वंदाक : (वंदा लॅ. व्हँडा कुल-ऑर्किडेसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सुंदर फुलांबद्दल प्रसिद्ध असलेल्या ⇨ऑर्किडेसी अथवा आमर कुलातील हे एक प्रजाती नाम असून त्यातील वनस्पतींचे मूलस्थान भारत व चीन ते ऑस्ट्रेलिया पर्यंत आहे. व्हँडा ह्या प्रजातीत एकूण सु. ६० जाती असून त्यांपैकी सु. १० भारतात आढळतात. ‘वंदाक’ ही मूळची भारतीय संज्ञा असून ती लॅटिन भाषेत व्हँडा अशी घेतली असावी [उदा., व्हँडा रॉक्सबर्घाय⟶रास्ना]. गोंधळ टाळण्यासाठी ‘वंदाक (वंदा)’ ही संज्ञा काही आमरांकरिता व ‘वंदाक’काही बांडगुळांकरिता निश्चित केली आहे [⟶लोरँथेसी].

व्हँडाच्या जातीत खुज्या किंवा उंच, क्वचित वर चढणाऱ्या ओषधीय [⟶ओषधि] ⇨अपिवनस्पती असतात. पाने साधी, एकाआड एक व दोन समोरासमोरच्या ओळींत, जाड, चिवट किंवा मांसल, पसरट किंवा पन्हाळासारखी, दातेरी किंवा खंडित व टोकदार असतात. फुले मोठी सच्छद व आकर्षक असून पानांच्या बगलेत एकेकटी आणि अधिक असल्यास विरळ किंवा दाट मंजरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. संदले व प्रदले (पाकळ्या) सारखी, पसरट व तळाशी टोकदार असतात. पुष्पोष्ठ (ओठासारखी पाकळी) मोठा, स्तंभाशी जोडलेला व तळाशी कोशवंत (पिशवीसारखा) किंवा शुंडिकावंत (लहान सोंडेसारखा) असतो. ओठाच्या बाजूचे खंड मोठे किंवा लहान असून स्तंभाच्या (किंजल्क व केसर यांच्या संयुक्त दांड्याच्या) तळाशी चिकटलेले असतात मधला खंड मांसल असतो. परागपुंज (परागकणांचे समूह) दोन, गोलसर व एकाच देठावर आणि स्तंभ खुजा व जाड असतो [⟶फूल]. फळ शुष्क (बोंड) आणि त्यात अनेक बारीक बिया असतात. व्हँडा प्रजातीतील अनेक जाती शोभेकरिता बागेत लावतात. 

इतर आमरांपेक्षा लागवड केलेल्या जातींना अधिक प्रकाश आवश्यक असतो तथापि लख्ख व प्रकार सूर्यप्रकाशाच्या वेळी थोडी सावली द्यावी लागते. या वनस्पतींची वाढ चालू असताना भरपूर पाणी देणे आवश्यक असते. कुंड्यांत व टोपल्यांत त्यांची वाढ चांगली होते मात्र त्यांत कोळशाचे तुकडे व स्फॅग्नम जातीची शेवाळी [हरिता ⟶शेवाळी] भरपूर घालावी लागते. ह्या जातींची अभिवृद्धी (लागवड) कलमे लावूनही करतात. फुलकिडे कळ्यांना उपद्रवकारक असतात योग्य त्या कीटकनाशांचा वेळीच वापर करून हा उपद्रव टाळता येतो. 

पहा: ऑर्किडेसी.  

संदर्भ: 1. BaiIey, L. H. The Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

          2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.