हॅमेलिया (हॅमेलिया पॅटेन्स) : (१) पाने, फुलोरा व फळांसह फांदी, (२) पुष्पमुकुटाचा उभा छेद, (३) किंजपुटाचा आडवा छेद, (४) फळेहॅमेलिया : (इं. फायर बुश, स्कार्लेट बुश, हमिंग बर्ड बुश लॅ. हॅमेलिया पॅटेन्स कुल-रुबिएसी ). हे जलद वाढणारे सदापर्णी क्षुप शोभिवंत फुले व पाने यांसाठी प्रसिद्ध आहे. हे क्षुप मूळचे अमेरिका ववेस्ट इंडीजमधील आहे. मात्र, शोभेसाठी याची सर्वत्र लागवड केली जाते. आदर्श परिस्थितीत ते सु. ४.६ मी. उंच वाढते. मात्र, त्याची सरासरी वाढ १.२५–१.९ मी. उंच एवढी असते. हॅमेलिया प्रजातीमध्ये सु. ४० जाती आहेत. याचे खोड व फांद्या चौकोनी असून त्यावर लालसर लव असते. पाने साधी, समोरासमोर, क्वचित पेऱ्यावर तीन आयत किंवा दीर्घवृत्ताकृती भाल्यासारखी, सु. १५ सेंमी. लांब, वर गर्द हिरवी, परंतु खाली लालसर असून शिरा ठळकपणे दिसतात. उपपर्णे तळाशी रुंद व टोकाकडे लांबट (प्रशूकाप्रमाणे) फुलोरा फांद्यांच्या शेंड्याकडे सोंडेप्रमाणे (शुंडी ) वल्लरी व त्यावर उन्हाळ्यात व पावसाळ्यात लालसर नारिंगी फुले (१.९ सेंमी. लांब) येतात. फुलातील प्रत्येक मंडलात पाच भाग असून किंजपुटात पाच कप्पे असतात. पुष्पमुकुट नळीसारखा, परंतु टोकास पसरट संवर्त व पुष्पमुकुट दोन्ही रंगीत असतात. मृदुफळात अनेक लहान बिया असतात. फळ पक्व होताना हिरवे-पिवळे-लाल व शेवटी काळ्या रंगाचे होते. फळांचे गुच्छ शोभिवंत व देखणे असतात. विविध टप्प्यांवर फुलेआणि फळे येतात.

 

समशीतोष्ण प्रदेशांत हॅमेलिया वनस्पती एकवर्षायू असते. अशा परिस्थितीत ती फक्त ०.६ मी. उंच वाढते. शरद ऋतूत पाने गर्द लाल रंगात परावर्तित होतात. तिची लागवड शरद ऋतूत मृदू फांद्याद्वारे अथवाबियांद्वारे करतात. ही वनस्पती क्षारयुक्त जमिनीत वाढू शकते. तसेच पुरेसा पाणीपुरवठा असल्यास कुठल्याही जमिनीत ती वाढू शकते. पूर्ण सूर्यप्रकाशात तिची वाढ चांगली होते. मात्र, काही प्रमाणात आच्छादन असल्यास वाढ अधिक चांगली होते.

 

हॅमेलिया वनस्पतीचा वापर कुंपणासाठी (वईसाठी) मोठ्या प्रमाणावर केला जातो. तिची मृदुफळे पक्ष्यांना आवडतात. फुलपाखरे व हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांच्या अभयारण्यात (बागेत) या वनस्पतींचा विशेषवापर होतो. या वनस्पतीत प्रसुप्त अवस्था नसते. तिची सातत्याने वाढ होते, तसेच फुलांचा बहर नियमितपणे येत असतो. मात्र, वनस्पतीच्या खोडावर वाढीचे वर्तुळ दिसून येत नाही.

 

अमेरिकेतील आदिवासी लोक हॅमेलिया वनस्पतीच्या खोडाचा वपानांचा अर्क सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर वापरतात उदा., उत्स्फोट, त्वचा कवक, जखमा व कीटकदंश आदी. आधुनिक संशोधनात असे आढळून आले आहे की, तिच्या अर्कात सूक्ष्मजंतुनाशक व कवकनाशक गुणधर्म असलेली अनेक सक्रिय रसायनेे आहेत. स्त्रियांमधील अनियमित ऋतुस्राव, डोकेदुखी, संधिवात, ताप व जुलाब यांवरील औषधांत याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे या वनस्पतीत परिणामकारक प्रतिरक्षा उद्दिपके देखील आढळून आली आहेत. फळांचे सरबत आमांशावर देतात. उंदरांवरील संशोधनात असे दिसून आले आहे की, तिचा वेदनाशामक, मूत्रल व अवतापनासाठीही वापर होऊ शकतो.

 

पहा : रुबिएसी.

 

हर्डीकर, कमला श्री. वाघ, नितिन भरत

 

हॅमेलिया
हॅमेलिया