कक्कटशिंगी : (काकडशिंगी हिं. गुर्गू, काक्रर गु. काक्रा शिंग सं. कर्कटशृंगी इं. चायना टर्पेंटाइन ट्री लॅ. पिस्टाशिया इंटेजेरिमा कुल-ॲनाकार्डिएसी). आंब्याच्या कुलातील हा विभक्तलिंगी (द्विलिंगी) पानझडी वृक्ष वायव्य हिमाचल (४७० — २,४८० मी. उंचीपर्यंत), सुलेमान पर्वत, काश्मीर ते सिमला, कुमाऊँ इ. भागांत आढळतो. पंजाबात लागवडीत आहे. पाने संयुक्त व पिसासारखी दले ७ — ११, दल ६ — १३ सेंमी. लांब व तळ असमान, ती कोवळेपणी लाल असतात. पुष्पबंध-परिमंजरी फुले लाल, एकलिंगी पाकळ्या नसतात संदले चार ते पाच परागकोश लाल [→ फूल] अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ लहान, सुरकुतलेले व एकबीजी. पाने, देठ व फांद्या ह्यांवर किटकांच्या कारवाईमुळे लहान (१५ — २० सेंमी. लांब)शिंगासारखी पोकळ,कठीण व दोन्ही टोकांस निमुळती अशी गाठ (गुल्म) बनते व हीच बाजारात ‘काकडशिंगी’ म्हणून मिळते. ती कडू, उष्ण व तुरट असते. तिच्यात ७५ % टॅनिक अम्‍ल असते. कातडी रंगविणे व कमाविणे यांसाठी काकडशिंगी व साल वापरतात. अतिसार, राजयक्ष्मा, दमा, खोकला, अग्‍निमांद्य, ज्वर इत्यादींवर काकडशिंगी देतात. ती पित्तवर्धक, कफोत्सारक, स्तंभक (आकुंचन करणारी) व उद्दीपक असते. लाकूड तपकिरी त्यात पिवळ्या व काळसर रेषा असून ते कठीण व टिकाऊ असते त्यास घासून व रंधून उत्तम झिलई येते. सजावटी सामान, चरखे, छप्पर इत्यादींस फार चांगले. पाला गुरांना चारा म्हणून घालतात.

पहा : ॲनाकार्डिएसी काकडशिंगी.

वैद्य, प्र. भ.