रोहितक : (रोहडा हिं. सोहग, हरिन-हरा क. मुल्लमुत्तलगिड सं. रोहितक, प्लीहारी लॅ. फॅनामिक्सिस पॉलिस्टॅकिया, अमूरा रोहितक, कुल-मिलिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक सु. १५-१८ मी. उंच व शोभिवंत सदापर्णी वृक्ष. याच्या फॅनामिक्सिस या प्रजातीत एकूण सु. २५ जाती असून त्यांपैकी भारतात दोन आढळतात. याचा प्रसार श्रीलंका, मलाया, ब्रह्मदेश व कोको बेटे येथे आणि भारतात (अंदमान बेटे, प. घाट, उ. कारवार ते दक्षिणेस तिनेवेल्लीपर्यंत, हिमालायच्या पायथ्यास व गोंडापासून पूर्वेस, बंगाल, आसाम, सिक्कीम, छोटा नागपूर इ.) बहुधा घनदाट जंगलात आढळतो. शिवाय हा शोभेकरिता उद्यानांतून व रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. ह्या वृक्षाचा घेर सु. १.५ मी. व साल पातळ, करडी व खरबरीत असते. कोवळ्या भागांवर दाट लव असते. पाने एकाआड एक, चिवट, गुळगुळीत, मोठी, संयुक्त (०.३-०.७५ मी.), विषमदली, पिच्छाकृती (पिसासारखी विभागलेली) असून दलांच्या ४-८ जोड्या असतात व शिवाय एक दल टोकास असते. दले समोरासमोर (७.५-२२.५ × ३.५-१० सेंमी.) आयत, तळाशी काहीशी तिरपी (मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस सारखी नसलेली), गर्द हिरवी व लहान देठाची असतात. फुले द्विलिंगी व एकलिंगी असून ती भिन्न झाडांवर येतात. नर-व स्त्री-फुलोरे [⟶ पुष्पबंध] पानांच्या बगलेत व अनुक्रमे परिमंजरी व कणिश प्रकारचे असतात ते पावसाळ्यात येतात. नर फुले अनेक, ०.४ सेंमी. लांब व सच्छद (तळाशी सूक्ष्म उपांगे असलेली) संदले (पाकळ्यांखालची पुष्पदले) ५ आणि प्रदले (पाकळ्या) ३ सुटी, संदलापेक्षा मोठी आणि पांढरी केसरदले (पुं-केसर) ६ व जुळलेली केसरनलिका गोलसर व पाकळ्यांइतकी मोठी. स्त्री-फुले (व द्विलिंगी फूल) नर-फुलांपेक्षा मोठी असून संदले व प्रदले त्यातल्याप्रमाणे असतात किंजपुट केसाळ, ऊर्ध्वस्थ व तीन कप्प्यांचा असून किंजल्क तीन असतात [⟶ फूल]. शुष्क फळे (बोंडे) ३.८-५ सेंमी. व्यासाची, गोलसर, पिकल्यावर पिवळी होतात व ती हिवाळ्यात येतात. त्यांची साल चिवट व गुळगुळीत असून फळ तडकल्यावर त्याची तीन शकले होतात प्रत्येक शकलात एक काळेतपकिरी बी असते व त्या प्रत्येकावर शेंदरी रंगाचे मगजयुक्त अध्यावरण असते [⟶ बीज]. या वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे निंब कुलात [⟶ मेलिएसी] वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया लावून करतात. ओलसर व सावली असलेली ठिकाणे वाढीस सोयीची असतात.

ताजेपणी याचे लाकूड लालसर असून पुढे त्याला तपकिरी झाक येते. ते मध्यम प्रतीचे, जड व कठीण असून सुतारकामास सोयीचे असते रंधून व घासून त्याला गुळगुळीत करता येते. बंदिस्त जागी ते चांगले टिकते. त्याचा उपयोग होडगी, नावा, चहाच्या पेट्या, किरकोळ बांधकाम, तक्ते इत्यादींस करतात. बियांत ७८% गाभा असून त्यातून ४७% लालसर तपकिरी, कडू व अर्धवट सुकणारे तेल मिळते. ते दिव्यात जळणास वापरतात. ते आमवात व संधिवातावर चोळण्यास उपयुक्त असते. साल स्तंभक (आकुंचन करणारी) असून सुजलेल्या ग्रंथींवर आणि यकृत व प्लीहा यांच्या विकारांवर देतात. पानांचा लेप व्रणशोथावर (जखमेमुळे होणाऱ्या आगीवर) बांधतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. 1. New Delhi, 1948.

           2. McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.