फुगा : (नीरवंज क. अणवू लॅ नॉक्‍लिया मिसिओनिस, सार्कोसिफॅलस मिसिओनिस कुल- रूबिएसी). हा लहान अथवा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष नद्यांच्या व ओहोळांच्या काठाने कोकण ते त्रावणकोर या पट्‌ट्यात आढळतो. याची पाने साधी, संमुख (समोरासमोर), मध्यम आकाराची, पातळ, लांबट व भाल्यासारखी, वरून चकचकीत आणि फार लहान देठाची असतात. उपपर्णे अंतरावृंतीय (दोन देठांमध्ये एक याप्रमाणे खोडाच्या दोन बाजूंस) त्रिकोणी व खाली जुळून वाढतात. फांद्यांच्या शेंड्याला किंवा पानांच्या बगलेत,जाड देठावर एप्रिल-मेमध्ये गुच्छासारखा गोलसर फुलोरा येतो. फुले पिवळट पांढरी, सुगंधी व लहान असतात. अनेक लहान फळे जुळून संयुक्त ⇨ फळ (फलपुंज) बनते. बी काळसर, अध्यावरणयुक्त [→ बीज], चपटे व कठीण असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रूबिएसीमध्ये (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे आहेत. खोडाची साल संधिवात, बद्धकोष्ठता, चर्मरोग, कुष्ठरोग व व्रण यांवर उपयुक्त असते. लाकूड पिवळट, मध्यम कठीण पण हलके व खरबरीत असते किरकोळ लाकडी वस्तूंकरिता ते उपयोगात आहे.

बिलूर : (देव फणस, क. अहनान लॅ. निओनॉक्‍लिया पुर्पुरिया, नॉ. पुर्पुरिया). हा कदंब कुलातील लहान वृक्ष पूर्वी फुग्याच्या वंशात अंतर्भूत होता नंतर दुसऱ्या वंशात (निओनॉक्‍लिया) घातला गेला आहे. तो भारतात द. द्विपकल्प भागात (९०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. याची साल करडी असते व सोलून तिचे खवल्यासारखे तुकडे निघतात. याची काही लक्षणे फुग्याप्रमाणे फुलोरे मोठे, अग्रस्थ (टोकांवर) गुच्छासारखे [स्तबक →पुष्पबंध] व फुले लहान व जांभळी असून फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. फळांचे दोन कुड्यांसारखे भाग असून बीजे असंख्य व सूक्ष्म असतात. लाकूड पिवळट किंवा लालसर, मध्यम प्रतीचे कठीण व जड, तथापि किरकोळ सजावटी सामानास उत्तम असते.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.VIII, New Delhi, 1966.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Delhi, 1975.

हर्डीकर, कमला श्री.