चिकणा : (१) फुलाफळांसह फांदी, (२) संवर्ताने वेढलेले फळ.

चिकणा : (तुकटी, जंगली मेथी हिं. करेट, बारिअरा सं. गु. बला क. भीमान्विष कड्डी लॅ. सिडा कार्पिनिफोलिया सि. ॲक्यूटा कुल-माल्व्हेसी). उष्ण व उपोष्ण कटिबंधांत, भारतातील उष्ण भागात व नेपाळात हे अनेकशाखी, सरळ क्षुप (झुडूप) तणासारखे सामान्यपणे आढळते. याची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨माल्व्हेसी  अथवा भेंडी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. याची उंची सु. १·५ मी. असून याच्या शाखांवर तारकाकृती केस असतात. पाने साधी, एका आड एक, तळास गोलसर, दातेरी, लांबट व भाल्याप्रमाणे असून त्यांच्या बगलेत एक किंवा दोन पिवळी फुले नोव्हेंबर-डिसेंबरात येतात. अपिसंवर्त नसतो प्रशुके दोन [ → फूल]. शुष्क फळ (पालिभेदी) लहान, साधारण दबलेले व संवर्त (पुष्पकोशाने) वेष्टित असते. बिया पिंगट काळसर आणि चकचकीत असतात. मूळ कडू, त्रिदोषनाशक, स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे), शामक, पाचक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून ज्वरावर आणि शरीर दाहावर उपयुक्त असते. पाने गरम करून व तिळाचे तेल लावून बांधल्यास गळवे जलद पुवाळतात. हे मेक्सिकोमध्ये बळकट धाग्याकरिता ज्यूटऐवजी मोठ्या प्रमाणावर पिकवतात. याचा धागा तागाच्या दुप्पट बळकट असून झाडाची लागवड सोपी असते. धाग्यापासून बारीक व बळकट दोरा आणि काडण्या बनवितात खोडांपासून केरसुण्या, बुट्ट्या, चटया इ. बनवितात. सिडा कॉर्डिफोलिया (कंट्री मॅलो) या दुसऱ्या जातीलाही चिकणा नाव दिलेले आढळते. ही जाती धाग्यांकरिता व औषधाकरिता उपयुक्त आहे.

पहा: तुपकडी.

जोशी, गो. वि.