांदींच्या टोकास येतात. छदे व छदके (फुलोऱ्याच्या व फुलाच्या तळाशी असणारी उपांगे) लहान किंवा मोठी व टोकाशी काटेरी असतात क्वचित नसतात. फुलात चार संदले समोरासमोर जोडीने असतात. पुष्पमुकुटात तळाशी मध असून पाकळ्या पाच, खाली जुळलेल्या पण वर सुट्या असतात. केसरदले दोन आणि वंध्यकेसर दोन, काहींत पाच किंवा वंध्यकेसर फार लहान व अवशेषरूप किंजपुट ऊर्ध्वस्थ [⟶ फूल]. फळ (बोंड) लांबट, गोलाकार व त्यात दोन किंवा चार लवदार बीजे असतात. नवीन लागवड बिया किंवा कलमे लावून करतात. फले विशेषेकरून थंडीत येतात. अर्धवट सावलीत किंवा भरपूर सूर्यप्रकाशात या वंशातील जाती चांगल्या वाढतात. बार्लेरिया क्रिस्टॅटा हि निळसर फुलांची जाती भारतीय आहे. बा. फ्लॅवा ही पिवळ्या फुलांची जाती अरबी आहे. बा. टोर्मेटोजाची फुले गुलाबी असतात व ही जाती द. भारतात आढळते. पिवळी कोरांटी (बा. प्रिओनिटिस) कुंपणाच्या कडेने लावतात. ती औषधीही आहे. बा. गिब्सोनी ही फिकट जांभळट फुलांची जातीही भारतीय आहे.

 पहा : ॲर्केथेसी कोरांटी.

 संदर्भ : Jindal, S. L. Flowering Shrubs of India, New Delhi, 1970.

 पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.