कुंभा : (हिं. कुंबी, वाकांबी सं. व गु. कुंभी क. गवहण्णू, हेण्णुमट्टी इं. वाइल्ड ग्वाव्हा, स्लो मॅच ट्री लॅ. कॅरिया आर्बोरिआ कुल-मिर्टेसी). भारतात हिमालयाच्या पायथ्यास कांग्रापासून पूर्वेकडे बंगाल, मध्य, पश्चिम व दक्षिण भारत इ. प्रदेशांत अधिकात अधिक १,५५० मी. उंचीपर्यंत, शिवाय श्रीलंका, मलेशिया व थायलंड येथेही सामान्यपणे आढळणारा हा पाणझडी वृक्ष (उंची ९-१८ मी.) आहे परीघ १·५ मी., साल जाड, भेगाळ, खरबरीत व गर्द करडी आत लालसर तंतुयुक्त पाने साधी, मोठी , साधारण जाड, शेंड्याकडे अधिक रुंद, दंतुर  देठ फार लहान  ती फेब्रुवारीत गळतात  मार्च-एप्रिलमध्ये फुलांबरोबर नवीन पालवी येते  गळण्यापूर्वी ती लाल व जांभळट होतात. फुलोरा (कणिश) बुटका व त्यावर फार थोडी पण मोठी सच्छद, लाल पांढरी व दुर्गंधी फुले येतात [→मिर्टेसी]. केसरदले असंख्य, जांभळी  व लांब असतात [→फूल].  फळ मांसल,  गोलसर आणि दीर्घस्थायी, संवर्तयुक्त व हिरवट असते [→फळ] बिया अनेक. ही झाडे जंगलातील आगीस (वणव्यास) फार यशस्वीपणे विरोध करून वाढत राहतात. लाकूड पाण्यातही चांगले टिकाऊ आणि मजबूत असल्याने शेतीची अवजारे, गाड्या, सजावटी वस्तू, जळण वगैरेंसाठी उपयुक्त सालीपासून निघणारे धागे दोऱ्या करण्यास, ब्राऊन पेपर बनविण्यास आणि साल कातडी कमाविण्यास व रंगविण्यास वापरतात सालीपासून मंद जळणाऱ्या दारूच्या वाती बनवितात फळे गुरांना चारतात साल आणि फळ स्तंभक (आकुंचन करणारे) व शामक सर्दी व खोकल्यावर फुले आणि सालीचा रस मधाबरोबर देतात. मूळ, साल व पाने मत्स्यविष आहेत. वाळविलेले संवर्त बाजारात ‘वाकुंभ’ नावाने मिळतात. ब्रह्मदेशात पाने बिड्या आणि चिरूट बनविण्यासाठी वापरतात. रेशमाचे किडे पानांवर पोसतात. (चित्रपत्र ५१).

दोंदे, वि. प.

कुंभा : (१) पान, (२) पिकलेले पान, (३) फूल, (४) फळ