फायकॉइडी : (वालुक कुल). फुलझाडांपैकी[→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील एक कुल. याचा अंतर्भाव जी. बेंथॅम व जे. डी. हूकर यांनी फायकॉइडी या नावाने फायकॉइडेलीझ या गणात केला असून जे. हचिन्सन यांनी फायकॉइडेसी या नावाने कॅरिओफायलेलीझ गणात केला आहे ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांनी दिलेले ऐझोएसी हेच नाव हल्ली वापरले जाते. या कुलात एकूण सु. १३० वंश व सु. १,२०० जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते. १०० वंश व ६०० जाती ए. बी. रेंडेल यांच्या मते २३ वंश व १,१०० जाती) असून त्यांचा प्रसार विशेषतः द. अफ्रिकेत झाला आहे. तथापि आफ्रिकेतील व आशियातील उष्ण भाग, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया व द. अमेरिका इ. प्रदेशांतही यांतील वनस्पती आढळतात. फायटोलॅकेसी (पाटलपुष्प कुल) किंवा ⇨ कॅरिओफायलेसी आणि ⇨ कॅक्टेसी (नागफणा कुल) या कुलांशी या कुलाचे आप्तभाव असून ⇨ रॅनेलीझ (मोरवेल गण) पासून कॅक्टेलीझ (नागफणा गण) मार्गे याचा उगम झाला असावा, असे मानतात. यांशिवाय याचे ⇨पोर्चुलॅकेसी (लोणी कुल), ⇨ निक्टॅजिनेसी (पुनर्नवा कुल), ⇨अँमरँटेसी (आघाडा कुल), ⇨ बॅसेलेसी (मायाळ कुल) व ⇨ चिनोपोडिएसी (चाकवत कुल) यांच्याशीही आप्तभाव आहेत.

फायकॉइडी कुलातील बहुतेक वनस्पती उष्ण व कोरड्या हवामानातील असल्याने त्यांचे ⇨ मरुवनस्पतींशी साम्य असते. त्या वर्षायू (एका हंगामात क्रम पूर्ण करणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे किंवा ओषधी [→ ओषधी] असून त्यांची पाने साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, अरूंद व कधीकधी मांसल किंवा खवल्यासारखी असतात क्वचित उपपर्णे असतात खोडावर शेंड्याकडे किंवा पानांच्या बगलेत वल्लरीवर[→ पुष्पबंध] नियमित, द्विलिंगी फुले येतात. फुलांत फक्त संवर्त असून संदले ४-५, सुटी किंवा जुळलेली व कधी संख्येने अधिक आणि किंजपुटास चिकटलेली किंवा त्यापासून सुटी केसरदले ३, ५ किंवा अनेक, अंशतः किंवा पूर्णपणे जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुट २, ५ किंवा अनेक किंजदलांपासून बनलेला व त्यात एक किंवा अनेक कप्पे किंजल्क २-२० व बीजके प्रत्येक कप्प्यात एक ते अनेक असून मांडणी विविध प्रकारची असते [→ फूल]. बोंड (फळ) आडवे फुटते किंवा त्यातील पडदे तुटून फुटते बिया बहुधा अनेक आणि त्यांत पिठूळ पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) व त्याला वेढणारा मोठा गर्भ असतो. मृदुफळ क्वचित आढळते व फुलात बाहेरील केसरदले पाकळ्यांसारखी असतात. किंजदलांचे स्थान व बीजकांची मांडणी यांवर आधारित उपकुले बनविली आहेत. कित्येक जाती बागेत नवलपूर्णतेकरिता लावतात. न्यूझीलंड स्पिनॅक हे जेवताना कच्च्या भाजीप्रमाणे घेतात.

भारतात माल्युगो, गिसेकिया, ट्रायँथेमासेसूव्हियम या चार वंशांतील काही जाती औषधांकरिता उपयुक्त आहेत.

(१) झरस (मॉल्युगो स्पर्ग्युला अथवा मॉ. ऑपोझिटिफोलिया) : हे मांसल क्षुप (झुडूप) कडू द्रव्ययुक्त असून बांळतपणात याची भाजी खाल्ल्यास शरीरक्रिया सुधारतात त्वचारोगात लेप लावतात. कानदुखीत कानशिलावर लेप देतात.

(२) खरस (मॉ. स्ट्रिक्टा किंवा मॉ. पेंटॅफिला) : वीतभर उंचीची ओषधी याची भाजी विषमज्वरात देतात. दीपक (भूक वाढविणारी), पूतिरोधक व सौम्य विरेचक पानांचा फांट [ विशिष्ट प्रकारे तयार केलेला काढा → औषधिकल्प] आर्तवजनक (ऋतुस्त्राव सुरू करणारा) पाने कडू व पाळीच्या तापावर उपयुक्त.

(३) पड (मॉ. सर्वियाना): दलदलीत वाढणारी वर्षायू ओषधी ताप कमी करण्यास व परम्यावर उपयुक्त.

(४) सिरू सेरूपदी (मॉ. हिर्टा किंवा मॉ. लोटाइडिस): खार जमिनीत वाढणारी ओषधी अतिसारात, पित्तविकारात आणि गळवे, जखमा व वेदना यांकरिता सुकी वनस्पती देतात.

(५) वळू (गिसेकिया फानेंसिऑइडिस, सं. वालुक): या पसरट ओषधीला वळूची भाजी असेही म्हणतात तिची भाजी करतात. ही सुगंधी, कृमिनाशक व सौम्य विरेचक आहे.

(६) वसू (ट्रायँथेमा पोर्चुलॅकॅस्ट्रम): हिला बिशकोप्रा, वसुक अशीही नावे आहेत गुणधर्म ⇨ वसूमध्ये वर्णिल्याप्रमाणे असतात.

(७) धाप (सेसूव्हियम पोर्चुलॅकॅस्ट्रम) : मांसल, सरपटत वाढणारी ओषधी समुद्रकिनाऱ्यावर वाळूत सामान्यतः आढळते. चांगली शिजवून व लवणांश काढून टाकून हिची भाजी करतात.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Rendle. A. B. The Classification of Flowering Plants, London, 1963.

३. देसाई, वा. ग. औषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

चिन्मुळगुंद, वासंती रा.