सॅल्व्हॅडोरेसी : (पीलू कुल). हे फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक लहान कुल आहे. यामध्ये ॲझिमा, डोबेरा सॅल्व्हॅडोरा या तीनच प्रजाती अंतर्भूत असून त्यांत सु. १२ जाती (काहींच्या मते ८-९ जाती) आहेत. त्यांचा प्रसार आशिया, आफ्रिका व मादागास्कर येथील रुक्ष व उष्ण प्रदेशांत, अनेकदा समुद्रकिनारी किंवा लवणयुक्त जमिनीत झालेला आहे. भारतात अनेक ठिकाणी यांपैकी काही वनस्पती आढळतात. अनेक वनस्पती काहीशा करड्या रंगाच्या दिसतात. यांध्ये अनेक वृक्ष व झुडपे आहेत दुर्बलपणामुळे काही झुडपे आपला भार जवळच्या सबल झुडपांवर किंवा अन्य आधारावर टाकतात परंतु त्या वेली नव्हेत. यांची पाने साधी, समोरासमोर व अखंड असून उपपर्णे (तळाशी असलेली लहान उपांगे) लहान, परंतु कधी त्यांचा अभाव असतो. खोडे व फांद्या यांवर शाखायुक्त फुलोरे [मंजऱ्या, परिमंजऱ्या ⟶ पुष्पबंध] असून त्यांवर नियमित व लहान फुले येतात आणि ती द्विलिंगी किंवा एकलिंगी असल्यास विभक्त झाडांवर असतात. प्रदल-मंडल (पुष्पमुकुट) ४-५, सुट्या किंवा जुळलेल्या पाकळ्यांचे असून त्याखालची पुष्पदले (संदले) ४-५, सुटी व संवर्त (संदल-मंडल) घंटेसारखा किंवा अंडाकृती केसरदले (पुं-केसर) ४, सुटी, क्वचित तंतू जुळलेले व पाकळ्यांस तळाशी किंवा वर चिकटलेली बिंबाऐवजी चार ⇨प्रपिंडे (ग्रंथी) तंतूबरोबर एकाआड एक असतात किंजदले (स्त्री-केसर) दोन किंजपुट (स्त्री-केसराचा तळभाग) ऊर्ध्वस्थ(संवर्ताच्या किंवा वरच्या पातळीत), एक किंवा दोन कप्प्यांचा असून प्रत्येक कप्प्यात दोन आवरणांची १-२ बीजके (अपक्व बीजे) सरळ व अधोमुख असतात. किंजल (स्त्री-केसराचा तंतूसारखा भाग) आखूड व किंजल्क (स्त्री-केसराग्र ) दुभंगलेला किंवा काहीसा अखंड मृदुफळ किंवा आठळीफळ एकबीजी बीजात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसून ते सरळ, गोलसर किंवा चपटे असते.

मिरजोळी (खाकण) व ⇨किंकानेला ह्या साधारण उपयुक्त भारतीय वनस्पती सॅल्व्हॅडोरेसी या कुलातील आहेत. ॲझिमा ची एक काटेरी जाती (ॲ. टेट्रॅकँथा) भारतात कुंपणाकरिता वापरतात. डोबेरा चीएक जाती (डो. ग्लॅब्रा ) स्वयंपाकाची लाकडी भांडी बनविण्यास भारतात वापरतात सॅल्व्हॅडोरा ओलिऑइडिस (किंकानेला) आणि सॅ. पर्सिका (खाकण) या दोन्ही जाती पीलू या नावानेही ओळखतात त्यावरून मराठी नाव कुलाला सुचविलेले आहे.

आप्तभाव व जातिविकास : ए. एंग्लर यांच्या पद्घतीनुसार या कुलाचा समावेश ⇨सॅपिंडेलीझ (अरिष्ट) गणातील सेलॅस्ट्रीनी ह्या उपगणात होतो परंतु ⇨ जॉन हचिन्सन व जे. एन्. मित्र यांनी सेलॅस्ट्रेलीझ (ज्योतिष्मती) गणात केलेला आढळतो त्यात त्यांनी फक्त पाच कुले घातली आहेत. एंग्लर यांच्या सॅपिंडेलीझमध्ये २३ कुले आहेत व सेलॅस्ट्रीनी उपगणात ९ कुले आहेत, त्यांपैकी सेलॅस्ट्रेसी एक आहे. जॉर्ज बेंथॅ व सर जोसेफ डाल्टन हूकर यांच्या पद्घतीत ⇨ जेन्शिएनेलीझ मध्ये (किराईत गणात) हे कुल घातले आहे. ए. बी. रेंडल यांनी ओलिएलीझ गणात ⇨ ओलिएसी (पारिजातक कुल) व सॅल्व्हॅडोरेसी ही दोनच कुले अंतर्भूत केली आहेत. यावरून सॅल्व्हॅडोरेसीचे आप्तभाव अस्पष्ट आहेत, हे दिसून येते. तथापि त्याचे नैसर्गिक स्थान सेलॅस्ट्रेसीजवळ असल्याबद्दल फारसे दुत नाही. आर्. फॉन वेटश्टाइन यांच्या मते सेलॅस्ट्रेलीजमधून सॅल्व्हॅडोरेसीचा उगम ओलिएसीबरोबर झाला असावा सेलॅस्ट्रेलीझचा उगम व विकास ⇨ रोझेलीझ (गुलाब गण) किंवा माल्व्हेलीझ (भेंडी गण) यांपासून झाला असावा असे अनेकजण मानतात. मात्र हचिन्सन यांच्या मते सेलॅस्ट्रेलीझचा विकास यूफोर्बिएलीझ (एरंड) गणापासून झाला असावा.

पहा : यूफोर्बिएसी.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ. नवलकर, भो. सुं.