गुग्गूळ : (हिं. गुगूळ गु. गुग्गुळे, मुकुल क. गुग्गुळा सं. देवधूप, उदीप्ता, गुग्गुळ इं. गम-गुगूल लॅ. कॉमिफोरा मुकुल, बाल्समोडेंड्रॉन मुकुल कुल-बर्सेरेसी). हा सु. १·२—१·८ मी. उंच, पानझडी वृक्ष बलुचिस्तान, सिंध, अरबस्तान व भारत (खानदेश, सौराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक इ.) या देशांत रुक्ष व खडकाळ जमिनीवर आढळतो. याची साल हिरवट पिवळी, राखी व खरबरीत असून तिचे तुकडे सोलून जातात. फांद्या गाठाळ, वेड्यावाकड्या व टोकाशी काटेरी असतात. कोवळ्या भागांवर प्रपिंडयुक्त (ग्रंथीयुक्त) केस असतात. पाने संयुक्त व एकाआड एक असून दले १—३, चकचकीत, दातेरी व लहान देठाची असतात. याची लहान, लालसर, बहुयुतिक फुले दोन-तीनच्या झुबक्यात मार्च ते एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात लहान, वंध्य किंजपुट व स्त्री-पुष्पात वंध्य केसर असतात. संदले ४-५, प्रपिंडयुक्त व केसाळ प्रदले ४-५, पट्टाकृती व केसरदले ८-१०, निम्मी लहान व निम्मी मोठी बिंब पेल्यासारखे व दातेरी [→ फुल] फळ लहान, अश्मगर्भी (आठळीयुक्त). पिकल्यावर लाल व अंडाकृती. आठळ्या दोन व बिया दोन असतात [→ बर्सेरेसी]. 

सालीवर चिरा पाडून राळ-गोंद (गुग्गूळ) मिळतो, त्याला ‘इंडीयन डेलियम’ म्हणतात. तो पिंगट किंवा फिकट हिरवा, सुगंधी असून धुपासारखा वापरतात. तो स्तंभक (आकुंचन करणारा), जंतुनाशक, कफोत्सारी, वाजीकर (कामोत्तेजक), रक्तवर्धक, शामक, वायुनाशी, व्रणनाशक व सौम्य रेचक असतो घसा व दंतविकारांवर उपयुक्त.

हिराबोळ : हा गुग्गुळासारखाच सुगंधी राळ-गोंद गुग्गुळाच्या वंशातील दुसऱ्या जातीपासून (इं. मिर लॅ. कॉमिफोरा मिरा ) मिळतो. याची झाडे अरबस्तान व तांबड्या समुद्राच्या आफ्रिकी किनाऱ्यावर आढळतात. गोंद अग्मिमांद्य, कष्टार्तव (मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना) इत्यादींवर गुणकारी आहे.

परांडेकर, शं. आ.