ब्राउन, रॉबर्ट: (२१ डिसेंबर १७७३—१० जून १८५८).  ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ. त्यांनी ⇨ब्राउनीय गतीचा शोध लावला शंकुधारी तसेच त्यांच्याशी निगडित असलेल्या वनस्पती [जिम्नोस्पर्म→वनस्पति, प्रकटबीज उपविभाग]आणि सपुष्प वनस्पती [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग]यांच्यातील मूलभूत फरक त्यांनी शोधून काढला.

ब्राउन यांचा जन्म माँट्रोझ (स्कॉटलंड) येथे व शिक्षण ॲबर्डीन येथे झाले. १७९५ साली एडिंबरो विद्यापीठाची वैद्यकीय पदवीमिळविल्यावर काही काळ त्यांनी ब्रिटिश लष्करात शल्यक्रियातज्ञ म्हणून काम केले. १८०१—०५ च्या कॅप्टन मॅथ्यू फिलंडर्स यांच्या नेतृत्वाखाली ‘इन्व्हेस्टिगेटर’जहाजाने ऑस्ट्रेलियास गेलेल्या मोहिमेत त्यांचा ⇨सर जोसेफ बँक्स यांच्या शिफारशीवरून निसर्गवैज्ञानिक म्हणून समावेश झाला होता. त्या वेळी अज्ञात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करून परत येताना ब्राउन यांनी वनस्पतींच्या सु. ३,९०० जातींचे नमुने बरोबर आणलेत्यापैकी सु. २,००० जातींचे त्यांनीच प्रथम वर्णन केले. यावरून अलग पडलेल्या या प्रदेशातील पादपजात (वैशिष्ट्यदर्शक वनस्पतिजीवन) बरीच वेगळी असल्याचे त्यांना दिसून आले. Prodronus Florae Novae Hollandiaeet Insulae Van Diemen (१८१०) या पुस्तकात ऑस्ट्रेलियातील पादपजातीचे वर्णन आलेले आहे. त्यांनी वनस्पतींची नवीन कुले व वंश प्रस्थापित केले आणि त्यांच्या व्याख्या देऊन वनस्पतींच्या वर्गीकरणात सुधारणा केल्या. या वनस्पतींचे वर्गीकरण करताना त्यांनी आंत्वान लॉरां द झ्यूस्य (१७४८-१८३६) यांच्या नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीचा आधार घेतला होता आणि नंतर लिनीअस यांच्या वर्गीकरण पद्धतीऐवजी हीच पद्धती रूढ झाली. सायकॅडे व शंकुमंत वनसप्तींची स्त्रीपुष्पे म्हणजे अनावृत्त बीजे होत, असे १८२७ साली त्यांनी दाखविले. अशा रीतीने आवृत्त व अनावृत्त (प्रकट) बीजी वनस्पतींमधील प्रमुख भेद त्यांनी स्पष्ट केला. बीजकरंध्र व नाभी [⟶बीज]यांच्यातील परस्परसंबंध व आधिमूळाचे (वनस्पतीच्या गर्भाच्या शेपटाच्या खालील भागाचे) बीजकरंध्राच्या संदर्भातील स्थान यांचे स्पष्टीकरण करून त्यांनी एकदलिकित आणि द्विदलिकित वनसपतींमधील भेदही स्पष्ट केला. पुष्क (दलिकांव्यतिरिक्त अन्नांश) व परिपुष्क (पुष्काबाहेरील अन्नांश) यांच्यातील फरकाचा अभ्यास, वनस्पतींचे आकारविज्ञान, गर्भविज्ञान आणि भूगोल इत्यादींविषयीचे संशोधन त्यांनी केले. वनस्पतींच्या जीवाश्मांच्या (शिळारूप अवशेषांचा) सूक्ष्मदर्शकाने अभ्यास करण्यास त्यांनीच सुरुवात केली. सजीव कोशिकेत (पेशीत) लहान पिंडांसारखा घटक असून तो कोशिकेचे नियंत्रण करतो, हे त्यांनी ओळखून काढले म्हणजे त्यांनी प्रकलाचा पुन्हा शोध लावला (१८३१). या घटकाला त्यांनी दिलेले न्यूक्लिअस हेच नाव पुढे रूढ झाले.

पाण्यात निलंबित (लोंबकळत्या) स्वरूपात असलेल्या परागांचे सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करीत असताना १८२७ साली त्यांना आतील लहान कण अखंडपणे अनियमित प्रकारे हालचाल करीत असल्याचे आढळून आले. परागातील सुप्त जीवन शक्तीमुळे अशी हालचाल होत असावी असे त्यांना वाटले परंतु पाण्यातील निर्जीव अशा रंगाच्या कणांचीही अशीच हालचाल होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या हालचालीचे स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही मात्र ब्रीफ अकाउंट ऑफ मायक्रोस्कोपिकल ऑब्झर्व्हेशन्स (१८२८) या पुस्तकात त्यांनी या आविष्काराचे वर्णन नोंदवून ठेवले तेव्हापासूनच ब्राउन यांच्यावरून या हालचालीस ‘ब्राउनीय गती’ हे नाव पडले. जेम्स क्लार्क मॅक्स्वेल यांनी वायूंचा गत्यात्मक सिद्धांत [⟶ द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत] मांडल्यावर पाण्याच्या रेणूच्या आघाताने कणाची अशी हालचाल होते, हे कळून आले. अशा तऱ्हेने ब्राउन यांचा हा शोध म्हणजे द्रव्याच्या आणवीय स्वरूपाचा प्रत्यक्ष दृश्य असा पहिला पुरावा म्हणता येईल. [⟶ ब्राउनीय गति].

ब्राउन हे सर जोसेफ बँक्स यांचे साहाय्यक व ग्रंथपाल होते. बँक्स यांचा वनस्पतींचा व ग्रंथांचा संग्रह ब्रिटिश म्युझियमला देण्यात आल्यावर या नव्या विभागाचे ब्राउन हे अभिरक्षक होते (१८२७ – ५८). ब्राउन लिनियन सोसायटीचे सदस्य (१८२२) व अध्यक्ष (१८४९ – ५३) होते तसेच रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती (१८१०). त्यांना ऑक्सफर्ड, केंब्रिज वगैरे विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या दिल्या होत्या. कित्येक वनस्पतींच्या शास्त्रीय नावांमध्ये त्यांचे नाव गुंफण्यात आलेले आहे. लंडन येथे त्यांचे निधन झाले.

जमदाडे, ज. वि. ठाकूर, अ. ना.