चाफा, खैर : (पांढरा चाफा हिं गुळैंची, चमेली गु. राधा चंपो, धाेळो चंपो क. कडुसंपिगे इं. टेंपल ट्री, पॅगोडा ट्री, फ्रांगीपनी लॅ. प्लुमेरिया ॲक्युटिफोलिया कुल-ॲपोसायनेसी). हा मध्यम आकाराचा सु. ६–१० मी. उंचीचा पानझडी वृक्ष मूळचा मेक्सिको आणि ग्वातेमाला येथील असून भारतात फार पूर्वीपासून विशेषतः देवळांच्या परिसरात लावण्यात येत असल्याने त्यावरून याची इंग्रजी नावे पडली आहेत. फ्रेंच धर्मोपदेशक, प्रवासी आणि वनस्पतिविज्ञ चार्ल्‌स प्लूमर (१९४६–१७०६) यांचे नाव या झाडाच्या लॅटिन वंशवाचक नावात गोवले असून जातिवाचक नावाचा संबंध याच्या टोकदार पानांशी आहे. याच्या फांद्या वेड्यावाकड्या व पुनःपुन्हा विभागल्यासारख्या दिसतात. साल खडबडीत असून तिला जखमा झाल्यास पांढरा चीक निघतो. याची शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨ॲपोसायनेसी  अथवा करवीर कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पाने साधी, समोरासमोर, मोठी, रुंद भाल्यासारखी, दोन्ही टोकांस निमुळती असून त्यांवर मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस समांतर लहान शिरा उठून दिसतात ती बहुधा फांद्यांच्या टोकांस गर्दी करतात डिसेंबरपासून पुढे ती गळून जातात व पावसाळ्याच्या सुरुवातीस येतात. फुले मोठी सुगंधी पांढरी असून फांद्यांच्या टोकांस तुरे [वल्लरीय गुलुच्छ, ⟶ पुष्पबंध] मार्च ते एप्रिलमध्ये व जुलै ते ऑक्टोबरात येतात. पाकळ्यांवर बाहेरच्या बाजूस खाली लालसर झाक व आत पिवळेपणा दिसतो. खाली जुळलेल्या पाकळ्या पाच असून केसरदले अतिशय लहान असतात. दोन किंजदलांपासून बनलेली दोन लांबट पेटिका फळे लालसर पिंगट शिंगासारखी दिसतात. [⟶ फूल]. भारतात फळे क्वचित येतात बिया अनेक व त्यांवर मऊ केसांचा झुबका असतो. लाकूड मऊ असून ढोलक्याकरिता वापरतात. सर्व भाग औषधी असतात. पानांचे पोटीस सुजेवर बांधतात चीक संधिवातावर लावतात तो चंदनतेल व कापरासह कंडूवर गुणकारी साल ज्वरनाशी, व्रणशोधक तिचा गुल्मावर लेप चांगला, खोबरे व तूपभाताबरोबर ती अतिसारावर देतात. मुळाची साल रेचक असते. झाडाची नवीन लागवड कलमांनी होते ती उन्हाळ्यात करणे चांगले. खैर चाफ्याचे अनेक प्रकार आणि संकरज लागवडीत आहेत, त्यांपैकी एका लाल प्रकाराचे (प्लुमेरिया रूब्रा रुब्रा ) चित्र पांढऱ्या प्रकारासोबत दिले आहे. 

संदर्भ : 1. Blatter, E. Milliard, W. S. Some Beautiful Indian Trees, Bombay, 1954.

           2. Cowen, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965.

           3. McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959

गाडगीळ, सी. ना.

खैर चाफा : (१) लाल प्रकाराचा पर्णहीन वृक्ष, (२) लाल प्रकारातील फूल व कळ्या, (३) पेटिका-फळांची जोडी, (४) पिकलेले पान, (५) पांढऱ्या प्रकारचे फूल व हिरवे पान.