जिरॅनिएलीझ : (भांड गण). फुलझाडांच्या [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] वर्गीकरणात द्विदलिकित वर्गातील सुट्या पाकळ्या असलेल्या (पॉलिपेटॅली ) फुलांच्या वनस्पतींचा हा एक गण असून यामध्ये ⇨ जिरॅनिएसी  (भांड कुल), ⇨ लिनेसी  (अळशी–अतसी कुल), ⇨मालपीगीएसी  (माधवी कुल), ऑक्सॅलिडेसी [→ आंबुटी],  ⇨झायगोफायलेसी  (गोक्षुर कुल), एरिथ्रोझायलेसी [→ कोका], ट्रोपिओलेसी [→ नॅस्टर्शियम, गार्डन] व ⇨बाल्समिनेसी  (तेरडा कुल) ह्या आठ कुलांचा अंतर्भाव हल्ली केलेला आढळतो. बेंथॅम आणि हूकर यांच्या पद्धतीत रूटेलीझ या गणातील [→ सताप] चार कुलांचा (रूटेसी, मेलिएसी, बर्सेरेसी व सिमॅरुबेसी) येथे समावेश केला असून ऑक्सॅलिडेसी, एरिथ्रोझायलेसी, ट्रोपिओलेसी व बाल्समिनेसी इत्यादींना वगळले आहे. तसेच ऑक्‍नेसी [→ चाफा, कनक], ह्युमेरिएसी व चैलेटिएसी यांचा समावेश करून एकूण अकरा कुले यात ठेवली आहेत. एंग्‍लर यांच्या जुन्या पद्धतीप्रमाणे यात वीस कुले समाविष्ट आहेत हचिन्सन यांनी फक्त सातच कुलांना भांड गणात स्थान दिले आहे.

माल्‌व्हेलीज (भेंडी गण) या गणाशी (जिरॅनिएलीझचा) भांड गणाचा आप्तभाव आहे. ह्या गणातील वनस्पती बहुतेक ओषधीय [→ ओषधि], क्षुपे (झुडपे) व क्वचित वृक्ष असून त्यांचा प्रसार सर्वत्र असला, तरी उष्ण प्रदेशात विशेष आहे. यामध्ये द्विलिंगी, अवकिंज, पंचभागी व द्व्‌यावृत (दोन परिदल मंडले असलेली) फुले असून केसरदलांचे बाहेरचे मंडल पाकळ्यांशी एकाआड एक नसते संवर्त बहुधा सतत राहतो किंजपुटात अक्षलग्‍न बीजकविन्यास, क्वचित एकदोन बीजके, वलयाकृती बिंब इ. लक्षणे प्रामुख्याने आढळतात [→ फूल]. अनेक उपयुक्त व परिचित वनस्पती यातील वरच्या आठ कुलांत समाविष्ट आहेत उदा., औषधी वनस्पती [→ आंबुटी अळशी गोखरू] शोभेच्या वनस्पती [→ पेलार्‌गॉनियम तेरडा गाल्फिमिया ग्‍लॉका ] व मादक वनस्पती [→ कोका].                                                                         

महाजन, श्री. द. 

जिरॅनिएसी : (भांड कुल). या कुलात सु. पाच वंश व ७५० जाती (रेंडल : ११ वंश व ६५० जाती लॉरेन्स: ११ वंश आणि ८५० जाती) असून त्यांचा प्रसार जगभर आहे. बहुतेक जाती केसाळ ओषधी असून पाने बहुधा एकाआड एक, अनेकदा काहीशी खंडयुक्त व उपपर्णयुक्त असतात. फुले बहुधा नियमित, पंचभागी व द्विलिंगी असून १०–१५ केसरदले व त्यांपैकी फक्त पाच जननक्षम व तळाशी जुळलेली बाहेरची केसरदले पाकळ्यांसमोर किंजदले दोन ते पाच व जुळलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ व बीजके बहुधा (प्रत्येक किंजदलास) एक ते दोन याप्रमाणे शुष्क फळाचे (पालिभेदी) भाग (फलांश) किंजदलांच्या तंतूसारख्या भागांसह अलग होतात बिया बहुधा अपुष्क [→ फूल फळ बीज]. ⇨जिरॅनियम  व ⇨पेलार्‍गॉनियम  या वंशांतील जाती बागेत शोभेकरिता लावतात. पेलार्‌गॉनियमच्या एका जातीपासून सुगंधी अत्तर (फ्रेंच रोझ तेल किंवा ऑटो) काढतात. एरोडियमच्या दोन भारतीय जातींपैकी ए. मोशॅटम  बागेत लावतात. त्या औषधीही आहेत. मान्सोनियाच्या दोन जाती भारतात आढळतात सार्कोकॉलॉन, बाल्बीशिया  व्हिव्हॅनिया  या वंशांतील जाती भारतात नाहीत.

परांडेकर, शं. आ. 

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

  2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Cambridge, 1963.