कामट्टी : (लॅ. बैल्‌श्मीदिया फॅगिफोलिया कुल – लॉरेसी). सु. ६–९ मी. उंच वाढणाऱ्या एका वृक्षाचे कानडी नाव. या मोठ्या सदापर्णी वृक्षाचा प्रसार सर्व उष्णकटिबंधात आहे. भारतात (दख्खन द्वीपकल्प, कोकण, उत्तर कारवार) सदापर्णी जंगलात तो आढळतो. बुंध्याचा घेर १⋅२ मी. साल पातळ, करडी व खवलेदार पाने चिवट, दीर्घवृत्ताकृती – भाल्यासारखी, गुळगुळीत, टोकदार असून वरची बाजू चकचकीत व खालच्या बाजूस शिरांचे जाळे स्पष्ट दिसते. फुले पांढरट व कक्षास्थ (बगलेतील) आखूड परिमंजरीवर [→ पुष्पबंध] थंडीत येतात. फळे तीन ते चार सेंमी. लांब, बोरासारखी, गडद निळी असून उन्हाळ्यात येतात. लाकूड फिकट तपकिरी, चमकदार व मध्यम कठीण असते घरे व नावांसाठी ते वापरतात.

पहा : लॉरेसी

जमदाडे, ज. वि.