बॉवर, फ्रेडरिक ऑरपेन : (४ नोव्हेंबर १८५५ – ११ एप्रिल १९४८). ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ. जमिनीवर वाढणाऱ्या आद्य वनस्पतींच्या, विशेषतः ⇨नेचांच्या आधुनिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे त्या वनस्पतींचा उगम व क्रमविकासाद्वारे (उत्क्रांतीद्वारे) झालेला विकास यांच्या विषयीच्या माहितीत फार मोलाची भर पडली.

बॉवर यांचा जन्म रिपन (यॉर्कशर, इंग्लंड) येथे झाला व शिक्षण रेप्टन व ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण उर्झबर्ग (१८७७-७८) व स्ट्रॅस्‌बर्ग (१८७९) विद्यापीठांत झाले. लंडन विद्यापीठात सहाय्यक व वनस्पतिविज्ञानाचे निदेशक या नात्यांनी त्यांचा ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ टॉमस हक्स्ली यांच्याशी संबंध आला (१८८०-८५). १८८५ मध्ये ग्लासगो विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाच्या रिगियस अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली व १९२५ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्या पदावर त्यांनी काम केले.

पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ अध्ययन करून टेरिडोफायटा [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] आणि ब्रायोफायटा [⟶ शेवाळी] यांचे पूर्वज ⇨शैवल असावेत, असे अनुमान त्यांनी काढले. तसेच गंतुकांच्या (प्रजोत्पादक पेशींच्या संयोगाने तयार झालेल्या युग्मजापासून बनलेल्या बीजुकधारींचे (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग म्हणजे बीजुक असलेल्या वनस्पतींचे) क्रमविकास होताना जमिनीवर वाढणाऱ्या आद्य वनस्पतींमध्ये नियमितपणे व स्वतंत्र रीत्या पिढ्यांचे एकांतरण [⟶ एकांतरण, पिढ्यांचे] होते, असे त्यांनी सिद्ध केले.

बॉवर हे लंडनच्या रॉयल सोसायटीचे अधिछात्र (१८९१) व एडिंबरोच्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष (१९१९-२४) होते. अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या आणि विविध संस्थांचे व संघटनांचे सदस्यत्व त्यांना देण्यात आले होते. यांशिवाय त्यांना लिनीअन (१९०९), रॉयल (१९१०) व डार्विन (१९३८) ही पदके मिळाली होती. तसेच ‘हूकर व्याख्याने’ (१९१७) व ‘हक्स्ली स्मृतिव्याख्याने’ (१९२९) त्यांनी दिली होती. दि ओरिजन ऑफ लँड फ्लोरा (१९०८), बॉटनी ऑफ द लिव्हिंग प्लँट्स (१९१९), द फर्न्स (१९२३-२८), प्लँट्स अँड मॅन (१९२५), सिक्स्टी इयर्स ऑफ बॉटनी इन ब्रिटन (१९३८) इ. ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ते रिपन येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.