रामफळ : (हिं. लौना गु., क., सं. रामफळ इं. बुलक्स हार्ट लॅ. ॲनोना रेटिक्युलॅटा कुल ॲनोनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. ९·३० ते १५·५० मी. उंचीचा व ⇨सीताफळापेक्षा मोठा पानझडी वृक्ष. हा मूळचा वेस्ट इंडीजमधला असून हल्ली भारतात व उष्ण कटिबंधीय अमेरिकेत भरपूर आढळतो. खाद्य फळांकरिता याची लागवड करतात पण ती सीताफळापेक्षा कमी आहे. भारतात उद्यानांतून लहान प्रमाणावर परंतु शेतात अधिक प्रमाणावर रामफळाची लागवड करतात. बंगालमध्ये व द. भारतात रामफळाचे वृक्ष सुस्थित झाले आहेत. रामफळ, सीताफळ, ⇨मामफळ व चेरिमोया अथवा ⇨मारुतिफळ ह्या ॲनोना या प्रजातीतील चार जाती भारतात आढळतात या प्रजातीत एकूण सु. १२० जाती आहेत.

रामफळ

रामफळाच्या वृक्षाला साधी, एकाआड एक, पातळ, १० –१८ X २·५ –४ सेंमी., फार लहान देठाची, टोकदार, पारदर्शक ठिपके असलेली, आयत-कुंतसम (भाल्यासारखी), कोवळेपणी खाली काहीशी लवदार व वरच्या बाजूस गुळगुळीत आणि चकचकीत पाने असतात. फुले एकेकटी किंवा २ –४ च्या झुबक्यात असून त्यांना प्रथम लहान व नंतर लांब व मजबूत देठ असतो ती हिरवट सु. ८ सेंमी. व्यासाची व सु. ४ सेंमी. लांब असून त्यांची संरचना सीताफळाच्या फुलाप्रमाणे आणि इतर शारीरिक लक्षणे ⇨ ॲनोनेसी अथवा सीताफळ कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात मृदुफळही सीताफळाप्रमाणे पण रंगाने पिवळट लालसर व मोठे (सु. १० – १५ सेंमी.) आणि वजनाने एक किग्रॅ. पर्यंत असते. त्याची साल गुळगुळीत व त्यावर पुसट डोळे (उथळ गोलसर किंवा कोनयुक्त खाचा) असतात. फळाचा हृदयासारखा आकार व रंगरूप यांवरून बैलाचे हृदय (बुलक्स हार्ट) या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. बिया अनेक, काळपट, सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) आणि गुळगुळीत असून तळाशी रुंद व गोलसर आणि टोकास निमुळत्या असतात.

फळातील मगज काहीसा आंबुस गोड, रुचकर पण रवाळ वा पिठूळ, पांढरट व खाद्य आहे. कच्च्या फळातील मगज कृमिनाशक असून पक्व पळ आमांशनाशक आहे तसेच ते पित्तनाशक व तृष्णाशामक (तहान कमी करणारे) आहे. ते स्तंभक (आकुंचन करणारे) असून रक्तदोषांवर उपयुक्त असते. पाने व बी कीटकनाशक आणि खोडाची साल स्तंभक असते. राजस्थानात पाने व कोवळ्या फांद्या टॅनीनमुळे कातडी कमावण्यास वापरतात. अपक्व व सुकलेल्या फळांत काळा रंग व ताज्या पानांत नीळ सापडते. लाकूड उपयुक्त असते. सालीत ०·०३ टक्के ॲनोनाइन हे अल्कलॉइड असते. कोवळ्या फांद्यांवरच्या सालीपासून चांगला धागा मिळतो. बियांचे तेल कीटकनाशक म्हणून व साबण बनविण्यास वापरण्यास उपयुक्त असते.

पहा : ॲनीनेसी सीताफळ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol.I, Delhi, 1948.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol.I, Delhi, 1975.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.