रायआवळा : (हिं. हरफा रेवडी गु. खाटां आमळां, राय कांकण क. रायरा नेल्लीमर, करिनेल्ली सं. लवली इं. स्टार गूजबेरी लॅ. सिक्का ॲसिडा, फायलँथस डिस्टिकस कुल-

रायआवळा : फळांसह फांदी

यूफोर्बिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा सु. ६ –१० मी. उंच, पानझडी व लहान वृक्ष मूळचा मॅलॅगॅसी (मादागास्कर) व मलाया येथील असून याची भारत, अंदमान व मलाया येथे बागेत लागवड केली जाते. साधारणतः १ मी. लांबीच्या फांद्यांवर ५ –८ सेंमी. लांबीच्या लहान व साध्या पानांच्या दोन रांगा असतात. कोवळी पाने लालसर पण जून झाल्यावर ती हिरवी व एकाआड एक असतात. फांद्यांवर उत्तरेत एकदा (एप्रिल-मेमध्ये) आणि दक्षिणेत वर्षातून दोनदा (ऑगस्ट-सप्टेंबरात व एप्रिल-मेमध्ये) अनेक तांबूस, लहान, एकलिंगी फुलांचे घोस येतात. नर फुलात संदले ४ व केसरदले फक्त ४ आणि स्त्री फुलात ३ किंजदलांचा किंजपुट असतो किंजले ३-४ असून प्रत्येक भाग विभागलेला असतो [⟶ फूल]. मृदुफळ मांसल, पिवळट, गोलसर, आंबट आणि थोडे कडवट असून त्यावर ६ – ८ खोलगट रेषा असतात बी एकच व फार कठीण असते. ऑक्टोबर-नोव्हेंबर व नंतर मे -जुलैमध्ये फळे येतात. फळांचा उपयोग लोणचे व मुरंबा किंवा तशीच खाण्याकरिता करतात इतर शारीरिक लक्षणे ⇨यूफोर्बिएसी अथवा एरंड कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ स्तंभक (आकुंचन करणारे), भूक प्रज्वलित करते मळमळ व ओकारीवर चांगले असते आणि रक्तशुद्धी, बद्धकोष्ठता, मुतखडा, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी असते. फळात प्रतिशत पाणी ८९·६३, प्रथिन ०·९०, भरड धागा ०·५८, कार्बोहायड्रेट ७·२९, राख ०·८४, ॲसिटिक अम्ल १·७० व ईथर अर्क ०·७६ असतात. मूळ व बी सारक (पोट साफ करणारे) असते. मुळाच्या सालीचा रस विषारी असून तो घेतल्याने झोप येते व डोकेदुखी चालू होते अधिक घेतल्यास पोटात तीव्र वेदना होऊन मृत्यू होतो. सालीत टॅनीन (१८%), सॅपोनीन, गॅलिक अम्ल व लुपिऑल हा स्फटिकी पदार्थ असतो. चामडे कमाविण्यास ती वापरतात.

लेखक : कानिटकर, उ. के.