कापूर : एक सुगंधी ज्वालाग्रही द्रव्य. रासायनिक दृष्ट्या कापूर हे एक द्विचक्रीय व तृप्त (ज्याच्या संरचनेतील कार्बन अणू एकमेकांस बंधांनी जोडलेले असतात असे) टर्पिन-कीटोन संयुग आहे. हे एक पूजाद्रव्यही आहे. देवाच्या षोडशोपचार पूजेत मंगलारती झाल्यावर कापराची आरती करतात. कापराचे दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असेही सांगितले आहे.

प्राचीन काळी चीन व अरब देशांशी व्यापार सुरू झाल्यावर भारतात कापूर प्रथमच माहित झाला. आईन-इ-अकबरीमध्ये भीमसेनी कापराचा उल्लेख आढळतो. वनस्पतीपासून बनविलेला कापूर फार पूर्वीपासून लोकांना माहीत होता.

कापूर वृक्ष (सिॅनमोम कॅम्पोरा) : (१) कापाराच्या झाडाची फांदी,(२) फूल व कळया, (३) केसरदल,(४) तीन फळांपैकी पढून गेलेले.

नैसर्गिक कापराच्या वाढत्या उपयोगामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष त्याची रासायनिक संरचना शोधून काढण्याकडे वेधले गेले. १८३२ मध्ये द्यूमा यांनी कापराचा रेणुभार शोधून काढला. यानंतर एकाच वर्षाने ब्लांचेट व सेल यांनी त्याचे रेणुसूत्र शोधून काढले. बोर्निओलाचे (बोर्निल अल्कोहॉल किंवा मलाई कापराचे) नायट्रिक अम्लाने ऑक्सिडीकरण [→  ऑक्सिडीभवन] करताना, पेलौझी यांना कापूर तयार होतो असे आढळून आले. १८४३ मध्ये या शोधास झेरार यांनी दुजोरा दिला. १८९३ मध्ये ब्रेट यांनी सुचविलेली संरचना मान्य करण्यात आली आहे. कोम्पा आणि हॉलर यांनी १९०८ मध्ये प्रथमच रासायनिक संश्लेषणाने ( कृत्रिम रीतीने) कापूर बनविला.

कापूर बाजारात निरनिराळ्या नावांनी विकला जातो. कापराचे प्रकाशीय सक्रीयतेनुसार (विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाच्या कंपनाचे प्रतल फिरविण्याच्या गुणधर्मानुसार) दक्षिणवलनी (प्रतल उजवीकडे वळविणारा) कापूर व वामवलनी (प्रतल डावीकडे वळविणारा) कापूर असे दोन प्रकार आहेत. दक्षिणवलनी कापराला जपानी कापरू, लॉरेल कापूर, फोर्मोसा कापूर किंवा डिंक-कापूर अशी नावे आहेत. वामवलीन कापूर मॅट्रिकारिया पार्थेनियम या वनस्पतीच्या तेलात आढळतो. त्याला मॅट्रिकारिया कापूर असे म्हणतात. टर्पेंटाइनापासून मिळणारा संश्लेषित कापूर हा रॅसेमिक (डावीकडे व उजवीकडे असे दोन्हीकडे प्रकाशाचे कंपन प्रतल फिरविणाऱ्या) प्रकारचा असतो.

नैसर्गिक कापूर : हा दालचिनी व तमालपत्र यांच्या वंशातील व लॉरेसी कुलातील सिनॅमोमम कॅम्फोरा (हिं. मरकपूर क. कप्पूर सं. कर्पूर इं. कॅम्फर) या सदापर्णी वृक्षापासून मिळविला जातो. हा वृक्ष मूळचा फोर्मोसा, चीन व जपान येथील आहे. भारतात डेहराडून, सहारनपूर, कलकत्ता, निलगिरी व म्हैसूर या ठिकाणी त्याची यशस्वीपणे लागवड केली आहे. अमेरिकेत तो शोभेचा वृक्ष म्हणून लावतात.

हा एक भक्कम वृक्ष असून त्याची सर्वसाधारण उंची सु. १३ मी. इतकी असते. किंचित रेताड मिश्रणाची व निचऱ्याची जमीन याला मानवते. ओली जमीन चालत नाही. थोडे दहिवर बाधत नाही. जून झाडाच्या खालच्या बाजूस फारशी पाने नसतात., पण वरच्या भागात दाट पर्णसंभार असतो. कोवळे लालसर पल्लव आकर्षक वाटतात. पाने साधी, मध्यम आकाराची , एकांतरित (एकाआड एक), अंडाकृती-दिर्घवृत्ताकृती, लांबट टोकाची, साधारण जाड, सुवासिक, गर्द हिरवी चकचकीत असून त्यांची खालची बाजू निळसर रूपेरी असते. मध्यशिरेच्या दोन बाजूंस एक मोठी शीर दिसते. पानांच्या बगलेत पिवळ्या सुगंधी व लहान फुलांच्या परिमंजिऱ्या येतात. कळ्या खवलेदार प्रत्येक फुलात सारखी सहा पातळ परीदले, ९ किंवा कमी केसरदलांची तीन मंडले व वंध्य केसरदलांचे एक मंडल असते. [→ फुल]. फळ मोठ्या वाटाण्याएवढे, अश्मगर्मी (आठळीयुक्त), पेल्यासारख्या परीदलांनी अंशत: वेढलेले असते. झाडाच्या सर्व भागांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते.

बोर्निओ (बारूस किंवा भीमसेनी ), कापूर हा ड्रायोबॅलेनॉप्स कॅम्फोरा या उंच झाडापासून काढतात. तो महाग असतो. नागी (ब्लुमिया) कापूर ब्लुमिया बालसमीफेरा या झाडापासून काढतात. भीमसेनी कापूर पाण्यापेक्षा जड असतो.

उत्पादन : जंगलातील कापराच्या वृक्षापासून व लागवड केलेल्या वृक्षापासून कापराचे निष्कर्षण करण्याच्या (अलग काढण्याच्या) पद्धती सारख्याच आहेत. यात झाडांच्या पानांपासून व लहान फांद्यांपासून कापूर काढतात, तसेच झाडाच्या खोडापासूनही काढतात. सामान्यत: पाने व बारीक फांद्या कापरासाठी घेत नाहीत. झाड ४५-५० वर्षांचे झाल्यास त्याच्यापासून कापूर काढणे आर्थिकदृष्ट्या परवडते. कापराच्या झाडांचे मळे निर्माण करण्याचे प्रयत्न भारत, ब्रह्मदेश, मलाया, श्रीलंका, इटली, पूर्व अफ्रिका व दक्षिण अमेरिका येथे करण्यात आले. उत्तर अमेरिकेत त्याची लागवड करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

झाडाचे बारीकबारीक तुकडे करून त्याचे वाफ-ऊर्ध्वपातन (वाफेच्या साहाय्याने बाष्प तयार करून व ते थंड करून) करतात. यामध्ये मिळणारा कापूर व कापराचे तेल एका विशिष्ट पात्रात गोळा करतात. त्यातून पाणी बाजूला काढतात व उरलेल्या भागातून केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेच्या) पद्धतीने किंवा जलदाब यंत्राच्या साहाय्याने कापूर तेल आणि पाण्याचा अंश यांपासून अशुद्ध कापूर, अलग करतात. अशुद्ध कापूर बऱ्याच पद्धतींनी शुद्ध करतात. त्यांपैकी एका पद्धतीत अशुद्ध कापूर एका लोखंडी भांड्यात सु. ४८ तासांपर्यंत तापवितात. तापमान वाढताच, त्यातील पाणी व तेल कापरापासून अलग होते व कापूर ९८-९९% शुद्ध व फुलाच्या आकाराच्या स्वरूपात मिळतो. दाब देऊन त्याचे तुकडे बनवितात. दुसऱ्या एका पद्धतीत झाकण असलेले सपाट लोखंडी भांडे वापरून संप्लवनाने (घनस्थितीतून एकदम वायुरूप स्थितीत जाण्याने) सु. ४ किग्रॅ. वजनाच्या चौकोनी तुकड्यांच्या स्वरूपात कापूर मिळतो. संप्लवन करून मिळालेल्या वाफा थंड केल्यास चूर्ण मिळते. त्याच्या दाबून वड्या बनवितात. बेंझीन किंवा पेट्रोलियम ईथर यांमधील अशुद्ध कापराच्या विद्रावाचे स्फटिकीकरण केल्यास शुद्ध कापूर मिळतो. तो केंद्रोत्सारी पद्धतीने कोरडा करतात. अशुद्ध कापूर ओलसर, करड्या शुभ्र रंगाच्या चूर्ण स्वरूपाचा असतो.

सु. ४५ किग्रॅ. अशुद्ध कापूर तेलापासून सु. २२किग्रॅ. कापूर, सु. ९ किग्रॅ. लाल कापूर तेल, सु. ७.५ किग्रॅ. शुभ्र (हलके) कापूर तेल, सु. १ किग्रॅ. डांबर इ. पदार्थ मिळतात. सामान्यत: तेलाचा १२% भाग फुकट जातो.

लाल कापूर तेलाचा (करडे किंवा जाड तेल) उकळबिंदू २१०-२५० से., वि. गु. १-१.०३५, प्रज्वलन (पेटण्याचा) बिंदू सु. १०६ से. असतो. कापूर काढून घेतल्यानंतर मिळणाऱ्या ह्या तेलात टर्पिनेओल, सॅफ्रोल, सेस्क्विटर्पीन हायड्रोकार्बने, अल्कोहॉले इ. घटक असतात.


हलक्या किंवा शुभ्र कापूर तेलाचा उकळबिंदू १६०-१८५से., वि. गु. ०.८७ – ०.८७५, प्रज्वलनबिंदू ४८से. असतो. त्यात टर्पिने, सिनेओल आणि अल्प प्रमाणात टर्पिनेओल, ब्रोर्निओल व कापूर हे घटक असतात.

ऑसिमम किलिमॅण्डॅस्कॅरिकम या ओषधीय [→  ओषधि] वनस्पतीपासूनही नैसर्गिक कापूर मिळविण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे क्षुप (झुडूप) वर्षायू (एक वर्ष जगणारे) असून साधारण एक मीटर उंच असते. त्याच्या पानात तेल असते. त्याच्या पानात ०.५ – ०.८% तेल असते व त्यात सु. ७०% कापूर व ३०% इतर पदार्थ असतात. ह्या कापराचा वितळबिंदू १७४-१७५ से. आहे. पूर्व आफ्रिका, सोव्हिएट रशिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे ह्या वनस्पतीपासून कापूर मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

संश्लेषित कापूर : टर्पेटादनामध्ये असलेल्या पायनीन किंवा बोर्निओल यांच्यापासून कापराचे संश्लेषण केले जाते. बोर्निओल जास्त प्रमाणात मिळत नसल्याने पायनिनाचा उपयोग केला जातो. पायनीन हायड्रोक्लोराइडाच्या विहायड्रोहॅलोजनीकरणाने (अल्कोहॉलयुक्त अमोनिया व ॲनिलीन अशा पदार्थांच्या साहाय्याने हायड्रोजन व हॅलोजन गटातील क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इ. गट काढून टाकण्याच्या प्रक्रियेने) किंवा पायनिनाच्या उत्प्रेरकीय समघटकीकरणाने (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या म्हणजे उत्प्रेरकाच्या साहाय्याने रेणूंची पुनर्रचना करून नवीन पदार्थ मिळविण्याच्या विक्रियेने) प्रथू कॅम्फेन बनवितात. सल्फ्यूरिक अम्लाच्या सान्निध्यात कॅम्फेन व ॲसिटिक अम्ल यांची विक्रिया करून आयसोबोर्निल ॲसिटेट तयार करतात. तसेच कॅम्फेन व वसाम्ले (फॅटी ॲसिड्स) यांच्या विक्रियेने बोर्निओलाची एस्टरे तयार होतात. अल्कोहॉलयुक्त क्षारीय (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म असणारा) विद्राव व बोर्निल ॲसिटेट तापविल्यास बोर्निओल मिळते. त्याच्या क्रोमिक अम्ल, नायट्रिक अम्ल इ. उत्प्रेरकांच्या सान्निध्यात ऑक्सिडीकरणाने कापूर तयार करतात.

विरंजक चूर्ण (रंग घालविणारे चूर्ण, क्लोरीनयुक्त चुना), क्रोमिक अम्ल, सोडियम डायक्रोमेट व सल्फ्यूरिक अम्ल, ओझोन किंवा पोटॅशियम परसल्फेट यांच्या साहाय्याने कॅम्फेनाचे ऑक्सिडीकरण करूनही कापूर बनवितात.

संश्लेषित कापूर तयार करावयास सुरूवातीस बराच खर्च आला. संश्लेषित कापूर शुद्धता, गुणात्मकता व हाताळण्याची सोपी पद्धत यांमुळे नैसर्गिक कापाराशी स्पर्धा करू शकाल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कापराची गरज संश्लेषित कापराने भागविली. तथापि त्याची किंमत नैसर्गिक कापराच्या किंमतीवरच अवलंबून असते.

कापराचे मोठ्या प्रमाणावरील संश्लेषण १९३३ नंतर करण्यात आले. संश्लेषित कापूर स्फटिकीकरण, ऊर्ध्वपातन, संप्लवन यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने किंवा तिन्ही पद्धतींनी शुद्ध करतात. हा कापूर औषधी, तांत्रिक आणि छायाचित्रण फिल्मसाठी अशा विविध उपयोगांसाठी निरनिराळ्या प्रतींचा मिळतो.

गुणधर्म : रासायनिक सूत्र C10H16O. रेणुभार १५२.२३. कापूर वर्णहीन किंवा शुभ्र स्फटिकी, कणीदार, किंवा नुकताच स्फटिकी किंवा वर्णहीन-शुभ्र पारदर्शक कठीण पदार्थ किंवा गोळी या स्वरूपात मिळतो. त्याला उग्र व विशिष्ट वास असून तिखट चव आहे. कापूर हे कॅम्फेन व नॉरकॅम्फेन यांच्यामध्ये असणारे संरचनात्मक वैशिष्ट्य असलेले कीटोन आहे. निरनिराळ्या प्रकाराच्या कापरांचे वितळबिंदू, उकळबिंदू इ. भौतिकी स्थिरांक निरनिराळे आहेत. तथापि सर्वसामान्यत: कापराचा वितळबिंदू १७६-१७९ से. च्या मध्ये आणि उकळबिंदू २०४-२०५ से. आहे. कापूर वाफेत बाष्पनशील आहे. सर्वसाधारण तापमानाला त्याचे संप्लवन होते. १,००० भाग पाण्यात एक भाग कापूर विद्राव्य आहे. कापराचा लहान कण जर पाण्याच्या पृष्ठभागावर टाकला तर तो जोराने फिरतो. पाण्यावर तेल किंवा वसा असल्यास मात्र पृष्ठताण कमी होतो व कापूर फिरण्याचा वेग कमी होतो. १२ से. तापमानात १२० भाग कापूर १०० भाग अल्कोहॉलात विद्राव्य आहे. ईथर, ॲसिटोन, कार्बन डायसल्फाइड, बेंझीन व हायड्रोजन सायनाइड यांमध्ये तो जलद विद्राव्य आहे. जळताना त्याच्यापासून बराच धूर निर्माण होतो.

कापराची रासायनिक संरचना

कापराचे गुणधर्म कीटोनांसारखे आहेत. कीटोनांप्रमाणे सोडियम बायसल्फाइटाबरोबर त्याची विक्रिया होत नाही. पण हायड्रॉक्सिल अमाइन, सेमीकार्बाझाइड हायड्रोक्लोराइड व फिनिल हायड्राझाइन यांच्याबरोबर विक्रिया होऊन अनुक्रमे ऑक्साइमे, सेमीकार्बाझोन व फिनिल हायड्राझोन मिळतात. सल्यूरिक अम्लाची त्याच्यावर सर्वसाधारण तापमानाला काहीही विक्रिया होत नाही, पण १०५-११० से. ला संहत सल्यूरिक अम्लाने (सल्फ्यूरिक अम्लाचे प्रमाण जास्त असलेल्या विद्रावाने) कापराचे ऑक्सिडीकरण होऊन कॅम्फोरिक अम्ल बनते. आणखी ऑक्सिडीकरण केल्यास कॅम्फॅनिक अम्ल व कॅम्फोरोनिक अम्ल बनतात. कापराच्या क्रोमिक अम्ल ऑक्सिडीकरणानेही कॅम्फॅनिक अम्ल व कॅम्फोरोनिक अम्ल बनतात. सेलेनियम डाय-ऑक्साइडामुळे कापराचे ऑक्सिडीकरण होऊन कॅम्फोर क्विनोन बनते. त्याचे ⇨ क्षपण होऊन कॅम्फोर ग्लायकॉल बनते. कापराचे क्षपण केल्यास बोर्निओल मिळते. कापूर व आयोडीन तापविल्यास कार्व्हाक्रोल बनते.

कापूर किंवा त्याचे अनुजात (मूळ पदार्थापासून तयार केलेले इतर पदार्थ) यांचा ज्योतीशी संपर्क आल्यास ते जळतात. पोटात जास्त प्रमाणात गेल्यास अशक्ततपणा, डोकेदुखी, असंवेदनक्षमता, पंगुत्व, संज्ञाहीनता, भोवळ इ. लक्षणे दिसतात. शरीराच्या एक किग्रॅ. वजनास दोन ग्रॅम कापूर हानिकारक ठरतो.

उपयोग : पूर्वीपासून भारतात कापूर धार्मिक कार्यात व औषधात वापरला जात आहे. जागतिक उत्पादनाच्या सु. ६% कापूर धार्मिक कार्यात वापरला जातो. याशिवाय पुढील तीन कारणांसाठी कापूर प्रामुख्याने वापरला जातो. (१) औषधी, (२) घरगुती व (३) व्यापारी.

औषधी : त्याचा लेप जंतुनाशक व कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा नाशक) म्हणून कातडीस बाहेरून लावण्याच्या मलमात वापरतात. त्याच्यामुळे त्वचेला लाली येते. तो कंडुरोधी व पीडापहारी असतो. अर्क व चूर्ण या स्वरूपांत त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. तसेच मलमे, चोळण्याची औषधे व अल्कोहॉलयुक्त औषधांतही कापूर वापरतात. कापराचे अनुजातही औषध म्हणून वापरतात.

घरगुती : मुंग्यांना व माश्यांना दुर ठेवण्यास वाळवी व कसरीपासून गरम कपडे, महत्वाच्या इतर वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी कापराचा उपयोग केला जातो.


व्यापारी : एकेकाळी त्याचा उपयोग धूम्ररहित स्फोटक चूर्णाचा एक घटक म्हणून करीत, पण हल्ली त्याचा उपयोग कमी झाला आहे. विशेषत: छायाचित्रण व चलच्चित्रण फिल्मसाठी वापरण्यात येणाऱ्या सेल्युलोज नायट्रेट प्लॅस्टिकच्या निर्मितीत ८०% कापूर वापरला जातो.

नैसर्गिक कापूर अद्यापिही तयार केला जातो. कारण त्यात कापूरनिर्मितीबरोबर कापूर तेलही मिळते. संश्लेषित कापराच्या निर्मितीत हे शक्य नाही. ह्या कापूर तेलापासून मिळणारा टर्पिनेओल हा पदार्थ सुगंधी द्रव्यांत वापरला जातो व तो कापूर तेलाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने इतका स्वस्त मिळू शकत नाही.

भारतात कॅम्फर अँड ॲलाइड लि. ही कंपनी संश्लेषित कापराचे उत्पादन करीत आहे. तिची उत्पादनक्षमता प्रतिवर्षी १५ लक्ष किग्रॅ. आहे.

पहा : तमालपत्र; दालचिनी; लॉरेसी.

परांडेकर, शं. आ.;  जमदाडे, ज. वि.