वृक्षोद्यान : (आर्बोरेटम). शिक्षण, शोभा किंवा वैज्ञानिक संशोधन इ. उद्दिष्टांनी फक्त क्षुपे (झुडपे) व वृक्ष यांची स्वतंत्रपणे लागवड व संवर्धन करण्यासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रविभागास हे नाव दिले जाते. ह्यातील प्रत्येक झाडावर त्याचे नाव व मूलस्थानदर्शक फलक असून या विभागाचे स्वरुप सामान्यतः ⇨शास्त्रीय उद्यानांसारखेच असते. थोडक्यात, हा एक मूलस्थानदर्शक जिवंत वनस्पतिसंग्रहच असून त्यात संशोधनाच्या हेतूने स्थानिक नसलेल्याही अनेक जाती नियंत्रित परिस्थितीत वाढविल्या जातात. प्रकाश, छाया, पाणी, तापमान इत्यादींशी यांची प्रतिक्रिया व त्यांच्या संवर्धनासंबंधी इतर समस्या यांचा प्रायोगिक अभ्यास येथे करतात. याला उघडी प्रयोगशाळा असेही म्हटले जाते. येथील झाडांची मांडणी संशोधनाच्या हेतूप्रमाणे केलेली असते. सुमारे ८०० वर्षांपूर्वी टोकिओ (जपान) येथे प्रथम अशा प्रकारच्या वृक्षोद्यानाची सुरुवात झाली व त्यानंतर गेल्या सु. तीन शतकांत जगात इतरत्र शोभा व अभ्यास यांकरिता वैयक्तिक प्रयत्नाने ह्या उद्यानांचा प्रसार होत गेला.

शिकागोजवळचे ‘मॉर्टन आर्बोरेटम’ व बॉस्टनजवळचे ‘आर्नल्ड आर्बोरेटम’ ही अमेरिकेतील पहिल्या दर्जाची वृक्षोद्याने आहेत. वॉशिंग्टन येथील प्रसिद्ध नॅशनल आर्बोरेटम १९२७ मध्ये सुरु झाले. तेथे शेकडो देशी/विदेशी झाडा-झुडपांचे संवर्धन चालू आहे. विसाव्या शतकातील प्रत्येक शास्त्रीय उद्यान काही प्रमाणात वृक्षसंवर्धनाचेही कार्य करते. त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या स्वरुपात विशेष फरक नाही. खाजगी किंवा सार्वजनिक उद्यानात अथवा शिक्षणसंस्थांच्या बागेतही काही विशिष्ट भाग फक्त या कार्याकरिताच राखून ठेवतात. सर्व प्रगत देशांत अशा कार्यास वाहून घेतलेल्या अनेक संस्था आहेत. रॉयल बोटॅनिकल गार्डन [क्यू (इंग्लंड) व एडिंबरो (स्कॉटलंड)], भारतातील कोलकात्याचे सिबपूर येथील वनस्पतिउद्यान, डेहराडूनची ‘वन-संशोधन संस्था’ येथेही वृक्षसंवर्धन कार्य चालू आहे. जावा बेटावरील बॉइटेन्‌झॉर्ख (बोगोर) येथील डच कलोनियल उद्यानात उष्ण कटिबंधातील अत्यंत महत्त्वाच्या वृक्षांचा संग्रह केलेला आढळतो.                                             

पहा : उद्याने व उपवने भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था वनविद्या वृक्ष शास्त्रीय उद्याने.                                               

परांडेकर. शं. आ.