सुज्ना : (हिं. सेंगोरा लॅ. मोरिंगा कोंकनेन्सिस कुल-मोरिंगेसी). ⇨शेवग्याच्या प्रजातीतील दुसऱ्या प्रकारचा हा वृक्ष कोकण, गुजरात, सिंध, राजस्थान व बलुचिस्तान येथे आढळतो. याची पाने बहुधा द्विगुण-(क्वचित त्रिगुण-) पिच्छाकृती असून पर्णाक्ष तळाशी फुगलेला असतो. फुलांची रचना शेवग्याच्या फुलांसारखी असते. दलके थोडी मोठी असतात पाकळ्या पिवळट असून त्यांवर लालसर शिरा असतात. शेंगा सरळ, लांब व त्रिकोणी असून कोणत्याही दोन बियांमधल्या भागात उथळ खाच असते. बिया सपक्ष, फिकट पिवळ्या अथवा पांढऱ्या असतात. खोड व बिया पौष्टिक असून पोटदुखीवर उपयुक्त पाने, फुले व फळे खाद्य असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे मोरिंगेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

पहा : मोरिंगेसी.

मुजूमदार, शां. ब.