लेमन : (लॅ. सिट्रस लिमॉन, सि. लिमोनिया कुल-रूटेसी). यूरोपात व अमेरिकेत हे फळ सर्व आंबट फळांत व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. फळाच्या मूलस्थानाबद्दल शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. काहींच्या मते हे फळ मूळचे भारतातील आहे, तर काहींच्या मते ते दक्षिण चीन व उत्तर म्यानमारातील (ब्रह्मदेशातील) असावे. झाडाच्या वाढीचा जोम, फळाचा आकार, आकारमान व गुणधर्म या बाबतींत भिन्नता असणारे पुष्कळ प्रकार या फळात आढळून येतात. 

वनस्पती वर्णन : खऱ्या अर्थाने ज्याला लेमन म्हणता येईल ते झाड मध्यम उंचीचे (३ ते ६ मी.) व सदाहरित असून त्यावर पुष्कळ मजबूत काटे असतात. फांद्या वेड्यावाकड्या वाढतात. पाने आयताकृती व टोकदार असून त्यांच्या देठावर फार अरुंद पंखासारखा भाग असतो अथवा मुळीच नसतो. पाने चुरगळल्यास त्यांना विशिष्ट प्रकारचा  वास येतो. फुले मोठी व जांभळट  रंगाची असतात. फळे  मध्यम

आ. १. लेमन : (अ) फुलांसह फांदी (आ) फळ.

 आकारमानाची (सु. ५ सेंमी. व्यासाची व ७.५ ते १२.५ सेंमी. लांब) लांबट अथवा अंडाकृती असून टोकाकडील भाग सर्वसाधारणपणे स्तनाग्राप्रमाणे पुढे आलेला असतो. फळाची साल जाड व पिवळी  असून तिच्यावर बारीक छिद्रांप्रमाणे दिसणारे तैल प्रपिंड (तेलाच्या ग्रंथी) असतात. गर फिकट पिवळा असून त्यात फार थोड्या बारीक बिया असतात पण काही प्रकारांत त्या मुळीच नसतात. रस कागदी लिंबाच्या रसापेक्षा कमी आंबट असतो. फळे वर्षभर येतात व ती हिरवी असतानाच तोडतात. झाडावरच पिकू दिल्यास ती कडवट होतात. तोडलेली फळे काही महिने अंधेऱ्या खोलीत साठवून ठेवतात. साठवणीमध्ये ती पिकतात आणि त्यांचा रंग हलके हलके पिवळा होतो. १३ ते १६ से. तापमान आणि ८५ ते ९०% सापेक्ष आर्द्रता असलेल्या खोलीत फळे लवकर पिकतात. 

लागवडीचे प्रदेश : इटली व अमेरिका (कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग) हे लेमनच्या उत्पादनात अग्रेसर देश आहेत. व्यापारी प्रमाणावर लागवडीचे इतर देश पुढीलप्रमाणे आहेत : स्पेन, ग्रीस, तुर्कस्तान, अर्जेंटिना, लेबानन, चिली, ब्राझील, इझ्राएल, ऑस्ट्रेलिया, ट्युनिशिया, अल्जीरिया, द. आफ्रिका, सायप्रस, पोर्तुगाल व मोरोक्को.

भारतात लेमनची लागवड फारशी नाही, कारण दर वर्षी फळे येण्यास थंड हवामान लागते. घरबागेत व लहान प्रमाणात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटकात लागवड करतात. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत व कमी-जास्त उंचीच्या प्रदेशात ही झाडे वाढू शकतात आणि बागाईत व जिराईताखाली भरपूर उत्पादन देतात. सर्वसाधारणपणे ७ से. च्या खाली तापमान जात नाही अशा प्रदेशात लेमनची लागवड होऊ शकते. कागदी लिंबाच्या झाडावर आढळून येणारे सल व शेंडे सुकणे हे रोग लेमनवर क्वचितच आढळून येतात. तसेच कागदी लिंबाच्या फळांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा खैरा रोग लेमनच्या काही प्रकारांवर मुळीच आढळून येत नाही. यामुळे लेमनची व्यापारी प्रमाणावर लागवड करण्यास पुष्कळ वाव आहे. दाब कलम व डोळे भरून केलेली कलमे लावल्यापासून त्यांना काही ठिकाणी १८ महिन्यांतच फळे धरतात. फळे वर्षभर धरतात.

कागदी लिंबू (लाइम) व लेमन यांतील भेद : फलसंवर्धनशास्त्राप्रमाणे सिट्रस प्रजातीतील आंबट फळांच्या वर्गात ‘लाइम’ व ‘लेमन’ असे दोन उपवर्ग आहेत. कागदी लिंबाचा समावेश ‘लाइम’  मध्ये होतो. कागदी लिंबाला ‘कागदी लेमन’ असे काही वेळा संबोधण्यात येते परंतु ते बरोबर नाही. आ. २. लेमन व कागदी लिंबू यांचे तुलनात्मक आकार व आकारमान: (अ) लेमन, (आ) कागदी लिंबू.कागदी लिंबू व लेमन यांत पुढील महत्त्वाचे भेद आढळून येतात. कागदी लिंबाची पाने लेमनच्या पानापेक्षा लहान असतात व त्यांच्या देठांवर रुंद पंख असतात. लेमनच्या पानाच्या देठावरील पंख फार अरुंद असतात अथवा मुळीच नसतात. कागदी लिंबाची फुले लहान व शुभ्र पांढरी असतात, तर लेमनची फुले मोठी व जांभळट रंगाची असतात. कागदी लिंबाची फळे लेमनच्या फळापेक्षा लहान असून ती गोलसर असतात. लेमनची फळे मोठी, लांबट आकाराची असून टोकाकडे स्तनाग्राप्रमाणे ठळकपणे पुढे आलेला भाग असतो. कागदी लिंबाच्या फळाची साल पातळ असते, तर (मगज) हिरवट रंगाचा असून रस फार आंबट असतो. लेमन फळाची साल जाड असून गर फिकट पिवळा असतो. रस कागदी लिंबाच्या रसापेक्षा कमी आंबट असतो. 


प्रकार : लेमनचे परदेशातील पुढील प्रकार भारतात लागवडीत आहेत. युरेका, व्हिला फ्रँका, लिस्बन, इटालियन सीडलेस, नेपाळी ऑब्लाँग, नेपाळी राउंड आणि माल्टा. यांपैकी इटालियन राउंड हा प्रकार सर्वांत महत्त्वाचा असून तो भारताच्या निरनिराळ्या भागांत, कोरड्या व दमट हवेत यशस्वी ठरला आहे. फळ मोठे व अंडाकृती असून टोकाकडील भाग स्तनाग्राप्रमाणे पुढे आलेला असतो. फळात बिया बहुधा नसतात, अथवा १-२ बिया असतात. साल जाड व गुळगुळीत असते व गर रसदार असतो. त्यामुळे शीतपेये करण्यासाठी व लोणचे करण्यासाठी हा प्रकार विशेष चांगला आहे. दख्खन व दक्षिण भारतातील कोरड्या प्रदेशात या प्रकारची झाडे भरपूर फळे देतात. पुष्कळ पावसाच्या प्रदेशातही बेताचे उत्पादन मिळते. फळे आतून तयार झाली, तरी ती जुलैच्या अखेरपर्यंत बाहेरून हिरवीच राहतात. कागदी लिंबाच्या स्पर्धेत इटालियन राउंडला चांगली किंमत येत नाही. एथ्रेलाचा वापर करून हिरवा रंग बदलणे शक्य आहे. 

आसाम लेमन नावाचा लेमनचा प्रकार भारताच्या सपाट प्रदेशात बागाईताखाली चांगला ठरला आहे. हा मूळचा भारतातील प्रकार असावा, असे मानण्यात येते आणि तो चिना कागझी, चिनापट्टी, सरबती व पाट निम्बू या नावांनीही ओळखला जातो. त्याला वर्षभर फळे धरतात. इटालियन लेमनपेक्षा हा प्रकार कमी प्रतीचा आहे. 

 

बारामास नावाचा प्रकार उत्तर प्रदेशाच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांत व पंजाबात लोकप्रिय आहे. त्याच्या काही वाणांत बिया मुळीच नसतात. फळाचे उत्पादन भरपूर मिळते. फळ गोलसर, मध्यम आकारमानाचे असून त्याचा टोकावरील भाग स्तनाग्राप्रमाणे नसतो. फळाची साल तुलनेने पातळ असून गर रसदार व स्वादिष्ट असतो. 

भद्री नावाचा लेमनचा प्रकार हरयाणा कृषी विद्यापीठाच्या फलसंवर्धन विभागात चांगला असल्याचे आढळून आले आहे. झाडाची उंची ३ ते ५ मी. असून पाने मोठी व हिरवी व फार आखूड पंखाची असतात. फळाचे सर्वसाधारण वजन १.५ किग्रॅ. असते (काही फळे ३.७ किग्रॅ. पर्यंत वजनाची असतात). फळात ३३% रस असतो. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत फळे मिळतात व दर झाडाला सर्वसाधारणपणे २५० फळे धरतात. पंत लेमन-१ हा प्रकार पंतनगरच्या गोविंदवल्लभ पंत कृषी व तंत्रविद्या विद्यापीठात विकसित करण्यात आला आहे. 

 

आंध्र प्रदेशाच्या कडप्पा जिल्ह्यात जिनोआ नावाचा लेमनचा प्रकार व्यापारी प्रमाणावर लागवडीत आहे. फळाची प्रत चांगली असून त्यात बिया नसतात. 

मूळचे भारतीय असे लेमनचे दोन प्रकार भारतात लागवडीत आहेत आणि ते ⇨जंबुरी किंवा ईडलिंबू (हिं.जट्टी खट्टी, इं. रफ लेमन) व गलगल (इं. हिल लेमन) या नावांनी ओळखले जातात. या दोन्ही प्रकारांचा अंतर्भाव सिट्रस लिमॉन या जातीत होत असला, तरी सामान्य लेमनपेक्षा काही बाबतींत ते भिन्न आहेत. जंबुरीचे झाड लेमनच्या झाडापेक्षा काटक असून ते जास्त जोमाने वाढते व लेमनपेक्षा जास्त रोगप्रतिकारक आहे. जंबुरीचे फळही लेमनपेक्षा आकाराने वेगळे असून साल खडबडीत असते. सिट्रस प्रजातीतील इतर फळांची कलमे करण्यासाठी खुंट म्हणून जंबुरीचा भारतात व इतर अनेक देशांत वापर करतात. फळाला बाजारात फारशी मागणी नसते. लोणच्यासाठी घरगुती वापरात त्याचा उपयोग करतात. सामान्ये लेमनपेक्षा काही बाबतींत ते वेगळे असल्यामुळे काही शास्त्रज्ञ (लुशिंग्टन व तनाका) जंबुरीचा अंतर्भाव सिट्रस जंभिरी अथवा सि. जंबुरी या वेगळ्या जातीत करतात. [⟶ जंबुरी]. 

 

गलगल या नावाने ओळखला जाणारा प्रकार पंजाबात पठाणकोटच्या आसपासच्या भागात व उत्तर प्रदेशात प्रसिद्ध असून त्याची पाने, फुले व फळे सामान्य लेमनपेक्षा पुष्कळच मोठी असतात. फळ अंडाकृती असून त्यात बिया फार थोड्या असतात. सामान्य लेमनला वर्षभर फुले व फळे येतात परंतु गलगलला वर्षातून एकदाच फुले व फळे धरतात. फळे चांगल्या प्रतीची असून त्यांचे उत्पादनही पुष्कळ असते. सामान्य लेमनचे झाड जास्त उष्णता अगर थंडी सहन करू शकत नाही परंतु गलगलचे झाड याबाबतीत जास्त काटक आहे. सामान्य लेमनशी तुलना करता वरील भेदांमुळे या फळाचा अंतर्भाव वेगळ्या जातीत करावा, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. या फळाचा मुख्य उपयोग सरबत, मुरंबा व लोणचे करण्यासाठी होता. 

अभिवृद्धी : कॅलिफोर्नियामध्ये मोसंब्याच्या (स्वीट ऑरेंज) खुंटावर लेमनचे डोळे भरून कलमे करतात. चकोतरा व जंबुरीचाही या कामी वापर करतात. भारतात जंबुरीच्या खुंटावर डोळे भरून कलमे करतात. 

 

उत्पादन : इटालियन व गलगल या प्रकारांचे दर झाडाचे वार्षिक उत्पादन ६०० ते ८०० फळे असते. 

 

उपयोग : ताज्या फळाच्या रसापासून लेमोनेड व इतर पेये तयार करतात. फळाचा रस संहत करून (पाण्याचा अंश कमी करून) तो गोठवितात व त्यापासून पेये तयार करतात. फळाच्या सालीपासून तेल (लेमन ऑइल) काढतात आणि त्याचा उपयोग निरनिराळ्या खाद्यपदार्थांना व पेयांना स्वाद आणण्यासाठी करतात. ऊर्ध्वपातित (बाष्प करून व थंड करून इतर घटकांपासून अलग केलेले) तेल साबण व सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी वापरतात. फळाच्या सालीतील पांढऱ्या भागापासून पेक्टीन काढतात आणि त्याचा उपयोग फळांचे जॅम व जेली तयार करण्यासाठी आणि औषध उद्योगात करतात. तेल काढून घेतलेल्या सालींची पूड करून तिचा पशुखाद्यात वापर करतात. फळाच्या रसापासून सायट्रिक अम्ल मिळते. 

 

फळाचे लोणचे प्लीहावृद्धीवर (पानथरीच्या वाढीवर) गुणकारी आहे. फळाची साल पाचक व पोटदुखीवर गुणकारी आहे. फळात अ,ब व क ही जीवनसत्त्वे व लवणे असून क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणाऱ्या स्कर्व्ही नावाच्या रोगावर लेमनचा रस फार गुणकारी आहे. तसेच तो मूत्रल (लघवीचे प्रमाण वाढविणारा) असून तापात प्रशीतक (थंडावा देणारा) म्हणून व तीव्र संधिवात, आमांश, अतिसार व सर्दी-पडसे यांवर गुणकारी आहे. रसात न्यूमोनियाविरोधी गुणधर्म आहेत, असे म्हणतात. 

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II. New Delhi, 1950.

           2. Cheema, G. S. Bhat, S. S. Naik, K. C. Commercial Fruits of India, Bombay, 1954.

           3. Hayes, H. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.

           4. Sham Singh Krishnamurthi, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

           ५. नागपाल, रघुबीर लाल (भाषांतर : ह. चिं. पाटील), फळझाडांच्या लागवडीची तत्त्वे आणि

               पद्धती, पुणे, १९६३.  

           ६. परांजपे, ह. पु. फळझाडांचा बाग, पुणे, १९५०.

पाटील, ह. चिं. गोखले, वा. पु.