खारीक, सीलोनी : (इं. सीलोन डेट-पाम लॅ. फिनिक्स झेलॅनिका कुल-पामी). हा लहान वृक्ष ⇨ शिंदीसारखा आणि त्याच वंशातील कुलातील असून मूळचा श्रीलंकेतील (त्यावरून लॅटिन नावातील जातिवाचक शब्द : झेलॅनिका) आहे. तो किनाऱ्यावरील ओहोळाच्या काठाने वाढलेला आढळतो. भारतात बागेत चांगला वाढतो. उंची ३–७ मी., खोड खरबरीत दले पानाच्या मध्य शिरेस काटकोनात वाढतात ती अरुंद, टोकदार, २०–२५ सेंमी. लांब असतात. फुले एकलिंगी, भिन्न झाडांवर व सामान्यत ⇨ पामी कुलात वर्णिल्याप्रमाणे फळे लहान, प्रथम शेंदरी व नंतर जांभळी होतात. श्रीलंकेत पानांच्या हॅट व टोपल्या बनवितात मात्र तत्पूर्वी ती पाने उकळत्या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवतात.

पहा : खजूर.

पाटील, शा. दा.