कांगणी : (कामोणी, कांगोणी हिं. मकोइ गु.पिलुडी क. काकमुंची, काचिगिड सं. काकमाची, कागांगी इं. ब्लॅक नाइटशेड, हौंड्‌स बेरी लॅ. सोलॅनम नायगम कुल-सोलॅनेसी). सु.३०–४५ सेंमी. उंचीची व अनेक फांद्यांची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ ओषधी]   भारतात सर्वत्र, विशेषतः शेतजमिनीत तणासारखी वाढते शिवाय श्रीलंकेत व सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत आढळते. खोड सरळ पाने अनेक, एकाआड एक, साधी, अंडाकृति कुंतसम (भाल्यासारखी), थोडीफार खंडित किंवा अखंड, दोन्ही टोकांस निमुळती होत गेलेली फुले लहान, पांढरी असून पानांच्या बगलेजवळ ३ ते ८ फुलांचे लोंबत्या चवरीसारखे झुबके सप्टेंबर-जानेवारीत येतात. मृदुफळे (०.६ मिमी. व्यास) पिवळी, लाल किंवा गर्द जांभळी, गुळगुळीत व चकचकीत. बिया अनेक, चकतीसारख्या व पिवळ्या.

ह्या वनस्पतीत सोलॅनीन व सॅपोनीन ही अल्कलॉइडे असतात. तिचा फांट (एक प्रकारचा काढा) आमांश, ज्वर व पोटाच्या तक्रारीवर देतात. वनस्पतीचा रस जखमांवर व चर्मरोगावर वापरतात पोटात घेतल्यास, पाण्यासारखे ढाळ होतात व लघवी भरपूर होते. यकृतवृध्दी, रक्तमिश्रित थुंकी येणे, मूळव्याध, आमांश इत्यादींवरही रस गुणकारी  पानांचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) व सारक पक्व फळे ज्वर, अतिसार, नेत्ररोग व जलव्देषावर (पिसाळलेले कुत्रे चावल्याने होणाऱ्या रोगावर) देतात. तसेच ती सारक, पौष्टिक, क्षुधावर्धक असून दमा, चर्मरोग, अतिशय तहान लागणे व मूत्रविकार इत्यादींवर चांगली. कच्ची फळे विषारी असून त्यांचा लेप नायट्यांवर लावतात.

पहा : नाइटशेड सोलॅनेसी.

परांडेकर, शं. आ.