जेन्शिएनेलीझ : (किराइत गण). फुलझाडांपैकी [द्विदलिकित, → वनस्पति, आवृतबीज उपविभाग] या नावाच्या गणात किराइत कुल (जेन्शिएनेसी), करवीर कुल (ॲपोसायनेसी), रुई कुल (ॲस्क्लेपीएडेसी), पारिजातक कुल (ओलिएसी), कुचला कुल (लोगॅनिएसी), पीलू (किंकानेला इत्यादींचे कुल (सॅल्व्हॅडोरेसी) वगैरेंचा समावेश होतो. हचिन्सन यांनी यांपैकी काहींचा अंतर्भाव भिन्न गणांत करून जोन्शिएनेलीझ गणात जोन्शिएनेसी आणि मॅनिअँथेसी या दोन कुलांचाच फक्त समावेश केला आहे. एंग्लर यांनी पीलू कुलाखेरीज (सॅल्व्हॅडोरेसी) इतर पाच कुलांचा ‘कंटॉर्टी’ हा गण बनविला होता यालाच लोगॅनिएलीझ असे अलीकडे म्हणतात व हा एक नैसर्गिक गट मानतात. जोन्शिएनेलीझ या गणात एकूण सु. सहा कुले, ६४० वंश व ५,१०० जाती असून त्या विषुववृत्तीय प्रदेशापासून समशीतोष्ण कटिबंधापर्यंतच्या भागांत आढळतात. बहुधा साधी व उपपर्णे नसलेली, समोरासमोर पाने व द्विलिंगी, चतुर्भागी किंवा पंचभागी, जुळलेल्या किंवा क्वचित सुट्या पाकळ्या (पीलू कुल) व दोन किंजदले असलेली फुले ही त्यांची प्रमुख लक्षणे आहेत [→ फूल] तसेच ⇨  पोलेमोनिएलीझ  (भोकर गण) व प्रिम्युलेलीझ [→ विशकोप्रा] या गणांशी जोन्शिएनेलीझ गणाचे निकटचे आप्तभाव आहेत. यातील अनेक वनस्पती उपयुक्त आहेत उदा., ⇨किराइत, अनंतमूळ, रुई, सदापर्णी, करंबा, कुचला, सर्पगंधा, पीलू इ. औषधी आहेत कण्हेर (करवीर), कुमुद, जाई, जुई, पारिजातक इ. शोभेकरिता लावतात.

महाजन, श्री. द. परांडेकर, शं. आ.

जेन्शिएनेसी : (किराइत कुल). यामध्ये सु. ऐंशी वंश व आठशे जाती (लॉरेन्स : ७० वंश व ८०० जाती) असून त्या एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या ⇨षधी  किंवा झुडपे आहेत बहुधा त्यांचा प्रसार विशेषतः समशीतोष्ण कटिबंधात आहे. त्यांचे मूलक्षोड [→ खोड] जमिनीत वाढते व जमिनीवरच्या फांद्यांना साधी पाने आणि नियमित, द्विलिंगी फुले येतात. पुष्पमुकुट (पाकळ्यांचे मंडल) चक्राकृती, नरसाळ्यासारखे किंवा समईसारखे असून त्याखालची पुष्पदले (संदले) तळाशी जुळलेली असतात केसरदले पाकळ्यांशी एकाआड एक व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यात एक कप्पा व दोन तटलग्न बीजकधानीवर अनेक अधोमुखी बीजके वलयाकृती बिंब अवकिंज आणि प्रपिंडीय (ग्रंथीसारखे) [→  फूल] फल शुष्क (बोंड) व पडद्यासमोर तडकणारे बिया सपुष्क (गर्भाबाहेरील अन्न असलेल्या) इतर सर्व सामान्य लक्षणे वर दिलेल्या जेन्शिएनेलीझमध्ये वर्णिल्याप्रमाणे. ह्या कुलातील काही वनस्पती हरितद्रव्यहीन व शवोपजीवी (मृत जीवांवर जगणाऱ्या) असून काहींत द्विसंलग्न (दोन परिकाष्ठ असलेले)  ⇨वाहक वृंद  असतात. या कुलातील  ⇨ किराइत,  ⇨कॅन्स्कोरा डिफूजा,  ⇨शंखपुष्पी,  ⇨उडिचिराइत  औषधी असून जलाशयात वाढणाऱ्या  ⇨ कुमुदामुळे त्याला व जेन्शियन, सेंटॉरियम, एक्झॅकम इत्यादींमुळे बागेला शोभा येते. बहुधा जेन्शिएनॉइडी आणि मेनिअँथॉइडी या दोन उपकुलांत या कुलातील जातींची विभागणी केलेली आढळते.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

     2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.