मेस्काइट बीन : (हिं. काबुली वा विलायती किकर इं. अल्गरोबा बीन लॅ. प्रॉसोपिस जुलिफ्लोरा, प्रॉ. चिलेन्सिस कुल-लेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी). फुलझाडापैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असणाऱ्या वनस्पतींच्या) वर्गातील एक लहान वृक्ष. ⇨ बाभूळ, ⇨ खैर इ. वनस्पतींच्या शिंबावंत [शेंगा येणाऱ्या वनस्पतीच्या → लेग्युमिनोजी] कुलातील आणि ⇨ शमीच्या प्रजातीतील (प्रॉसोपिस) हा सदापर्णी, बहुधा काटेरी, लोंबत्या फांद्यांचा व अनेक शारीरिक लक्षणांत विविधता दर्शविणारा वृक्ष मूळचा द. अमेरिका व वेस्ट इंडीजमधील रुक्ष प्रदेशातील आहे. प्रॉसोपिस प्रजातीत एकूण सु. ४० जाती असून भारतात त्यांपैकी दोन (काहींच्या मते तीन) जाती आढळतात. मेस्काइट प्रथम भारतात आणवून काही ठिकाणी (पंजाब, राजस्थान) लावला गेला आणि नंतर अनेक ठिकाणी तो रानावनात वाढून त्याचा बराच प्रसार झाला. हल्ली याचे अनेक प्रकार व वाण आढळतात. व्हेल्युटिना, ग्लँड्युलोजा आणि चिलेन्सिस हे प्रकार व अर्जेंटाइन, ॲरिड मेक्सीकन, पेरूव्हियन व ऑस्ट्रेलियन हे वाण विशेष महत्त्वाचे मानतात.

मेस्काइटचा (प्रॉ.चिलेन्सिस) वृक्ष अनुकूल परिस्थितीत सु.२० मी. उंच व अती रुक्ष ठिकाणी तो झुडपाएवढाच वाढतो. खोडाची साल करडी पिंगट असून पाने संयुक्त व एकाआड एक आणि दोनदा पिसासारखी विभागलेली असतात. दलाच्या २–४ जोड्या असून प्रत्येक दलावर दलकांच्या १०–४६ जोड्या असतात प्रत्येक दलक ५–२० मिमी. लांब असते. पानांच्या बगलेत कणिश [→ पुष्पबंध] प्रकारचे दाट फुलोरे येतात व त्यांवर पिवळट पांढऱ्या प्रकारची लहान फुले एप्रिल व सप्टेंबरमध्ये येतात. शिंबा पिवळी, १०–२५ सेंमी. X ८–१५ मिमी., सरळ अथवा वाकडी, सपाट किंवा दंडगोलाकृती आणि न फुटणारी असते. प्रत्येक शिंबेत १०–३० बिया असून प्रत्येक बी लंबगोल, दबलेले, ७ X ३ मिमी., कठीण, पिवळट पिंगट आणि चकचकीत असते. लागवडीसाठी बिया आणि मुळांची व खोडाची छाट कलमे वापरतात.

मेस्काइटची झाडे जलद वाढणारी कणखर व रुक्षतारोधक असून छाटणीनंतर त्यांची पुन्हा चांगली वाढ होते. रुक्ष, अर्धवट रुक्ष, खडकाळ व लवणयुक्त भूमीवरही त्यांची वाढ होत असल्याने वनरोपणास (जंगल बनविण्यास) फार उपयुक्त असतात. जमिनीची धूप थांबविणे, सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण, सावली आणि कुंपण यांकरिताही यांचा उपयोग होतो. त्यांच्यापासून भरपूर जळण मिळते. शिंबा गुरांना व दुष्काळात मनुष्यांना खाद्य म्हणून उपयुक्त असतात. पूर्ण पक्व झालेल्या शिंबांतील मध्यकवच पौष्टिक असते. त्यातील पचनसुलभ प्रथिनामुळे ते महत्त्वाचे पशुखाद्य असते बियांचे पचन होत नाही, मात्र त्या दळून पिठाचे पाव बनवितात. सुका व ओला पालाही गुरांना चारता येतो. तसेच पानांत वनस्पतींना उपयुक्त असे पोषक पदार्थ भरपूर असल्याने त्यांचा हिरवे खत म्हणून चांगला उपयोग होतो. या झाडांच्या खोडांतून पाझरणारा डिंक फिकट पिवळट पिंगट असतो. तो पायसीकरणास आणि मिठाईत घालण्यासही वापरतात. मेस्काइटचे लाकूड गर्द पिंगट, काहीसे सुगंधी, फार कठीण, बळकट, टिकाऊ व जड असते. ते रंधून व घासून गुळगुळीत करता येते. ते घरबांधणी, सजावटी सामान, कातीव काम इत्यादींकरिता वापरले जाते.

पहा : शमी.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

             2. Santapau, H. Henry, A. N. A Dictionary of the Flowering Plants in India, New Delhi, 1973.

परांडेकर, शं. आ.