कामलता : (गणेश पुष्प क. कामलते इं. सायप्रस व्हाईन लॅ. आयपोमिया क्वामोक्लिट (क्वामोक्लिट पिनॅटा) कुल-कॉन्व्हॉल्व्हुलेसी). ही सुंदर, बारीक, गुळगुळीत वर्षायू (एक वर्ष जगणारी) व मूळची उष्णकटिबंधीय अमेरिकेतील वेल सर्व भारतभर बागेतून शोभेकरिता लावतात. कधीकधी जंगलातही आढळते. पाने साधी परंतु पिसासारखी विभागलेली असून प्रत्येक भाग रेषाकृती असतो. फुले खाली नलिकाकृती, वर पसरट, लाल अथवा पांढरी असून फुलोरा लांब देठावर पानाच्या बगलेत सप्टेंबर ते डिसेंबरात येतो. बोंडात चार बिया असतात (→ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी).

पानांचा लेप काळपुळीवर लावतात. पाने कुटून ती रक्तीमूळव्याधीवर बाहेरून लावतात व गरम तुपातून पोटात घेण्यास देतात.

वेल लागवडीला सोपी असून झपाट्याने वाढते म्हणून मांडवावर, ओसरीवर, भिंतीवर अगर जाळीवर शोभे‌करिता ‌आणि संरक्षणाकरिता लावण्यास योग्य समजतात. पहिला पाऊस झाल्याबरोबर जून-जुलैत कायमची वेल वाढविण्याच्या ठिकाणी बी पेरतात. भरपूर सूर्यप्रकाशात व खतवून तयार केलेल्या जमिनीत चांगली वाढ होते. पावसाळा संपल्यावर ही वेल वाळते. 

जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.

कामलता