अंजनवेल : (क. अड्केबीलुबळ्ळी गु. अडूनी वेल लॅ.पोथॉस स्कँडेंस कुल-ॲरॉइडी). शोभेकरिता अनेक ठिकाणी लावली जाणारी ही वेल भारतात सर्वत्र जंगलात आढळते इतर झाडांवर किंवा भिंतीवर आगंतुक मुळ्यांनी चढते. खोड बोटाइतके जाड व बळकट असून त्यावर अनेक फांद्या येतात. कांडी लहान व पाने एकाआड एक, लहान, विविध, परंतु गोलसर, गुळगुळीत, चकचकीत, चिवट देठ सपक्ष व लांब तळ अर्धसंवेष्टी (खोडास अंशत : वेढणारा) पिवळे स्थूलकणिश [→पुष्पबंध] व हिरवा नावेसारखा महाछद, लांबीत सारखे फुले (मे-जुलै) द्विलिंगी परिदले सहा, केसरदले सहा व त्यांच्या टोकांस परागकोश [→फूल] किंजपुट लंबगोल, तीन कप्प्यांचा प्रत्येक कप्प्यात बीजक एकच किंजल नसते. मृदुफळ फार लहान, चपटे व शेंदरी असते.
पानांची पूड देवीच्या आजारात अंगास लावतात खोडाचे तुकडे कापरासह तंबाखूप्रमाणे दम्याच्या विकारात ओढतात.
पहा : ॲरॉइडी पोथॉस ऑरिया.
वैद्य, प्र. भ.