हायसिंथ : (लॅ. हायसिंथस ओरिएंटॅलिस कुल-लिलिएसी). ही सुगंधी बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ? ओषधी मूळची भूमध्य सामुद्रिक प्रदेश व आफ्रिकेतील उष्ण प्रदेशातील आहे. हायसिंथस प्रजातीत सु. ३० जातींचा समावेश होतो. सामान्य बागेतील हायसिंथ ही हा. ओरिएंटॅलिस हिचा प्रकार आहे. तीॲनातोलियातील असून सोळाव्या शतकात यूरोपात आणली गेली. जंगली हायसिंथस स.पासून सु. २,४३८ मी. उंचीपर्यंत आढळते.

 

लिलिएसी कुलात समाविष्ट असणाऱ्या ग्रेप हायसिंथ (मस्कारी बॉट्रिऑइडीस), समर हायसिंथ (गॅल्टोनिया कॅन्डिकन्स), स्पॅनिश हायसिंथ (ब्रिम्यूरा अमेथिस्टीनस) तसेच बेलिव्हॅलिया प्रजातीतील वनस्पती यांना पूर्वी हायसिंथस प्रजातीत समाविष्ट केले जात होते परंतु आता या प्रजातीत सामान्य हायसिंथ(हा. ओरिएंटॅलिस), सध्या कमी ज्ञात असलेल्या हा. लिटविनोवीई आणि हा. ट्रान्सकॅस्पिकस या तीन जाती समाविष्ट आहेत.

 

सामान्य बागेतील हायसिंथ २०–३० सेंमी. वाढते आणि सु. ७.५ सेंमी.पर्यंत पसरते. पाने लांब, अरुंद, ७-८ च्या समूहात, अवृंत (बिनदेठाची), मांसल, चकचकीत हिरवी, दातेरी कडा नसलेली, तळाशी पट्ट्याच्या आकाराची व मूलज (मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी) असतात. सर्व पानांचा एक झुबका बनतो व कंदामधून १५–३० सेंमी. लांब फुलोरा येतो. फुले सुगंधी, घंटाकृती, दाटीने व घट्टपणे बंदिस्त असलेली मेणचट असून पुष्पके पांढऱ्या, नारिंगी, पिवळ्या, गुलाबी, लाल, जांभळ्या व निळ्या रंगांच्या छटांमध्ये असतात. घंटाकृती फुलांना बहिर्नत पाकळ्या असतात. कंद जांभळा किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचा असून त्यावर कोरडे पापुद्य्रासारखे आवरण असते. याची फुले पूर्णपणे उमलल्यावर तारामिनासारखी दिसतात. बऱ्याचदा याची ग्रेप हायसिंथसोबत गल्लत केली जाते. सामान्य ग्रेप हायसिंथचे फुलोरे द्राक्षांसारखे घट्ट जोडून तयार झालेले असतात. दोन्ही वनस्पती वसंत ऋतूत बहरणाऱ्या आहेत.

 

लागवड : बागेतील जमीन यंत्राच्या साहाय्याने सारखी करून ३०–४० सेंमी. खोलीपर्यंत नांगरून घेऊन त्यावर ५–१० सेंमी. कंपोस्ट खताचा थर पसरतात. १५–२० सेंमी. खोल खड्डा खणून त्यात कंद रोवतात व आजूबाजूला घट्टपणे माती पसरतात. दोन कंदांमध्ये १०–१५ सेंमी. अंतर ठेवतात. लागवडीनंतर योग्य रीत्या पाणी पुरवितात. वसंत ऋतूत फुलोरा आल्यानंतर वनस्पतीची वाढ पाने झडून जाईपर्यंत करतात. त्यामुळे कंदात पुढील वर्षासाठी ऊर्जा साठविली जाते. मृत वनस्पती खालून कापून टाकतात किंवा पानांना घट्टपणे पिळून रोप उपटून काढतात. शरद ऋतूत पानगळीच्या काळात रोपांना पाणी देणे आवश्यक असते. बहराचा मोसम संपल्यानंतर फुलांचे देठ कापून टाकतात परंतु, पानांची गळती नैसर्गिक रीत्या होऊ देतात. खतांद्वारे पोषक द्रव्यांची वर्षभर पुरेल एवढी मात्रा देणे गरजेचे असते. फुलांचा आकार उत्तरोत्तर वर्षात कमी होत जातो, त्यामुळे काही उत्पादक हायसिंथची वर्षायू वनस्पतीप्रमाणे दरवर्षी लागवड करतात. फुलाचा बहर सामान्यतः मार्च-एप्रिल या कालावधीत असतो.

 

प्रकार : सिंगल हायसिंथ : या हायसिंथचा संपूर्ण मुकुट बागेत वा कुंड्यांत सुंदर दिसतो. ब्ल्यू जायंट हे सर्वांत मोठे सिंगल हायसिंथ असून त्यांची फुले निळ्या रंगाची असतात व त्यांवर गडद निळ्या रंगाच्या शिरा असतात.

 

डबल हायसिंथ : यामध्ये विविध रंगांच्या फुलांचे झुपकेदार गुच्छ २०–३० सेंमी. खोडावर फुलतात. याचा हॉलिहॉक हा गडद गुलाबी रंगाचा प्रसिद्ध प्रकार आहे.

 

मल्टिफ्लोरा हायसिंथ : यामध्ये प्रत्येक कंदफुलांचे अनेक वृंत असून फुलांची रचना सैल असते. हे हायसिंथ सिंगल व डबल हायसिंथ प्रकारापेक्षा कमी आढळतात.

 

उपयोग: विविधरंगी, आकर्षक फुले व सुगंध यांमुळे हायसिंथ वनस्पतीचा उपयोग बाग सुशोभिकरणासाठी मोठ्या प्रमाणात होतो. अनेक देशांत तिची लागवड मुख्यत्वेकरून सुगंधी द्रव्ये व अत्तरे (विशेषतःफे्रंच अत्तरे) बनविण्यासाठी करतात.

 

इतिहास: सु. ४००० वर्षांपूर्वी ‘थॅक्रोपेलॅस्जिअनङ्ख या बोली भाषेत हायसिंथ हा शब्द वापरात होता. ग्रीक व रोमन काळांत हायसिंथची लागवड केली जात होती. होमर आणि व्हर्जिल या दोघांनी त्याचा उल्लेख गोडवासाचे फूल असा केलेला आहे. नंतरच्या काळात ही वनस्पती यूरोपातून लुप्त झाली. सोळाव्या शतकात लेऑनहार्ट राउवुल्फ या जर्मन वैद्याने तुर्कस्तानामधून हायसिंथ पुन्हा पश्चिम यूरोपात आणले (१५७३). पुढे त्याचा प्रसार हॉलंड, ब्रिटन इ. ठिकाणी झाला. व्हिक्टोरियन फुलांच्या परिभाषेत हायसिंथचे फूल खेळाचे, तर निळे हायसिंथ प्रामाणिकपणाचे प्रतीक समजले जाते. 

 वाघ, नितिन भरत

 

हायसिंथ