घोळ : (१) फुला-फळांसह फांदी, (२)फूल (३) केसरदले व किंजमंडल, (४) करंडक फळ.

घोळ : (मोठी घोळ हिं. कुर्फा, कुल्फा गु. घोळ क. गोळिपल्या सं. लोणिका, घोलिका इं. पर्स्लेन लँ. पोर्चुलॅका ओलेरॅसिया कुल-पोर्चुलॅकेसी) ही लहान, जमिनीवर पसरणारी, वर्षायू (एक वर्ष जगणारी), मांसल ⇨ ओषधी  भारतात सर्वत्र (शेतात, बागेत व इतरत्र) तणाप्रमाणे वाढणारी असून हिमालयात १,५५० मी. उंचीपर्यंत आढळते. खोड व फांद्या लालसर असून पेरी फुगीर असतात. पाने लहान,  मांसल, साधी, बिनदेठाची, एकाआड एक, काहीशी समोरासमोर, तळाशी निमुळती व टोकाकडे गोलसर असून त्यांच्या कडा लाल असतात. फुले बिनदेठाची, पिवळी, लहान व फाद्यांच्या टोकास झुबक्याने येतात. बोंड उभट गोलसर, अनेकबीजी (डबीप्रमाणे) झाकण असून ते निघून फुटते (करंडकरूप).

ही वनस्पती प्रशीतकर (थंडावा देणारी) व आरोग्यप्रद असून स्कर्व्ही रोगावर (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येणाऱ्या स्थितीवर) आणि यकृताच्या तक्रारीवर तिचा आहारात समावेश करतात. तिचे पोटीस भाजणे, पोळणे, दारुणा व इतर त्वचारोग इत्यादींवर बांधतात. पाने स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी), प्रशीतकर, मूत्रल (लघवी साफ करणारी) असून खोडाचा रस घामोळी व हातापायाच्या जळजळीवर लावतात. बी कृमिनाशक व मूत्रल असते. घोळीची भाजी करतात.

  सन प्लँट : (इं. रोढ मॉस हिं. छोटा लुनिया, कुप्पी सं. लघुलोणिका लॅ. पोर्चुलॅका ग्रँडिफ्लोरा ). ही घोळीच्या वंशातील सुंदर, वर्षायू ओषधी मूळची ब्राझील (द. अमेरिका) मधील असून शोभेकरिता बागेत लावतात. खोड व फांद्या बारीक, पसरणाऱ्या, किंवा साधारण उभ्या वाढणाऱ्या (१५ –३० सेंमी.) असून पेऱ्यांवर केसांचे पुंजके असतात. पाने लहान, मांसल, बिनदेठाची, शूलाकृती, विखुरलेली किंवा काहीशी झुबक्याने येतात. पानांच्या बगलेत सु. २·५ सेंमी. रुंदीची फुले निरनिराळ्या प्रकारांत भिन्न रंगांची येतात. सूर्यप्रकाशात ती उमलतात परंतु सायंकाळी किंवा ढगाळ हवेत ती मिटतात. पुष्पमुकुट पाच सुट्या पाकळ्यांच्या एका मंडलाचा किंवा दोन अथवा तीन (दुहेरी, तिहेरी) मंडलांचा असतो केसरदले अनेक आणि फळ घोळीप्रमाणे करंडकरूप असते. बी लहान करडे किंवा काळे आणि विपुल, भरपूर सूर्यप्रकाशात ही वनस्पती चांगली येते बियांपासून मार्च–सप्टेंबरात लागवड करतात. १,३७५ मी. उंचीच्या खालील प्रदेशात कोठेही परंतु सखल भागी चांगली वाढते. बागेत वाफ्याच्या कडेला किंवा खडकाळ वाफ्यात (शैल-उद्यानात) लावण्यास चांगली साधी जमीन चालते. ओषधी उपयोग घोळीप्रमाणे असतात. 

पहा : पोर्चुलॅकेसी.

जमदाडे, ज. वि.


घोळ (सनप्लँट) : चार प्रकार व फळ