दीर्घोतक : (प्रोसेंकायमा). वनस्पतींच्या शरीराच्या अंतर्रचनेच्या अध्ययनास सुरुवात झाली त्या आरंभीच्या काळात ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांचे) स्वरूप व कार्य लक्षात घेऊन त्यांचे ‘मृदूतक’ व ‘दीर्घोतक’ असे विभाग केले गेले. दीर्घोतकाच्या कोशिका (पेशी) सापेक्षत: अधिक लांब, टोकदार व जाड कोशिकावरणाच्या असल्याने आधार, संरक्षण आणि वहन ही त्यांची कार्ये समजली जात. सविस्तर अध्ययनानंतर दीर्घोतकात अनेक निरनिराळ्या प्रकारची ऊतके असल्याचे आढळल्याने ती संज्ञा प्रचारातून गेली. तथापि सोयीसाठी अरुंद व लांब निमुळती टोके एकत्र घट्ट बसविलेली आहेत अशा काष्ठयुक्त जाड कोशिकावरणाच्या मृत कोशिकांच्या संघटित जुडग्याला किंवा त्यातील कोशिकांच्या संदर्भात ही संज्ञा अजूनही क्वचित वापरली जाते.

पहा: ऊतके, वनस्पतींतील दृढोतक शारीर, वनस्पतींचे.

घन, सुशीला प.