चंदन : (1) फुलाऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४) फळ

चंदन : (हिं. सफेद चंदन, चंदल गु. सुखड, सुखेत क. श्रीगंधा, गंधा, अगरूगंधा सं. चंदन, आनंदितम, मल्यज, गंधसार इं. व्हाइट सँडलवुड ट्री सँडल ट्री, लॅ. सँटॅलम आल्बम कुल-सँटॅलेसी). ह्या परिचित वनस्पतीच्या वंशातील अनेक जातींची (सु. २५) झुडपे व वृक्ष भारतातील द्वीपकल्पी भाग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॉलिनेशिया ते हवाई द्वीपसमूह आणि जुॲन फर्नांदिस बेटे (चिली) इ. प्रदेशांत आढळतात. या सर्व जाती दुसऱ्या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या साहाय्याने अन्नशोषण (नायट्रोजन आणि फॉस्फरस) करतात म्हणून त्यांना अर्धजीवोपजीवी [⟶  जीवोपजीवी] म्हणतात त्यांपैकी चंदन (सँटॅलम आल्बम) ही जाती भारतात विपुल आढळते व विशेषतः द. भारतात (कर्नाटक) लागवडीत आहे, कारण तिचे सुगंधी लाकूड (ईस्ट इंडियन सँडलवुड) व त्यातील तेल (चंदन-तेल) यांना व्यापारी महत्त्व आहे.

चंदन हा भारतीय वृक्ष आहे असे मानण्यास भरपूर पुरावा आहे. भारतीय पौराणिक ग्रंथ, धर्मग्रंथ, संस्कृत वाङ्‌मय, काव्य व लोककथा यांमध्ये त्याचा भरपूर उल्लेख आला आहे. सामविधान ब्राह्मण ग्रंथ, रामायण, महाभारत, धम्मपद, जाकत, अंगुत्तरा, विनय पिटक (इ. स. पू. ४००—३००) कौटिलीय अर्थशास्त्र (इ. स. पू. २००), पतंजलीचे महाभाष्य (इ. स. पू. १००) वगैरेंमधून गेली तेवीस शतके भारतात चंदन लागवडीत असल्याबद्दल इतर काही पुरावेही उपलब्ध आहेत. तथापि तो वृक्ष फार पूर्वी इंडेनेशियातून (तिमोर) आयात झालेला आहे, असे काही शास्त्रज्ञ मानतात. हल्ली त्याचा प्रसार कर्नाटक, कूर्ग, कोईमतूर व महाराष्ट्र येथील जंगलांत (विंध्य पर्वतापासून दक्षिणेकडे) आहे. कर्नाटकात व तमिळनाडूत कमी पावसाच्या भागांत समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत विपुल आढळतो आणि लागवडीतही आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व ओरिसा येथेही त्याचा प्रवेश झाला असून तो तेथील निसर्गाशी समरस झाला आहे मात्र त्याचे लाकूड कमी प्रतीचे असते. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्यानांतून तो लावला जातो.

चंदनाचा वृक्ष सदापर्णी असून सु. १५ मी. उंच वाढतो, तथापि अनुकूल परिस्थितीत सु. १८–२० मी. पर्यंतही वाढतो त्याला काहीशा बारीक व लोंबत्या फांद्या असून साल गडद भुरी लालसर किंवा काळपट, खरबरीत आणि उभ्या, बारीक व खोल रेषांनी व्याप्त असते अंतर्साल गडद रंगाची असते. त्याला गुळगुळीत, साधी, लहान (१·५–८ X १·६–३·२ सेंमी.), समोरासमोर, लांबट, भाल्यासारखी, पातळ, दोन्हीकडे टोकदार पाने असतात मार्च ते ऑगस्टमध्ये शेंड्यावर किंवा पानांच्या बगलेत लहान परिमंजरीय वल्लरीवर [⟶  पुष्पबंध] लहान, गंधहीन, फिकट पिवळसर, भुरी जांभळट, लालसर जांभळट किंवा लालसर निळी फुले येतात. फळे (अश्मगर्भी अथवा आठळीयुक्त) गोलसर (१·३ सेंमी. व्यासाची), गर्द जांभळी असून बिया गोल किंवा एका टोकास निमुळत्या व दुसऱ्या टोकास गोलसर आणि कठीण व खरबरीत असतात. फुलाची संरचना आणि इतर शारीरिक लक्षणे चंदन कुलात [⟶ सँटॅलेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

जमीन व हवामान : या वृक्षाला लहान असताना सावली चालते, परंतु पुढे तो उघड्यावर चांगला वाढतो. तसेच कोवळेपणी तो तोडल्यावर राहिलेल्या खुंटापासून नवीन प्ररोहांची (धुमाऱ्यांची) वाढ होते, परंतु जून झाडांची तशी वाढ होत नाही. बराच काळ पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यास तो जगत नाही, तसेच कोवळेपणी प्रखर सूर्यतापाने त्याची साल वाळून सोलून जाते, लाकूडही वाळते आणि झाड नाश पावते अशा वेळी जवळच्या झाडांची सावली त्याचे संरक्षण करते. वनातील अग्नीच्या (वणव्याच्या) भक्ष्यस्थानी ही झाडे सहज पडतात तथापि पुढे बुंध्यापासून नवीन धुमारे फुटतात. साधारणतः ६००—१,०५० मी. उंचीपर्यंत ही झाडे चांगली वाढतात. सु. ६०—१६० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात त्यांची विपुलता दिसते. उत्तम मध्यकाष्ठ (खोड किंवा फांद्या यांच्या आतील भागातील घन व बहुधा गर्द रंगाचे लाकूड) ६००—९०० मी. उच्चता व ८५—१३५ सेंमी. पाऊस असलेल्या प्रदेशातील झाडात असते थोडक्यात थंड हवा, मध्यम पर्जन्यमान, भरपूर सूर्यप्रकाश व बराच काळ कोरडी हवा त्यांच्या लागवडीस उत्तम असते. भोवताली घाणेरी, बांबू असलेल्या खुरट्या जंगलात किंवा शेतांच्या कडेने चंदनाची झाडे विशेषेकरून वाढल्याचे आढळते. चंदनाला काळ्या व खोल जमिनीपेक्षा खडकाळ, लाल, लोहयुक्त, उथळ रेताड, निचऱ्याची व निकस जमीन जास्त चांगली मानवते ओलसर व सकस जमिनीत वाढ अधिक चांगली झाली, तरी लाकडाचा दर्जा तेलाच्या दृष्टीने कमी प्रतीचा ठरतो. कर्नाटकात चंदनाची नैसर्गिक वने पठारावर सु. १,६०,००० चौ. मी. च्या क्षेत्रात समुद्रसपाटीपासून ते १,२०० मी. उंचीपर्यंत व सु. ५०—१८० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात आढळतात. त्यापैकी १२,००० चौ. मी. चा एक संपन्न पट्टा कर्नाटकाच्या सदापर्णी वनांच्या पूर्वेस व दुसरा ईशान्येकडील कूर्गपासून ते आंध्र प्रदेशातील काही जिल्हांच्या सीमेपर्यंत आढळतो. याशिवाय धारवाड, शिमोगा चिकमंगळूर, तुमकूर, हसन, मरकारा, म्हैसूर, बंगलोर, कोलार इ. ठिकाणी चंदनाचे खासगी क्षेत्र पसरले आहे. तमिळनाडूत मुख्यतः कोईमतूर, निलगिरी, सालेम, वेल्लोर या ठिकाणी विपुल आणि तिरुनेलवेली व तिरुचारपल्ली येथे कमी प्रमाणात चंदनवने आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, छोटा नागपूर इ. ठिकाणी कमीजास्त प्रमाणात नैसर्गिक वने व मानवनिर्मित लागवडी आढळतात. पक्ष्यांनी प्रसार केलेल्या बियांपासून अनेक ठिकाणी बरीस झाडे इतरत्र उगवतात परंतु त्यांतील बरीच अनेक कारणांनी नाश पावतात. योग्य आश्रय वनस्पती मिळाल्याशिवाय चंदनाची वाढ चांगली होत नाही. ऐन, तामण, धावडा, शिसव, करंज, शिरीष, बाभूळ इ. किंवा त्यांच्या वंशांतील किंवा काही इतर वनस्पती (अंकोल, साग, निंब, मोह, तरवड, पांगारा, निलगिरी, बकुळ, कुंकमवृक्ष, निर्गुडी, कुडा, बोर, कुचला, बारतोंडी इ.) हे आश्रय मानवतात.


लागवड व मशागत : लागवडीकरिता उत्तम झाडांच्या खाली पडलेली सुकी करडी फळे गोळा करतात आणि पोत्यात भरून साठवितात दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ती उपयोगात आणतात. पासाळा सुरू झाल्यानंतर त्या बिया दर ठिकाणी चार-पाच याप्रमाणे सुयोग्य काटेरी झाडाखाली पेरतात. अनेकदा त्या बियांबरोबर आश्रय झाडांचेही बी पेरतात. सु. ८—१५ दिवसांत चंदनाचे बी उगवते व वर्षभरात रोपे २०—३० सेंमी. उंच वाढतात दुसऱ्या वर्षाच्या शेवटी ६०—७० सेंमी. उंच होतात. दहा वर्षांनी त्यांची उंची सु. दहा मी. होते व मध्यकाष्ठ बनू लागते त्यात वार्षिक वलये दिसतात. संप्रेरके [⟶  हॉर्मोने], मुळे छाटणे, खोडावर धक्के मारणे अशा उपायांनी मध्यकाष्ठ अधिक वाढते.

  रोगराई : चंदनाला सर्वांत जास्त नुकसानकारक असा ‘कणिश’ (स्पाइक) रोग होतो. तो सांसर्गिक असून कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणारा) वा विषाणुजन्य (व्हायरसजन्य) असावा असे आढळले आहे. या रोगामुळे पाने लहान, निरुंद, सरळ, ताठर बनतात आणि दोन पानांमधील कांडे आखूड होते पाने पिवळी, पिंगट किंवा लाल होतात फुलातील दले पानांचे रूप धारण करतात आणि ती वंध्य बनतात. मुळांची टोके मरतात व कुजतात एकंदरीने अशा रोगट फांद्यांची वाढ जास्त होते व कधी त्या लोंबू लागतात. पुढे पुढे झाडे मरतात. अनेक प्रकारचे प्रयोग करून असे आढळते आहे की, हा रोग बरा होण्यास उपाय उपलब्ध नाही फक्त त्याचे नियंत्रण करता येते. झाडांच्या खोडावरची साल खोडासभोवर एका वलयाप्रमाणे काढून विषाने ती भरल्यास रोगाची वाढ थांबते परंतु त्याकरिता रोगाचा प्रादुर्भाव योग्य वेळी (शक्य तो लवकर) ओळखणे आवश्यक असते तथापि हा हमखास उपाय नव्हे असेच आढळते असून इतर उपायांसंबंधी प्रयोग चालू आहेत. या रोगाशिवाय ⇨ अमरवेलीमुळे व काही कीटांमुळेही नुकसान होते.

लाकूड : सर्वसाधारणतः वीस वर्षे झालेल्या झाडात मध्यकाष्ठ वेगाने वाढू लागते व तीस ते साठ वर्षांपर्यंत वाढलेल्या झाडांत ते भरपूर बनलेले असते यावेळी त्यांचा घेर चाळीस ते साठ सेंमी. असतो. लाकूड मिळविण्यास झाडे पावसाळ्यानंतर मुळापासून खणून काढतात कारण मुळांतही तेल असते. जून व जाड फांद्या कापून काढतात आणि इतर लहान (मध्यकाष्ठहीन) फांद्या छाटून टाकतात त्यामुळे मधला सलग खोडाचा भाग (सोट) मिळतो. ह्याची साल व बाहेरील पांढरे रसकाष्ठ काढून जाड सोटाचे लहान ओंडके (त्यावर थोडा २-३ सेंमी. पांढरा भाग राखून) करतात प्रत्येक ओंडका ९० सेंमी. किंवा त्याच्या पटीत येण्याइतका लांब असतो तो मुळांसकट वजन करून साठवणीकरिता पाठवितात कापताना मिळालेला भुसा जपून ठेवतात प्रथम काढलेला पांढरा भाग जाळून टाकण्यात येतो. साठवणीनंतर तासून त्या ओंडक्यांना अंतिम शुद्ध (मध्यकाष्ठ) स्वरूप देतात. १९५४-५५ साली बंगलोर येथील गुदामात २,२९० टन ओंडक्यांपासून १,७१० टन चांगले काष्ठ बनविले गेले. ‘बॉम्बे बिलेट’ आणि ‘मलबार पेरिया’ अशी नावे निर्यातयोग्य मालाला लावली जातात. कर्नाटकात तयार ओंडके सरकारी तेल-कारखान्यास पुरविले जातात. इतरत्र वनखात्याद्वारे यांचा लिलाव पुकारून विकले जातात. चंदनाच्या महत्त्वामुळे त्याची लागवड व नंतरची विक्री यांवर सरकारने कायदेशीर बंधने घातली आहेत.

चंदनाच्या झाडातील लाकडाचा गर्द रंगाचा पिंगट व सुगंधी मधला भाग (मध्यकाष्ठ) व बाहेरचा पिवळट पांढरा भाग (रसकाष्ठ) असे दोन भाग पडतात. रसकाष्ठाला वास नसतो. मध्यकाष्ठाचा सुगंध बरेच वर्षे टिकतो ते टिकाऊ, जड आणि कठीण असते त्याला रंधणे, घासणे इ. संस्कारांनी गुळगुळीत व स्वच्छ तजेलदार करता येते त्याला वाळवी लागत नाही. पिवळे व लालसर असे त्याचे दोन प्रकार बाजारात येतात. ते जितके गर्द तितके त्यात तेल अधिक असते तेल-उद्योग मोठा व महत्त्वाचा आहे. तेल न काढलेले मध्यकाष्ठ (लाकूड) कापीव व कोरीव कामास वा धुपाकरिता उपयोगात येते. भारतात हस्तिदंताखालोखाल चंदनाचे कोरीव काम उत्कृष्ट प्रकारे बनविण्याची जुनी परंपरा आहे. लहान नवलपूर्ण व कलाकुसरीच्या वस्तू (काही प्राणी, सिगारेटकरिता नळ्या, देवादिकांच्या मूर्ती, लहान पेट्या, डब्या, हातातील काठ्या, खेळणी, फण्या, चित्रांच्या चौकटी, दिनदर्शिका इ.) आजही भरपूर बनवितात आणि विकतात त्याला लोकाश्रय चांगला मिळतो [⟶  लाकूडकाम]. लाकडाचा भुसा तेलाकरिता किंवा बव्हंशी धुपाकरिता वापरतात कपड्यात किंवा कपाटात तो वासाकरिता ठेवतात. रसकाष्ठाचाही उपयोग खेळणी, कॅरमच्या चकत्या, काही नवलपूर्ण वस्तू, फळ्या, खोकी इत्यादींकरिता करतात. हा सर्व उद्योग म्हैसुरात आणि त्यालगतच्या भागात विशेषकरून चालतो तसेच तमिळनाडूतही चालू आहे राजस्थानात हा उद्योग चालतो पण त्याकरिता लाकूड कर्नाटकातून आणवतात. केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात व उ. प्रदेश या राज्यांताही हे कोरीव काम करतात. या सर्व प्रदेशांतील कामामध्ये प्रत्येकाचे स्थानिक कला-वैशिष्ट्य आढळते. भारतात अनेक ठिकाणी घरोघरी, चंदनाचे गंध देवादिकांना व स्वतःस कपाळी लावण्यास व देवळात चंदनलाकूड धुपाकरिता वापरतात. पारशी अग्यारीतही (अग्निमंदिरात) चंदनाचा वापर करतात. भुसा व तेलाचा वापर उदबत्त्यांकरिता मोठ्या प्रमाणावर करतात. लाकूड व तेल या दोन्हींचा उपयोग औषधाकरिता पूर्वीपासून केला जातो. ती दोन्ही थंडावा देणारी, ज्वरनाशक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) असतात. भाजणे व पोळणे यांवर चंदनाच्या गंधाचा लेप लावतात. डोकेदुखीवर कपाळास व पापण्यांवरही गंध लेप करतात. तेल परम्यावरील औषधांत वापरीत असत बियांतील तेल कातडीच्या रोगांवर वापरतात.

उत्पादन व व्यापार : चंदनाच्या लाकडाचे उत्पादन, विक्री इ. संबंधीचा अधिकृत तपशील त्रोटकपणे मिळतो. १९६१—७० या काळात भारतात ३,७५०—६,००० टन लाकडाचे उत्पादन झाले, त्यापैकी पाऊणपट कर्नाटकातील आहे. तमिळनाडूत १९६९ मध्ये १,३०० टन झाले. १९६२—६९ मध्ये उत्पादित मध्यकाष्ठाची दर टनी किंमत सु. ५,५८०—११,१५८ रु. होती रसकाष्ठाची किंमत दर टनी २१५—५०७ रु. होती. भारतात मुख्यतः इंदूर, उज्जैन, मुंबई व कनोज येथे चंदनाची खरेदीविक्री होते. तेल काढून घेतल्यावर चोथ्याचा उपयोग धुपाकरिता व तंबाखूतून ओढण्याकरिता करतात. भारतातून लाकूड, लाकडाचे ढलपे, रांधा, भुसा, तेल यांची निर्यात होते यात तेलाला महत्त्वाचे स्थान आहे. १९६९—७० सालचे या वस्तूंचे निर्यात प्रमाण कोष्टकातील आकड्यांवरून लक्षात येईल.

१९६९-७० मध्ये भारतातून झालेली चंदनाच्या वस्तूंची निर्यात. 

वस्तू 

वजन (कि. ग्रॅ.) 

किंमत (हजार रूपयांत) 

तेल

१,०८,११२

२७,४७६

लाकूड

४,४०,०००

६,०८३

तुकडे व भुसा

३,३६,०६६

४४४

रांधा

३५९

एकूण                   ८,८४.१७८                                        ३४,३६२

भारतातून चंदनाच्या उत्पादनांची जपान, सूदान, हाँगकाँग, ब्रह्मदेश, सिंगापूर, मलेशिया, मस्कत, अमेरिका, सौदी अरेबिया, श्रीलंका, इटली, नायजेरिया, केन्या, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, इथिओपिया, फिजी बेटे, स्वित्झर्लंड इ. देशांस निर्यात होते. भिन्न देशांमध्ये यांपैकी भिन्न वस्तू भिन्न प्रमाणात भारतातून आयात केल्या जातात, असे आढळले आहे.


चंदन-तेल : याचा वापर जगभर केला जात असून भारतातून सर्वांत मोठ्या प्रमाणात निर्यात होते. भारतात फार प्राचीन काळापासून तेलाचे उत्पादन केले जात आहे. पूर्वी साध्या पद्धतीने (पाण्यात बारीक पूड उकळून आणि वाफेच्या रूपात आलेले तेल थंड करून) विशेषतः म्हैसूरलगतच्या प्रदेशात व उ. भारतातील कनोजमध्ये तेल काढीत असत. हल्ली ९०% उत्पादन सुधारलेल्या पद्धतीने (ऊर्ध्वपातनाने) तेल काढण्याचे यांत्रिक कारखाने असून काही थोड्या प्रमाणात जुन्या पद्धतीने काढतात. नवीन आधुनिक पद्धतीत यंत्राने लाकडाचे बारीकमोठे तुकडे (भरड) करतात त्यानंतर पुन्हा यंत्राद्वारे त्याची बारीक भुकटी करतात. ती भुकटी नंतर तांब्याच्या मोठ्या (एक टन धारणा असलेल्या) बंद टाक्यात घालून वाफेच्या साहाय्याने ऊर्ध्वपातन करतात व अंतिम पदार्थ (ऊर्ध्वपातित) शीतकात (तेलाची वाफ थंड करण्याच्या पात्रात) भरून घेतात. ही प्रक्रिया ४८—७२ तासांत होते. वाफेचा दाब कमीजास्त करून तेलाचे प्रमाण व वेळ कमीजास्त करतात त्यामुळे वासही कमीजास्त होतो त्यानंतर गाळणे आणि शुद्ध करणे हे संस्कार करतात. शुद्ध तेल फिकट पिवळट असते. मुळांतून गुणाने व वजनाने अधिक (१०%) तेल निघते लाकूड व मुळे मिळून सरासरीने ४·५०–६·२५% तेल मिळते. ते काहीसे चिकट असून त्याला गोड टिकाऊ वास येतो. रासायनिक दृष्ट्या विचार केल्यास त्यात सँटॅलॉल (C15H24O) ९०—९४% असते आणि चंदन-तेलाच्या वासाला व औषधी गुणधर्माबद्दल तेच जबाबदार असते याशिवाय त्यात सँटीन, सँटॅलिनासारखी हायड्रोकार्बने, सँटेनॉल, टेरेसँटेलॉलासारखे अल्कोहॉल, आल्डिहाइडे, कीटोने, अम्ले इ. असतात. म्हैसूर येथील सरकारी चंदन-तेल कारखान्यातून सु. ११·३ किग्रॅ. प्रमाणित तेलाचे डबे बंद करून बाहेर पाठवितात २·३ किंवा ४·५ किग्रॅ. तेलाचे लहान डबे स्थानिक उपयोगाकरिता मिळतात. चंदन-तेल अत्तरे व सुगंधी तेले, सौंदर्य प्रसाधने, साबण इत्यादींकरिता फार मोठ्या प्रमाणात वापरतात औषधात फक्त १०% वापरतात. सीडारवुड तेल [⟶  सीडार], एरंडेल आणि इतर कित्येक वनस्पतींच्या तेलाची चंदन-तेलात भेसळ करतात. भारतात १९६९-७० या वर्षांत १४६ टन तेलाचे उत्पादन झाले. म्हैसूर येथील सरकारी कारखान्यात १९७०-७१ साली ६८,४२९ किग्रॅ. तेलाचे उत्पादन झाले व त्यापेकी ५१,६२५ किग्रॅ. निर्यात झाले. १९७४-७५ मध्ये भारताने ७१,४२७ किग्रॅ. चंदनाच्या तेलाची निर्यात करून ७,०८,६८,७९९ रुपयांचे परदेशी चलन मिळविले. कृत्रिम (संश्लेषित) तेल उपलब्ध होत असल्याने खऱ्या तेलाच्या उद्योगाला धक्का पोहोचू लागला आहे.

चंदनाच्या बियांपासूनही स्थिर व दाट गर्द लाल तेल निघते, त्याचा उपयोग इतर सुकणाऱ्या तेलासारखा रोगणाकरिता (व्हार्निशाकरिता) होतो. ताज्या पानापासून फिकट पिवळे मेण मिळते. फळातूनही चिकट तेल काढतात त्यात अनेक शर्करा आणि कार्बनी तेले असतात [⟶  बाष्पनशील तेले].

परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.

आ. २. रक्तचंदनछ (१) फुलासह फांदी, (२) फळ

रक्तचंदन : (हिं. लाल चंदन गु. रातनिली सं. क. बं. रक्तचंदन इं. रेड सँडलवुड, रेड साँडर्स लॅ. टेरोकार्पस सँटॅलीनस कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). हा मध्यम उंचीचा शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष भारतात दक्षिण पठाराच्या पूर्वेस) गोदावरी ते पालार नदीच्या प्रदेशात, तमिळनाडू राज्यातील कडप्पा जिल्ह्यात व श्रीलंका ते फिलिपीन्स बेटे या प्रदेशांत आढळतो. याचे ⇨बिबळ्याशी अनेक लक्षणांत साम्य असून काही किरकोळ फरक दोन्हींत आढळतात. याची साल गर्द पिंगट, आडवी व उभी चिरलेली असून तिचे लांबट चौकोनी तुकडे निघतात. याच्या लहान संयुक्त पानास बहुधा फक्त तीनच एकाआड एक दले असून प्रत्येक दल चिवट, ३·८–८ सेंमी. लांब आणि खालच्या बाजूस लवदार असते. फुले थोडी व पिवळी आणि शिंबा लहान (३·८ सेंमी. लांब), चपटी, गोलसर व पंखयुक्त असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (पॅपिलिऑनेटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

याचे लाकूड गडद लालसर काळे, फार कठीण व वाळवीपासून सुरक्षित असते. त्याचा उपयोग त्याच्या वंशातील बिबळ्याच्या लाकडाप्रमाणे अनेक उपयुक्त वस्तुंकरिता होतो बाहुल्या, दागिन्यांच्या पेट्या, देवांच्या मूर्ती, चित्रांच्या चौकटी अशा विविध वस्तूंसाठी विशेष होतो. यात सँटॅलीन नावाचे रंगीत राळेसारखे द्रव्य असते त्याचा उपयोग औषधांना रंग आणण्यास, लाकूड, रेशीम, कापड आणि कातडी रंगविण्यास व कॅलिको छपाईकरिता फार होतो. लाकूड औषधी आहे. याचे अनेक गुणधर्म चंदनाप्रमाणे आहेत. ते पौष्टिक व स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) असून त्याचा काढा जुनाट आमांशावर देतात. लाकडाचे चूर्ण दुधाबरोबर मूळव्याधीवर देतात. लाकूड उगाळून बाहेरून लेप लावल्यास थंडपणा येतो म्हणून तो गळवे, सूज, डोकेदुखी, त्वचादाह, नेत्रदाह, ज्वर इत्यादींवर गुणकारी ठरला आहे. लाकडाचे चूर्ण औषधी तेलात आणि इतर अनेक औषधांत मिसळतात ते वांतिकारक असते. हिंदू लोक कपाळावर गंध लावण्यास वापरतात.

परांडेकर. शं. आ.

लाल चंदन : (पालार म. गु. हिं. रोहण क. सुंब्री, स्वामीमर सं, रोहिणी इं. इंडियन रेडवुड, बॅस्टर्ड सीडार लॅ. सॉयमिदा फेब्रिफ्यूजा कुल-मेलिएसी). सु. २१ – २४ मी. उंच व २·१–२·४ मी. घेर असलेला हा मोठा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र रक्ष व खडकाळ टेकड्यांवर व श्रीलंकेत आढळतो. खोडावरची साल निळसर उदी वा गर्द पिंगट, खरबरीत असून तिचे मोठे तुकडे सोलून निघतात. पाने संयुक्त, पिसासारखी, मोठी, २३ – ४७ सेंमी. असून दले ६-१२, समोरासमोर, लंबगोल आणि तळाशी तिरपी असतात. हिरवट पांढरी फुले लांब मंजरीवर मार्च-मेमध्ये येतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨मेलिएसी  कुलास वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे (बोंडे) काळी असून जुलै-ऑगस्टमध्ये पिकतात तडकल्यावर पाच शकले होतात बिया सपक्ष व चपट्या असतात.

याचे लाकूड कठीण व जड असून घरबांधणी, सजावटी सामान, तेलाचे घाणे, हौद, कोरीव व कातीव काम इत्यादींस उपयुक्त असते. सालीतून निघणारा डिंक इतर डिंकाप्रमाणे उपयोगात आहे. सालीतील टॅनिनामुळे कातडे कमावल्यावर पिंगट होते सालीतील बळकट धाग्यांचे लालसर दोर करतात. साल कडू, उत्तेजक व स्तंभक असते आमांश (आव) व अतिसारावर गुणकारी असून तिचा काढा ज्वरनाशक असतो गुळण्यांकरिता व बस्तीकरिता तो उपयुक्त असतो. पाण्याचे दुर्भिक्ष्य व आग यांपासून हे झाड सुरक्षित राहते.

वैद्य, प्र. भ.

संदर्भ : CSIR, The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.