फायबर, बाकोआ: (इं. स्क्रू पाइन लॅ. पँडॅनस युटिलिस कुल-पँडॅनेसी). केवड्याच्या वंशातील हा बळकट, शाखायुक्त व सु. १५ मी. किंवा अधिक उंच वाढणारा वृक्ष मूळचा मॅलॅगॅसीमधील (मादागास्करमधील) असून भारतात तो शोभेसाठी बागेत लावतात. याची अनेक शारिरिक लक्षणे ⇨ केवडा व पँडॅनेसी कुलात [केतकी कुलात → पँडॅनेलीझ] वर्णिल्याप्रमाणे आहेत. याची पाने निळसर हिरवी, उभी, ७५-२०० X ६-१० सेंमी. असून त्यांच्या कडांवर व मागील बाजूस शिरांवर तीक्ष्ण, बारीक, वर वळलेले व तांबूस काटे असतात. पुं-फुलोरा [पुं-स्थूलकणिश → पुष्पबंध] ५०-८० सेंमी. लांब असून स्त्री-फुलोऱ्यापासून बनलेली संयुक्त फळे एकाकी, लोंबती आणि लांब देठांवर येतात त्यांतील लहान, अश्मगर्भी (आठळीयुक्त) १००-२०० फळे, बाजूनी चपटी, वर अलग व घुमटासारखी आणि खाली जुळलेली असतात. ह्याच्या फळांचे पाइनच्या फळांशी साम्य असते व ह्याच्या पानांची मांडणी मळसूत्राप्रमाणे (स्क्रूप्रमाणे) असते, त्यामुळे याला स्क्रू पाइन म्हणतात.

ह्याच्या पानांच्या टोपल्या, मॅनिला हॅट, चटया व इतर काही घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवितात पाने छपरांसाठीही वापरतात. फळ पिष्टमय अन्नाने भरलेले असून ते उकडून आवडीने खातात. पुं-फुलोरे सुगंधी व खाद्य असतात. ते कामोत्तेजक असावेत, अशी समजूत आहे. ह्याच्या आधारमुळांपासून रंगसफेदीचे साधे कुंचले तयार करतात. मुळांचा काढा गुप्तरोगांवर गुणकारी असतो.

पहा: पँडॅनेलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII New Delhi, 1966.

2. MacMillan, H. F. Tropical Planting and Gardening, New York, 1956.

जमदाडे, ज. वि.