कसीली : (करंडी लॅ. ॲब्युटिलॉन म्युटिकम कुल-माल्व्हेसी). कापूस, जास्वंद, व भेंडी यांच्या    कुलातील या लहान केसाळ झुडपाचे ⇨ मुद्रा व ⇨ चिनी ताग ह्यांच्याशी बरेच साम्य असून ते  पाकिस्तानात आणि भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते तथापि कोकणात व दक्षिण पठारावर  कोठेही रस्त्याच्या कडेने किंवा कचऱ्याच्या ढिगावरही आढळते. पाने साधी (७⋅५–१० सेंमी.  व्यासाची) लांब देठाची, गोलसर, हृदयाकृती, दातेरी व सोपपर्ण (उपपर्णासह) फुले लालसरपिवळी, मुद्रेच्या फुलांपेक्षा मोठी, पानांच्या बगलेत एकेकटी, जानेवारी–जूनमध्ये येतात. किंजदले सु.पंचवीस [→ फूल] फळ (बोंड) साधारण गोलसर, टोकास खोलगट, फारच केसाळ प्रत्येक किंजदलात तीन लवदार बिया. खोड व फांद्यांपासून उपयुक्त धागे काढून त्यांपासून साध्या दोऱ्या व तत्सम वस्तू बनवितात. बिया पौष्टिक असल्याने दुष्काळात त्यांची पूड ज्वारीच्या पिठात मिसळून भाकरी करतात किंवा बियांची कांजी करून पितात.

पहा : माल्व्हेसी.

परांडेकर, शं. आ.