पिआरंगः (१) संयुक्त पानाचा सर्वात लहान, एकबीजी, भाग, (२) फुलोर्या)चा भाग, (३) फूल, (४) शुष्क फळे (कृत्स्नकिंजमंडल, (५) फळ, (६) बी. पिआरंग : (मामिरान हिं. मामिरा, पिलिजारी, पिंजारी, शूप्रक सं. पीतक लॅ. थॅलिक्ट्रम फॉलिओलोजम कुल-रॅनन्क्युलेसी). ह्या औषधीय [⟶औषधि] फुलझाडाचे मूळ बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असते. ही वनस्पती हिमालयात १,५५०-२,४८० मी. उंचीवर, खासी टेकड्यांत १,३४०-१,८६० मी. उंचीवर आणि कोकण व घाट येथे आढळते ब्रह्मदेश व सयाम येथे ही आढळते. सहारनपुरात तिची लागवड केली आहे. थॅलिक्ट्रम वंशातील एकूण १५० जातींपैकी भारतात फक्त २० आढळतात. सुश्रुत संहितेत (तिसर्‍या शतकात) पीतकाचा उल्लेख आढळतो. हिचे खोड १.२-२.४ मी. उंच व केशहीन मूळ, लांब, सरळ, निमुळते, मजबूत व काष्ठमय असून जेष्ठमधासारखे, परंतू रूचीत फरक असतो साल गुळगुळीत, पिवळट उदी व तीवर उभ्या सुरकुत्या असतात व आतून पिवळी असते. पाने संयुक्त, एकाआड एक, पिसासारखी तीनदा विभागलेली देठ तळाशी खोडास काहीसा वेढून राहणारा (आवरक) उपपर्णे नसतात. पात्याच्या तळाशी कानाच्या पाळाप्रमाणे (सकर्णिक) फुलोरा परिमंजिरी [⟶पुष्पबंध] फुले नियमित, बहुधा लहान, पांढरी, जांभळट, एकलिंगी व द्विलिंगी  संदले ४-५, पाकळ्यांसारखी, पाकळ्या नसतात केसरदले व  किंजदले अनेक [⟶फूल]. घोसफळात २-५ फले) प्रत्येक फळावर उभे कंगोरे आणि फळ दोन्हीकडे टोकदार व आयत किंजल दीर्घ व स्थायी किंवा पडून जाणारा बी एकच असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रॅनन्क्युलेसी कुलात (मोरवेल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

ह्या वनस्पतीच्या वंशातील (थॅलिक्ट्रम) सर्व जातींच्या खोडात एकदलिकित वनस्पतीतल्याप्रमाणे वाहक वृंद (द्रव प्रदार्थ वाहून नेणारे पेशी समुहाचे जुडगे) विखुरलेले असतात. मूळ पौष्टिक, सौम्य रेचक,मूत्रल (लघवी साफ करणारे),ज्वरनाशी असून अग्निमांद्य (भूक मंद होणे) व आजारानंतरची अशक्तता यांवर देतात. नेत्रदाहावर (डोळ्यांच्या आगीवर) हिचे अंजन उपयुक्त असते. मुळांतील सत्व कडू असून त्यात बेरबेरीन व थॅलिक्ट्रीन ही अल्कलॉइडे असतात दातदुखी, अतिसार, मुळव्याध, पाळीचा ताप इत्यादींवर ही वनस्पती वापरतात. मसूरी व कुमाऊँ पहाडांतून ‘मोमेरी’ या नावाने त्यातील औषध बाजारात येते. थॅ. ग्लि्फोकार्पम ही जाती पारसनाथ टेकड्यांत व हिमालयात सापडते. थॅ. डाल्झेल्ली ही औषधी कोकण, घटमाथा व दख्खनचे पठार येथे आढळते. प. हिमालयातील थॅ. पेडंक्युलेटम ही जातीही स्थानिक लोक नेत्रदाहावर वापरतात.पूर्व यूरोप, उ. आशिया, द. अमेरिका ते मेक्सिको इ. प्रदेशांतील चार जाती पिआरंगप्रमाणेच त्या त्या ठिकाणी औषधाकरिता वापरातात.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.