अमरकंद : (अंबरकंद, मानकंद हिं. गोरूमासं. बालकंद, मान्यलॅ. युलोफिया न्यूडा कुलऑर्किडेसी). ही ओषधी भारतात उष्णकटिबंधीय हिमालयात, दख्खनमध्ये व कोकणाच्या दक्षिणेस आढळते. तसेच ब्रह्मदेश, श्रीलंका व चीन इ. देशांत तिचा प्रसार आहे. तिचे गाठदार मूळ बटाट्याएवढे, लहान, गोल व गुळगुळीत असते. ह्याच्या बाजूने वाढलेल्या पानांच्या तळाशी खोबणीसारख्या, आवरक (वेढणाऱ्या), देठांचा खोडासारखा भाग बनतो पाने साधी, लांब, तलवारीसारखी फुले ९-२० विरळ मंजरीत खोडाच्या तळापासून जूनमध्ये येतात. संदले हिरवट जांभळी व प्रदले [®फूल] पांढरी असून ओठाच्या पाकळीचा भाग पांढरा किंवा पिवळा व त्याला गुलाबी किंवा जांभळट झाक असते बोंड लांबट असून त्यावरच्या शिरा ठळकपणे दिसतात. मूळ हे अर्बुद (शरीरातील सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे झालेली निरुपयोगी गाठ), गंडमाळा, श्वासनलिकादाह, रक्तविकार इत्यादींवर गुणकारी व कृमिनाशक असते. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ð ऑर्किडेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.

हिवाळ्याच्या मध्यापर्यंत पाने व फुले संपल्यावर गाठदार मुळे किंवा खोड जमिनीतून काढून अंकूर फुटेपर्यंत प्रसुप्तावस्थेत (निष्क्रीय अवस्थेत, ®प्रसुप्तावस्था) कोरड्या, परंतु उबदार ठिकाणी ठेवतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस कुंड्यांमध्ये दुमट माती, चांगले कुजलेले शेणखत व थोडी रेती यांचे मिश्रण पाण्याचा निचरा होईल असे भरून त्यात ही लावतात. अंकुर वाढू लागून कार्यक्षम मुळ्या जोरदार वाढेपर्यंत बेताबेतानेच पाणी देतात. पूर्ण वाढ झाल्यावर थोडेथोडे खत पाण्याबरोबर मिसळून देतात. कोवळ्या पालवीवर उन्हाचा वाईट परिमाम होऊ नये म्हणून ती आल्याबरोबर सावली करतात. जुन्या मुळांचे किंवा खोडांचे तुकडे करून कुंड्यांत लावून झाडांची संख्या वाढवितात.

  जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.