दुतुंडी : १. टोकास वंध्य फुलोरे व खाली स्त्री-फुलोरे असलेली फांदी, २. वंध्य (द्विलिंगी) स्तबक, ३. जननक्षम फळांना वेढून असलेले छदमंडल, ३. कृत्स्नफळ.

दुतुंडी : (दुतोंडी, शंकेश्वर हिं. शंखाहुली, छोटा गोखरू गु. गाड्रियुं सं. अरिष्ट, सर्पाक्षी इं. बरवीड, कॉकलबर लॅ. झँथियम स्ट्रुमॅरियम कुल–कंपॉझिटी ॲस्टरेसी). ही एक वर्ष जगणारी ⇨ ओषधि  तणाप्रमाणे ओसाड जागी आणि नद्या व ओढे यांच्या काठाने वाढलेली आढळते. भारतात, श्रीलंकेत व जगातील कित्येक उष्ण प्रदेशांत तिचा प्रसार झाला आहे तसेच हिमालयातही सु. १,८६० मी. उंचीपर्यंत ही आढळते परंतु ती मूळची अमेरिकेतील असावी. हिचे खोड आखूड, बळकट, खरबरीत व केसाळ असून पाने अनेक, साधी, एकाआड एक, लांबट देठाची सु. ५–७ सेंमी. लांब व तितकीच रुंद काहीशी त्रिकोणी, थोडीफार त्रिखंडी, दातेरी व केसाळ असतात. फुले लहान, द्विलिंगी (वंध्य) व स्त्रीलिंगी (जननक्षम) अशी दोन प्रकारची असून ती एकाच झाडावर पण भिन्न स्तबक [→ पुष्पबंध] फुलोऱ्यावर जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये येतात. अनेक द्विलिंगी फुलांचे फुलोरे फांद्यांच्या व खोडाच्या टोकास बहुसंख्येने येतात आणि त्यांपासून वंध्य फळे बनतात. पण फक्त दोनच स्त्री–पुष्पे असणारे थोडे फुलोरे पानांच्या बगलेत सापेक्षतः खाली येतात द्विलिंगी फुलांत पिवळट आणि नळीसारखा पुष्पमुकुट असतो परंतु स्त्री–पुष्पात तो मुळीच नसतो. स्त्री–पुष्पांभोवती छदांचे आवरण (छदमंडल) वाढून खरी फळे त्यांमध्ये वेढली जातात ह्या छदांवर राठ, जाड अंकुशासरखे केस वाढतात व पुढे ते बीजप्रसारास साहाय्यक होतात प्रत्येक छदमंडलाच्या (१·६ सेंमी.) वेष्टनात दोन कप्पे व टोकास दोन चोचीसारखे आकडे असून त्या प्रत्येक कप्प्यात एकेक खरे, शुष्क, एकबीजी, न तडकणारे, १·३ सेंमी. आणि गुळगुळीत फळ (कृत्स्नफळ) असते. फळावर टोकास दोन राठ केस असतात बी एक. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी  कुलात (सूर्यफूल कुलात) दिल्याप्रमाणे असतात.

ह्या वनस्पतीचा पाला केस रंगविण्यास वापरतात काढा शामक (शांत करणारा), स्वेदजनक (घाम आणणारा) असल्याने जुनाट हिवतापावर देतात. भूक, आवाज व कांती सुधारण्याचा गुण या वनस्पतीत असून पाने स्तंभक (आकुंचन करणारी) व स्वेदजनक असतात त्यांचे चूर्ण दुखऱ्या गाठी, पुरळ व गंडमाळ यांवर लेप करण्यास वापरतात. पानांचा काढा कुत्रे चावल्यास देतात जुनाट परम्यावर वनस्पतीचा फांट (पाण्यात भिजवून काढलेला रस) उपयुक्त आहे. कळ्या पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणाऱ्या), शामक व स्वेदजनक असून मूळही कडू व पौष्टिक असते तेही गंडमाळावर उपयुक्त असते काटेरी छदमंडलसह फळ शीतकर (थंडावा देणारे) व शामक असून देवीच्या आजारात देतात. बियांत झँथोस्ट्रुमॅरीन हे ग्लुकोसाइड आणि ऑक्झॅलिक अम्ल असते. गुरांना व डुकरांना ही वनस्पती मारक असते.

संदर्भ : 1. Desai, V. G. The Materia Medica and Therapeutics of Indian Medicinal Plants (Marathi), Bombay, 1927.

            2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi , 1975.

जमदाडे, ज. वि परांडेकर, शं. आ.