लॅबिएटी : (लॅमिएसी तुलसी कुल). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दले असलेल्या) वर्गातील काही प्रजाती व वनस्पतींचे एक मोठे कुल. यामध्ये सु. २०० प्रजाती व ३,००० जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते १०० प्रजाती व ३,००० जाती) असून यात ⇨तुळस, सब्जा, पुदिना, रोझमेरी, लव्हेंडर, माइनमूळ, पाच, सॅल्व्हिया, मरवा इ. सामान्यपणे अनेक परिचित वनस्पतींचा समावेश होतो. भूमध्यसामुद्रिक प्रदेश हे या कुलातील जातींचे प्रमुख प्रसार केंद्र असून तेथून बहुतेक जगभर अनेक जाती पसरल्या आहेत. या वनस्पती बहुधा सुगंधी, वर्षायू किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ओषधी अथवा लहान मोठी झुडपे आहेत. यांचे खोड चौकोनी व त्यावर तैल ⇨प्रपिंडे (ग्रंथी) असलेले केस असतात. पाने साधी आणि कधीकधी विविध प्रकारे विभागलेली, समोरासमोर किंवा मंडलित (झुपक्यात) असतात. फुले द्विलिंगी, अवकिंज (इतर पुष्पदले किंजदलांच्या-स्त्री-केसरांच्या- खालच्या पातळीवर असलेली), एकसमात्र (एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) व अनियमित असतात त्यांच्या बगलेत बहुधा संयुक्त अथवा विशिष्ट फुलोऱ्यावर [पुंजवल्लरीवर ⟶ पुष्पबंध] अथवा कधी द्विपद वल्लरीवर (फुलोऱ्याचा प्राथमिक देठ विभागून झालेले दोन्ही लहान देठ पुनः पुनः तसेच पुढे विभागत जाऊन बनलेल्या फुलोऱ्यावर) येतात. फुलात पाच संदले (पाकळ्यांखालची दले) सतत राहणारी, विविध प्रकारे कमीजास्त जुळलेली व बहुधा व्दयोष्ठ (दोन ओठांसारखी) व प्रदले (पाकळ्या) तशाच पण सतत न राहणाऱ्या, परिहित [कळीमध्ये क्रमाने परस्परांवर पडून असणाऱ्या ⟶पुष्पदलसंबंध] असतात. केसरदले (पुं-केसर) चार, दीर्घद्वयी (दोन अधिक लांब असलेले) किंवा फक्त दोन असतात. बिंब (तळभागी असलेल्या फुलातील आधारभूत भाग) मांसल, मधुस्त्रावी (मधयुक्त) व किंजपुटाखाली (स्त्री-केसराच्या तळभागाच्या खाली) असून किंजदले दोन व जुळलेली असतात. ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्या पातळीत किंवा वरच्या पातळीत असणाऱ्या) किंजपुटाचे [⟶ फूल] फळात रूपांतर झाल्यावर त्याच्या वरच्या टोकास चार भाग (कपलिका) पडलेल्या शुष्क फळात [मुद्रिकेत ⟶ फळ] प्रत्येकी एक बीज असते. किंजल (किंजपुटावरच्या तंतूसारखा भाग) त्या कपालिकांच्या मधून वर येतो. काही फुलांत (उदा.,-सॅल्व्हिया) ⇨ पराग दुसऱ्या फुलात नेऊन तेथील किंजल्कावर (स्त्री-केसराच्या टोकावर) शिंपडण्याकरिता विशेष प्रकारची तरफ-यंत्रणा असते [⟶ परागण]. ⇨व्हर्बिनेसी (साग कुल), ⇨बोरॅजिनेसी (भोकर कुल) व लॅबिएटी (तुलसी कुल) यांचे निकट आप्तसंबंध आहेत. रेंडेल यांच्या वर्गीकरणात लॅबिएटीचा अंतर्भाव ट्युबिफ्लोरी गणातील १७ कुलांत आहे. ए. एंग्लर व एल्.डील्स यांनी याच गणात २३ कुले घातली आहेत (व त्यांचे ८ उपवर्ग आहेत) परंतु एंग्लर यांच्या मूळच्या वर्गीकरणात फक्त २० कुले आहेत. जी. बेंथॅम व जे.डी. हूकर यांनी लॅमिएलीझ गणातील चार कुलांत लॅबिएटीचा अंतर्भाव केला असून जे. हचिन्सन यांच्या वर्गीकरणाशी त्याचे साम्य आहे मात्र हचिन्सन यांचया लॅमिएलीझ गणात पाच कुले आहेत. जे. एन्. मित्र यांनी पुरस्कारलेल्या पद्धतीत पर्सोनेलीझ गणात ३० कुले असून त्यांपैकी लॅबिएटी हे एक आहे. भिन्न कुलांच्या व प्रजातींच्या परस्पर आप्तसंबंधाच्या बाबतीतील मतभेदांमुळे भिन्न पद्धतींत त्यांची स्थाने भिन्न झालेली आढळतात.

संदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

जमदाडे ज. वि. परांडेकर, शं. आ.