ग्रॅमिनेलीझ : (ग्लुमिफ्लोरी सं. तृण गण). फुलझाडांपैकी (आवृतबीजी) एकदलिकित वनस्पतींचा एक गण. यामध्ये ⇨ग्रॅमिनी  व ⇨सायपेरेसी  या दोन ऱ्हसित (ऱ्हास पावलेली) फुले असलेल्या कुलांचा समावेश होतो. हचिन्सन या प्रसिद्ध वर्गीकरणतज्ञांनी या दोन कुलांचा स्वतंत्र गणात अंतर्भाव केल्याने ग्रॅमिनेलीझ व सायपेरेलीझ असे गणही मानले जातात मात्र त्या संज्ञांचा अर्थ वर दिलेल्यापेक्षा भिन्न होतो. दोन्ही कुलांतील फुलोरा, ऱ्हसित फुले, छदे आणि फुलांची संरचना लक्षात घेता ग्लुमिफ्लोरी हे गणाचे नाव सार्थ वाटते. दोन्ही कुले, लिलिफ्लोरीपासून [→ लिलिएलीझ] अवतरलेल्या जुंकेसी कुलातून स्वतंत्रपणे उत्क्रांत झाली असणे शक्य आहे, कारण जुंकेसी हा लिलिएलीझ व ग्लुमिफ्लोरी यांना जोडणारा दुवा मानतात. जुंकेसी कुलाचा समावेश जुंकेलीझ या स्वतंत्र गणात केला जातो.

ग्रॅमिनेलीझ गणातील वनस्पती बहुतेक ⇨ओषधी  असून क्षुपे (झुडपे) व वृक्ष क्वचित आढळतात. फुले लहान, अपरिदल किंवा परिदलाऐवजी खवले, ताठर केस इ. त्यांत असून शिवाय कमीजास्त प्रमाणात छदे (तुषे) असतात. ती द्विलिंगी किंवा एकलिंगी असून तीन वा सहा केसरदले, १—३ किंजदले, एक कप्प्याचा ऊर्ध्वस्थ किंजपुट ही त्यात आढळतात [→ फूल]. परागण (परागसिंचन) वाऱ्याने घडून येते. बीजक एक आणि फळ शुष्क, न फुटणारे (कृत्स्नफल) असते. ⇨गवते (ग्रॅमिनी) व सायपेरेसी [→ लव्हाळा मोथा] मिळून जातींची संख्या इतर कोणत्याही एका कुलापेक्षा जास्त भरते. जगातील साधारणतः कोणत्याही हवामानात या वनस्पती जगतात व अनेक जाती विविध प्रकारे उपयुक्त आहेत.

ठोंबरे, म. वा.