आंबगूळ : (हिं. घिवैन इं. बॅस्टर्ड ओलिॲस्टर लॅ. एलेग्नस लॅटिफोलिया, कुल—एलेग्नेसी ). हे मोठे वर चढणारे झुडूप भारतात बहुधा सर्वत्र डोंगराळ भागात (महाराष्ट्रात कोकण, माथेरान, महाबळेश्वर, अंबोली इ.) आढळते. शिवाय श्रीलंका, मलाया व चीन येथेही सापडते. एलेग्रेसी या कुलातील [→ मिटेंलिझ] सर्व वनस्पतींच्या भागावर रुपेरी खवले असतात. पाने साधी, चिवट, वरील बाजूस फिकट हिरवी परंतु खालील बाजूस रुपेरी फुले लहान, नियमित, विभक्तलिंगी किंवा उभयलिंगी, फिकट, पिवळट पांढरी, पानाच्या बगलेतील झुबक्यांत नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. देठ व चार परिदले रुपेरी [→ फूल], अश्मगर्भी (आठळी असलेले) फळ लहान, बोराएवढे, लांबट व मृदू असून त्यावर सतत वाढलेल्या परिदलाचे आवरण असते फळाच्या आठळीवर आठ उभे कंगोरे व सर्वांत बाहेर गुलाबी रंगावर उठून दिसणारे पांढरट खरबरीत ठिपके असतात. बाहेरील मांसल भाग आंबूस व खाद्य आठळीच्या आतील भागावर पांढरट लोकरीसारखे आवरण असते बी एकच, लहान व चकचकीत असते. फुले स्तंभक (मळ घट्ट करणारी) व दीपक (भूक वाढविणारी) फळ स्तंभक असून त्यापासून जेली, सामोसे इ. करतात. ही वेल शोभेकरिता बागेत लावतात.

जमदाडे, ज. वि.