रोझेलीझ : (गुलाब गण). फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक गण. ए. एंग्‍लर यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीनुसार या गणात १८ कुलांचा अंतर्भाव होतो, तर जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांच्या पद्धतीत ९ कुलांचा होतो. ए. बी. रेंडेल यांनी ११ कुले या गणात समाविष्ट केली आहेत. अलीकडे फक्त सात (क्रॅसुलेसी, सॅक्सिफ्रॅगेसी, कुनोनिएसी, पिट्टोस्पोरेसी, रोझेसी, कॉनेरेसी व लेग्युमिनोजी) कुलांचा हा गण नैसर्गिक मानतात. ह्या भिन्न कुलांचा परस्परसंबंध संक्रमणावस्थेतील काही सुट्या वनस्पतींमुळे व संरचनेमुळे दिसून येतो. अवकिंजावस्था (संवर्त किंजपुटाखाली असणे) ते परिकिंजावस्था (संवर्त व पुष्पस्थली किंजपुटाभोवती पण चिकटून नसणे) आणि परिकिंजावस्था ते अपिकिंजावस्था (संवर्त किंजपुटावरच्या पातळीत असणे), अरसमात्रता ते एकसमात्रता आणि किंजमंडलातील घटकांच्या संख्येचा ऱ्हास [⟶ फूल] यांमध्ये या संक्रमणांची प्रचिती  येते. सी. ई. बेसी यांच्या मते रोझेलीझ गण प्रारंभिक असून तो रॅनेलीझ (मोरवेल) गणापासून प्रत्यक्षच अवतरला आहे. जे. हचिन्सन यांना काष्ठमय रोझेलीझ हा मॅग्‍नोलिएझमधून (चंपक गणामधून) आणि ओषधीय [⟶ ओषधि] रोझेलीझ (सॅक्सिफ्रॅगेसी, क्रॅसुलेसी इ.) हा रॅनेलीझमधून अवतरला असावा, हे मान्य आहे. रोझेसी (गुलाब कुल) हे कुल रोझेलीझ गणात सर्वांत प्रारंभिक असून त्याचा उगम रॅनेलीझमधील कॅलिकँथेसी कुलापासून झाला असावा. एच्. हॅलियर यांच्या मते रोझेलीझ गणाचा उगम प्रत्यक्षपणे डायलेनिएसीपासून (कदंब कुलापासून) झाला असावा व रोझेलीझपासून ऱ्हॅम्‍नेलीझ (बदरी गण) गण उत्क्रांत झाला असावा. बेसी यांच्या मते रोझेलीझ गणापासून माल्व्हेलीझ, ⇨ सॅरोसेनिएलीझ, गटिफेरेलीझ, ⇨ मिर्टेलीझ व ⇨ अंबेलेलीझ यांचा उगम झाला असावा.

रोझेलीझ गणातील वनस्पती ओषधी, झुडपे, वेली व लहान मोठे वृक्ष असून साधी किंवा संयुक्त, बहुधा सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली) पाने असतात. फुले द्विलिंगी (क्वचित एकलिंगी), पूर्ण, पंचभागी, नियमित किंवा अनियमित, मंडलित (संरचनेत पुष्पदलांची मांडणी मंडलांत असलेली), बहुधा परिकिंज, कधी अवकिंज किंवा अपरिकिंज असतात. केसरदले (पुं-केसर) अनेक व सुटी आणि किंजदले (स्त्री-केसर) बहुधा सुटी पण कधी जुळलेली असतात. बीजके अनेक, क्वचित थोडी असून त्यांना दोन आवरणे असतात [⟶ फूल]. अनेक फळे, कडधान्ये, गुरांचा चारा, लाकूड, रंग तेले, औषधे, सुंदर फुले इ. अनेक उपयुक्त वस्तू रोझेलीझ गणातील भिन्न कुलांतील वनस्पतींपासून मिळतात. त्यामुळे या गणाला आर्थिक महत्त्व आहे. यातील ⇨ रोझेसी व ⇨ लेग्युमिनोजी ही दोन कुले विशेष महत्त्वाची आहेत.

पहा : क्रॅसुलेसी सॅक्सिफ्रॅगेसी. 

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

           2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

           3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.